Top Post Ad

खाजगी डॉक्टरांची सेवा महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात उपलब्ध करावी


  'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या ठाणे महानगर पालिकेने सुरु केलेल्या उपक्रमाचे तिसरे सत्र ठाणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. यामध्ये ठाणे शहर हे आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ बनविणे  गरजेचे असून याची सुरूवात  लहान मुलांपासून व्हावी यासाठी महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबाबत होर्डिंग्जच्या माध्यमातून जनजागृती करावी, उच्च वैद्यकीय शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्यालय उभारावे. तसेच महापालिकेची जी  कार्यरत आरोग्यकेंद्रे व रुग्णालये आहेत त्या ठिकाणी खाजगी डॉक्टरांना सेवा देता यावी यासाठी वेळ ठरवून द्यावी अशा सूचना या चर्चासत्रात शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या.

आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, सचिव डॉ. सुनील बुधलानी, खजिनदार डॉ. मिनल गाडगीळ, ईएनटी सर्जन डॉ. प्रदीप उप्पल, मेडिसीन विभागाचे अध्यक्ष डॉ. अमित सराफ, आयएमएचे महाराष्ट्र सदस्य डॉ. संतोष कदम, डॉ. एम.पी.शाह, राजीव गांधी मेडिकल महाविद्यालयाचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. जयनारायण सेनापती, डॉ. मनीषा घोष आदी सहभागी झाले होते. ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेवून विभागवार खाजगी व सरकारी रुग्णालयाचा समूह तयार करावा. या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करावी यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन आहार कसा असावा,  कोणते पदार्थ खावेत व खावू नयेत याची माहिती सातत्याने द्यावी, सदरची माहिती नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी आकर्षक पध्दतीने फलक लावून त्यावर स्लोगन द्यावेत, निश्चितच हे माध्यम फायदेशीर ठरेल तसेच लहान मुलांना देखील याची माहिती मिळेल असे मत डॉ. प्रदीप उप्पल यांनी व्यक्त केले. तसेच खाजगी डॉक्टर हे ठाणे महापालिकेस आपली सेवा देण्यास तयार आहेत, यासाठी जर महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना दुपारी 12 ते 4 ही वेळ उपलब्ध करुन दिल्यास त्याचा निश्चितच लाभ गोरगरीब नागरिकांना होईल असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.  तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध केल्यास गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल्‍ यासाठी तशा प्रकारचे मेडिकल स्टोअर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

            वर्षभर शहरामध्ये अनेक साथीचे आजार पसरत असतात, अशा प्रकारचे साथीचे आजार पसरू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, तसेच यासाठी इतरही घटक कारणीभूत ठरतात, प्रामुख्याने काही नागरिक त्यांचे पाळीव प्राणी शहराच्या सार्वजनिक ठिकाणी फिरावयास नेतात, त्यांचे माध्यमातून देखील शहरात घाण होत असतात, यावर आळा बसणे आवश्यक आहे व असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महापालिकेने नियमावली तयार करुन याची अंमलबजावणी करण्याची सूचना डॉ. महेश जोशी यांनी केली. शिवाय अनेक रस्त्यांवर काही वाहनचालक हे उलट्या दिशेने प्रवास करत असतात, अशा वेळी अपघात होवून दुर्घटना घडण्याची शक्यता असते याबाबत महापालिकेने वाहतूक विभागाशी सल्लामसलत करुन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असेही त्यांनी नमूद केले.  केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व डॉक्टर्स मंडळीना एकत्रित घेवून बैठक आयोजित करणे आवश्यक असते. परंतु यासाठी कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नाही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अद्ययावत सेवासुविधांनी युक्त असे Convention center उपलब्ध करुन देण्यात आले आहे,

 या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने देखील अशा प्रकारचे सेंटर्स उपलब्ध केल्यास वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सोईचे होईल असाही मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला.  महापालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत एनआयसीयूची सुविधा अत्यल्प आहे. ठाण्याची लोकसंख्या लक्षात घेता हे कक्ष अपुरे पडत आहे, तसेच ठाण्यात इतर भागातूनही लहान उपचारार्थ दाखल केले जाते, बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा मुंबईत पाठविण्यात येते, यामध्ये वेळ व पैसा खर्च होत असून विपरीत घडण्याची शक्यता असते, तरी एनआयसीयूची संख्या वाढविण्याबाबत प्रामुख्याने विचार करावा. तसेच कोपरी येथील प्रसुतीगृह सकाळच्याच सत्रात सुरू असते, सदर प्रसुतीगृह 24x7 पध्दतीने सुरू राहील याबाबत नियोजन करावे अशी मागणी देखील डॉक्टरांकडून करण्यात आली.  तसेच अनेक आजारांचा प्रसार हा डासांच्या माध्यमातून होत असल्याने शहरातील नाले, गटारे बंदिस्त गेल्यास डासांवर निर्बंध आणण्याबाबत उपाययोजना करावी असेही मागणी डॉक्टराकडून करण्यात आली.

ठाणे शहरात आयपीएलचे सामने भरवावेत-  महापालिकेच्या माध्यमातून शहराला भूषण ठरेल असे दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह ठाण्यात उभारण्यात आले आहे, परंतु आजवर या ठिकाणी आयपीएल दर्जाचे क्रिकेटचे सामने झालेले नाहीत. या ठिकाणी आयपीएलचे सामने व्हावेत अशी समस्त ठाणेकरांची मागणी आहे, या ठिकाणी आयपीएलचे सामने खेळविले जातील यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावी अशी मागणी समस्त ठाणेकरांच्यावतीने डॉक्टरांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली.

झोपडपट्टी कचरामुक्त असाव्यात- महापालिका कार्यक्षेत्रात अंदाजे 800 ते 900 मेट्रिक टन दैनंदिन कचरा निर्माण होत असतो. जमा झालेला कचरा वाहून नेवून त्याची योग्‌य विल्हेवाट लावावी. झोपडपट्टी विभागात काही ठिकाणी कचरा साचून राहिल्यास तेथे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते, तरी झोपडपट्ट्या विभागातील कचरा 100 टक्के उचलला जाईल्‍ याबाबत देखील नियोजन करावे अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली.

सार्वजनिक शौचालयात पाण्याची सुविधा उपलब्ध करावी-  तसेच झोपडपट्टी विभागामध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांचा वापर असतो. शौचालये नियमित स्वच्छ राहतील यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करुन द्यावे व सर्व सार्वजनिक शौचालये नीटनेटकी असतील या दृष्टीने उपाययोजना कार्यवाही व्हावी.

            शहराविषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडलेल्या मतांबाबत निश्चितच विचारविनिमय करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल, तसेच शहरातील सार्वजनिक शौचालये, कचऱ्याचे व्यवस्थापन याबाबत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू असून लवकरच शौचालयाचे रुपही बदललेले पाहायला मिळेल असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी डॉक्टरांना दिला. तसेच प्रथमच शहरातील डॉक्टरांची मते आयुक्तांनी जाणून घेवून महापालिकेच्या कामात डॉक्‌टरांना सहभागी केल्याबद्दल सर्व डॉक्टरांनी आयुक्तांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com