पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी बनत चालला असताना सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्वाच्या हीन पातळीवर नेण्याची प्रयोगशाळा बनतोय की काय?
बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी चक्क जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केलीय... तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबानं केलंय... नंतर माफी ही मागितली. मात्र हे एकूणच सगळं पाहिल्यानंतर ते व्हिडिओ परत परत पाहिले आणि मन खिन्न होऊन गेलं, डोळ्यासमोर कितेक किलोमीटर चालणाऱ्या त्या वारकरी सांप्रदायाच्या निष्पाप खेड्यापाड्यातील व शहरातील माणसांना वारीतून जाताना पाहिल्याचे चित्र डोळ्यासमोर आलं. अनेक संतवाणी सुमधुर गाण्याने घरात रोजची पहाट होत असे. या राज्यामध्ये असं का घडायला लागलंय, याची काळजी वाटू लागली आणि याला काहीतरी वेगळाच राजकीय धार्मिक स्वरूपाचा काही वास येऊ लागला आहे. यातून आपलं हे राज्य वेगवेगळे काही अनिष्ट असणाऱ्या प्रयोगाची प्रयोगशाळा कोणी बनवू पाहताय का? ही पुसटशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.
मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही सहकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा होत असताना वारकरी संप्रदाय आणि त्या चळवळीने महाराष्ट्रात एक वेगळा सुधारणेचा व परिवर्तनाचा सांस्कृतिक अध्यात्माचा एक चांगला पायंडा पाडला आणि आजही तो अविरतपणाने चालू आहे, असे वाटते. तसेच वारकरी साहित्य परिषदेचे ह.भ.प.माऊली विठ्ठल पाटील यांच्याशी चर्चा होत असते, माझं नाव प्रवीण व माझ्या वडिलांचे नाव विठ्ठल तसेच आजोबांचे नाव हरी असल्यामुळे, मला ते सातत्याने सातारचा असल्यामुळे व पंढरपुराशी जवळच नातं असल्यामुळे ते मला नेहमी 'विठ्ठल सुत' असे म्हणत असत आणि मला ते विठ्ठल सुत म्हणताना आणि आपल्या पूर्वजांची नावे लक्षात घेता आपल्या परिवाराशीही या वारकरी चळवळीशी जवळचा संबंध आहे असं नेहमी मला वाटत असतं आणि या चळवळीविषयी आदर आहे, तसेच अनेक गावाकडे जवळच्या मंडळींची नावे ही संतांच्या नावाप्रमाणे होती, ही लहान असल्यापासून पाहिलेली आहेत, तुकाराम जवळचा मित्र, ज्ञानेश्वर भाऊ, चोखा दूरचे आजोबा अशी अनेक नावाच्या माणसात वावरलो आहे. त्यामुळे आदरणीय विठ्ठल पाटील यांनी मला 'विठ्ठल सुत' ही हाक मारत असताना खुप आनंददायी वडीलांची व विठ्ठल माऊलींची आठवण येते, ही एक व्यक्तिगत आठवण असली तरी पण ही आठवणही वारकरी संत परंपरा व जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या निमित्ताने या चळवळीला आदरभाव व्यक्त करावा या भावनेने मी हे नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच पश्चिम महाराष्ट्र सारख्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यामध्ये काही अनुचित प्रकार मागील काही कालखंडामध्ये घडले आहेत. साताऱ्यामध्ये मशिदीमध्ये एका मुस्लिम बांधवांचा खून करण्यात आला, सांगलीमध्ये तर वारंवार भिडे गुरुजीच्या निमित्ताने वादग्रस्त विषय होऊन गेले, तसेच कोल्हापूरच्या शाहूनगरीमध्ये सुद्धा हिंदुत्वाची घंटा घुमू लागली. हे सगळं होत असतानाच
पुणे जिल्ह्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा व त्यांच्या कुटुंबाबद्दलचा इतिहास सर्वश्रुत असताना देखील त्यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य हे एकूणच धोक्याची घंटा आहे असे आपल्याला दिसून येत. तथाकथित या बाबांने माफीतर मागितली, परंतु महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनामध्ये एक वेगळाच हस्तक्षेप जाणीवपूर्वक होत आहे असे यातून दिसून येत. त्याच पद्धतीने सांस्कृतिक आणि धार्मिकतेला राजकीय पक्षाचं बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे, ज्या पद्धतीने राज्याच्या नेतृत्वांनीं सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्ष भावनेतून कार्य करायचं असताना अशा पद्धतीच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या बाबा व्यक्तींच्या समोर लीन होणं हे योग्य नाही, कारण की एकूणच या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचं चित्रण वाहिन्यांच्या वरून दिसून आलं आणि समाज मनामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने गोंधळ निर्माण झाला आणि नेमकेपणाने काय भूमिका घ्यावी हे लक्षात येईन असं झालं आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर हिंदू असणारा देश आणि राज्यही, मात्र त्या मध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये वारकरी चळवळीच्या माध्यमातून एक वेगळा समाज सुधारणेचा आणि अध्यात्माचा पांयडा या महाराष्ट्रामध्ये पडला, पंढरीची वारी आणि त्याचे एकूणच सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामधून सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्ष भावनेने समाजामध्ये सौंदर्याचे असणारे वातावरण आहे, परंतु या सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रालाच कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्तीच्या माध्यमातून होत आहे. यासंदर्भात परखडपणाने भूमिका मांडताना कोणी दिसून येत आहे येत नाही. विचारवंतही स्पष्टपणे भूमिका घेत नसावेत कारण धर्माने त्यातील काही लोक हिंदू आहेत आणि सांस्कृतिक आणि अध्यात्मिक बाबींमध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी आणि ती समाजात कशा दृष्टीने घेतली जाईल या विवंचनेत कदाचित ते असावेत, तसेच गैरहिंदू समुदायातील विचारवंतांनी याबाबतीत काही बोललं तर ते हिंदू विरोधी ठरवण्यास सध्याची प्रस्थापित व्यवस्था तयारच बसलेली आहे, असं मला वाटतं.
एकूणच बहुजन वर्गामध्ये मोठी आस्ता आणि पूजनीय असणाऱ्या संत वारकरी चळवळीच्या मध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करून चुकीच्या दिशेने समाजमन घेऊन जाण्यासाठी केलेल्या प्रयोगापैकी हा एक भाग असावा असे मला वाटते. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा परिपाक असणाऱ्या पुरोगामी विचाराचा बाज एकदम कणखरपणानं एकवटलेला असला तरी ही, आपले राज्य प्रतिगामीपणाकडे झुकते की काय? आणि सांस्कृतिक आणि धार्मिक प्रयोगाचे केंद्र बनते की काय? अशा पद्धतीचे वातावरण आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येईल असं एकूणच चित्र या प्राप्त परिस्थितीमधून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याला खरोखरच एक फारच आगळीवेगळी वैचारिक परंपरा आहे आणि ह्या वैचारिक परंपरेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होत असताना एका वेगळ्याच सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांना हात घालण्याचा प्रयत्न काही शक्तींच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहेत. राज्य अस्थिर करायचं, या राज्यामध्ये चांगल्या घडणाऱ्या गोष्टींना कुठेतरी थांबवायचं अशा पद्धतीची एकूणच आपल्याला रचना दिसून येत आहे,
महाराष्ट्र राज्याचा भल्यासाठी आपण वर नमूद केलेल्या विचाराचा गांभीर्याने आपण सर्वजण विचार कराल तसेच विघातक प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे.
- प्रवीण मोरे
- रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता
- खारघर, नवी मुंबई
0 टिप्पण्या