Top Post Ad

पन्नासावा शहीद दिन बंदिस्त जागेत होतोय ही अधोगतीच - शामदादा गायकवाड


  शहीद भागवत जाधव स्मृती केंद्र आणि झेप संस्था आयोजित शहीद भागवत जाधव आणि शहीद रमेश देवरुखकर यांच्या ५० व्या शहीददिना निमित्त शिवाजी मंदिर दादर  येथे दि.१० जानेवारी रोजी  अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

सभेच्या सुरुवातीस मा.संजय सावंत यांनी प्रस्तावना देताना मुंबईतील शोषण व्यवस्थेत बळी पडलेल्यांच्या स्मृतींना आभिवादन करण्यासाठी ही सभा मुंबईच्या मध्य भागात म्हणजेच दादर या ठिकाणी घेतली आहे हे आवर्जुन नमुद केले. शहीद भागवत जाधव आणि शहीद रमेश देवरुखकर यांच्या ५० व्या शहीद दिना निमित्त यांच्या हौतात्म्याला केवळ अभिवादन करून चालणार नाही तर त्यातुन प्रेरणा घेऊन भिमसैनिकांती संघर्ष केला पाहिजे. आणि ‘पेरत जाऊ तुझ्या रक्ताचा एक एक थेंब नव्या पॅथरच्या जन्मासाठी‘ या ओळीमधून बोध घेतला पाहिजे.

अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी मा.श्यामदादा गायकवाड तर प्रमुख वक्ते म्हणून  मा.तुषार गांधी, मा.राजू परुळेकर, मा. मुमताज शेख, मा. सिद्धार्थ मोकळे आणि मा.वैभव छाया यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी शहिदांना अभिवादन करताना सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. संविधान की  मनुस्मृती? या विषयावर आपापली मते मांडली. वक्त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आणि भाषणांच्या दरम्यान सत्तरी ओलांडलेल्या काही निवडक पॅंथरची मनोगते ऑडिओ व्हिज्युअल क्लिप च्या माध्यमातून दाखवण्यात आली पैकी सुरुवातीलाच दलित पँथरचे सह संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत मा.ज.वि. पवार यांची १० जानेवारी १९७४ रोजी घडलेला संपूर्ण घटना प्रसंग सांगणारीऑडिओ व्हिज्युअल क्लिप दाखवली गेली. आणि पन्नास वर्षांपूर्वी घडलेला संपूर्ण घटनाक्रम जिवंत झाला त्यानंतर ज्येष्ठ पँथर मा. सयाजी वाघमारे यांची शहिद भागवत जाधव यांना भावनिक आवाहन करणारी AV दाखवली गेली, 

संविधान की मनुस्मृती ?  या अभिवादन सभेच्या विषयावर सुरुवातीलाच सोशल मीडियातून आंबेडकरी चळवळीचे प्रभावी कार्य करणारे मा.वैभव छाया यांनी शोषकांचे जखडून ठेवणे गोड वाटून घेण्याच्या नादात सामान्य माणूस संविधानाला गौण समजु लागला होता. पण सद्यकालीन भाजप सरकारने खुलेआम आपले खरे रंग दाखवले  आणि मग सामान्य माणुस खडबडून जागा झाला. मनुस्मृती लागु होते की काय आणि गुलामी लादली जाते की काय असेच सर्वांना वाटू लागले. आज मनुस्मृतीचे राज्य टेक्निकली जरी नसले तरी मनामनात अजूनही मनुस्मृतीचे अस्तित्व असलेले दिसते. या कोंडीतून संपूर्ण समाज कसा बाहेर येईल हेच आपण आज मा. तुषार गांधी, मा. राजु परुळेकर यांच्याकडून आणि इतर मान्यवर यांच्याकडून ऐकण्यासाठी येथे जमलो आहोत. गोवंडी परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मा. मुमताज शेख यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संविधान की मनुस्स्मृती ?हा प्रश्न स्वतःला विचारते तेव्हा जर आज मी आज येथे अभिवादन सभेत बोलत आहे. याचाच अर्थ संविधानच हे मला मिळालेले उत्तर आहे कारण मनुस्मृती असती तर  मी इथे नसते. तसेच संविधान प्रेमींनी आपापली जबाबदारी ओळखून कार्यरत रहायला हवे याची आठवण केली व कार्यक्रमात महिलांच्या नगण्य उपस्थितीवर भाष्य केले.

ज्येष्ठ विवेकवादी  पत्रकार राजु परुळेकर यांनी अभिवादन सभेच्या विषयाला धरून आपली परखड मते संयंत स्वरूपात आणि मिश्किल भाषेत मांडली. नुकताच विधानसभा अध्यक्षांनी आमदार पात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर त्यांनी त्रोटक कटाक्ष टाकला .आज-काल स्वतःचा बाप हा माझाच बाप आहे हे सिद्ध करताना अवघड जात आहे ज्यांच्याकडे न्याय देण्याची भूमिका आहे ते सख्या मुलाला हा बाप तुझा नाही तर त्याचा आहे असा बिनदिक्कत निकाल देत आहेत. आणि वर सांगत आहेत की हा संवैधानिक निकाल आहे. त्याचबरोबर संविधान की मनुस्मृती ? या प्रश्नाचे बाबासाहेबांनीच मनुस्मृतीला जाळण्याच्या कृतीतून . आणि संविधान स्वतः प्रत  अर्पण केले  त्यातून उतर देऊन ठेवले आहे. आणि आज काल संविधान मानणाऱ्यांचे वडील पण चोरले जातात याकडे लक्ष वेधले राजु परुळेकर यांनी  संविधान आहे पण त्याचं वाचन केलं जात नाही. हा मोठा प्रश्न आहे ही खंत मांडली. आंबेडकरवाद्यांनी शिकायची वेळ संपली संघटीत होऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे याची जाणीव उपस्थितांना करून दिली. वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते व अभ्यासु विचारवंत मा. सिद्धार्थ मोकळे यांनी Everything about politics जर जीवना मध्ये असेल तर politics वर बोलायला कचरायचे का? हा सवाल उपस्थित करून आज आंबेडकरी चळवळ inclusive स्वरुपाची झाली आहे. आणि ही चळवळ प्रवाही असली पाहिजे असे सांगितले 

        महात्मा गांधीचे पणतु मा.तुषार गांधी यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधान की मनुस्मृती ? या प्रकारच्या विषयामुळे आपण मनुस्मृती वाद्यांना बळ देत आहोत. असे प्रतिपादन केले कारण या विषयामुळे त्यांना असे वाटु लागले आहे की संविधान जर तुमचे आहे तर मग मनुस्मृती आमची.आम्ही मनुस्मृतीलाच प्रमाण मानणार आणि त्याप्रमाणेच वागणार . जेव्हा जेव्हा अशा पुरोगामी सभेत जातो तेव्हा मला स्वतःचीच पाठ थोपटण्यासाठी  जमलेले लोक जमल्यासारखे वाटतात. एखाद्या मुशायऱ्यामध्ये एखादा शायर टाळ्या घेणारा शेर पेश करतो तसेच पुरोगामी वाद्यांच्या सभेमध्ये लोकांना आवडेल असे भाष्य केले जाते आणि लोक टाळया पिटतात त्याचबरोबर संविधान विरोधक जे कृत्य करत आहेत त्याला गांभीर्याने घेतले जात नाही प्रत्येक गोष्टीवर मजा चेष्टा मस्करी अशी अवस्था पुरोगामी वाद्यांची झाली आहे असे माझे निरीक्षण आहे .हे कुठेतरी बदलले पाहिजे आणि संविधान वाद्यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे . 

एका बाजूला आपण लोकशाही धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी समाजात जनजागृती करत आहोत ,परंतु लोकशाही वाचविण्यासाठी आपण पुढे येत असतानाच भारत स्वातंत्र्य लढ्याला गती देणारे महात्मा गांधी आणि संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर राजकारण करून दुकानदारी करणाऱ्यांना उघडे पाडा, त्यानंतरच लोकशाही विरोधी विरोधकांना नामोहरण करता येईल. आपण एका बाजूला भारतात संविधानाचा खून होताना पाहत असताना आपण रस्त्यावर का उतरत नाहीॽ  आपण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीपर्यंत मर्यादित करून नेमके काय साध्य करीत आहोत?   संविधानाची तुलना आपण मनुस्मृतिशी करून आपण प्रतिवाद्यांची ताकद वाढवत का आहोत? याचा कधी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का,ॽ असाही प्रतिसवाल तुषार गांधी यांनी व्यक्त केला. 

श्यामदादा गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वप्रथम आयोजकांना खडे बोल सुनावले .शहीद दिनाचा कार्यक्रम लवलेनला खुल्ला मैदानामध्ये व्हायचा  आज पन्नासावा शहीद दिन शिवाजी मंदिरात बंदिस्त जागेत होतोय खरे तर ही अधोगतीच आहे. आज पन्नास प्रकारच्या पॅंथर नावाने संघटना निर्माण झाल्या आहेत त्यात कोण खरे पँथर कोण खोटे पॅंथर कळायला मार्ग नाही अनेक जण तर बिन दिक्कतपणे पॅंथर चळवळीशी स्वतःचा संबंध जोडून खोटी माहिती प्रस्तुत करत असतात .त्यापैकी काही जणांना बघून तर असे वाटते की पॅंथरच कातडे ओढलेले कुत्रे आहेत . हे सांगतानाच अभिवादन सभेचा  विषय संविधान की मनुस्मृती यावर बोलताना काही विषयांवर बोललं गेलं पाहिजे.यावर सर्वांचे लक्ष वेधले जसे की आपल्या देशातील लोकशाही संपली आहे.हुकुमशाही सुरु आहे. हे मान्य केले पाहिजे.अनेक वेगवेगळ्या पक्षात काम करतात तरीही स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात.अशा खोट्या आंबेडकरवादी लोकांना  वेळीच ओळखलं पाहिजे. 

भारताचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात असताना त्याच्या दोन दिवस आधी राजस्थानमध्ये मडक्यातील पाणी प्यायला म्हणून दलित मुलाची सुवर्ण शिक्षकाकडून हत्या होते, यामधून आपण नेमका काय संदेश देणार आहोत ,याचाही कधी आपण विचार करणार आहोत की नाही ॽ स्वतःला प्रत्येक जण आंबेडकरी चळवळीचा वारसदार सांगतो आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांमध्ये काम करतो, नेमकं त्याला काय साध्य करायचे आहे, हा प्रश्नच पडतो. आंबेडकरी चळवळ चळवळ आहे. प्लेग सारख्या आजाराची साथ पसरली होती त्यावेळी इंग्रज अधिकारी रॅम्सचा खून झाला. हा खून केवळ अस्पृश्य लोक आमच्या घरात येऊन उंदीर मारतात. आमचे घरे अपवित्र करतात , केवळ या जातीय मानसिकतेतून  रॅमची हत्या झाली. ती मानसिकता ती प्रवृत्ती पुन्हा वाढत असून ती ठेचून काढण्यासाठी म्हातारे झालेल्या पॅंथर यांनी रस्त्यावर उतरण्याची नितांत गरज आहे. घरात पडून मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून शहीद व्हा, अशी भावनिक साद श्यामदादा गायकवाड यांनी घातली. 

आंबेडकरी चळवळी केवळ भाकरीची चळवळ नाही तर ती आत्मसन्मानाची चळवळ आहे, स्वाभिमानाची चळवळ आहे. वंचित, शोषित, पिडीतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता केंद्र काबीज करावे लागेल ,असे वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. सदर अभिवादन सभेच्या आधी संदेश उमप आणि सहकारी यांचा जलसा प्रबोधनाचा हा प्रबोधक कार्यक्रम सादर करण्यात आला.

वृत्तांकन : राहूल गायकवाड (मुंबई)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com