Top Post Ad

ते आम्ही नव्हेच.... अपात्र प्रकरणी "त्या" आमदारांचे घूमजाव


 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकनाथ शिंदे हटावसाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या हजेरीपटावर शिंदे गटात गेलेल्या 23 आमदारांनीच सह्या केल्याचं समोर आले. मात्र आता या सह्या बोगस असल्याचा दावा शिंदे गटातील ते आमदार करीत आहेत. या सह्या आधीच घेण्यात आल्याचा दावा दिलीप लांडे यांनी केला. तर, ही सही आपली नसल्याचा दावा योगेश कदम यांनी केला. अशा तऱ्हेने ते आम्ही नव्हेच असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती.  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीचा हजेरीपट कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे उलटतपासणी घेतली. 

 शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची  जवळपास 6.5 तास चाललेल्या उलटतपासणीत लांडे यांना 116 तर कदम यांना 77 प्रश्न केले गेले. या उलटतपासणी दरम्यान कामत यांनी 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीचा हजेरीपटच समोर आणला. एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला होता. या बैठकीच्या हजेरीपटावर शिवसेनेच्या 23 आमदारांच्या सह्या आहेत, जे पुढे शिंदे सेनेत सहभागी झाले. यावरून देवदत्त कामत यांनी आज दिलीप लांडे आणि योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. हजेरीपटासह पक्षादेश, प्रतिज्ञापत्रांवरील सह्यांचे दाखले दिले. त्यावर हजेरीपटावर सही आपली असली तरी आमदारांच्या सह्या आधीच घेण्यात आल्याचे उत्तर आमदार लांडे यांनी दिले. तर ही सही माझ्या सहीसारखी दिसते. मात्र अशा कोणत्या कागदपत्रावर आपण सही केल्याचे आठवत नसल्याची सारवासारव आमदार योगेश कदम यांनी आपल्या उलट तपासणीत सांगितले. इतर ठिकाणच्या सह्या मात्र आपल्या नाहीत, बोगस आहेत, असे आमदार कदम यांनी सांगितले. वर्षावरील या बैठकीच्या या हजेरीपटावर दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम यांच्यासह आता शिंदे गटात असलेल्या 23 आमदारांच्या सह्या आहेत.

आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरत आणि गुवाहाटी दौर्‍यावरून ठाकरे गटाच्या वकिलांनी उलटसुलट प्रश्नांचा मारा केला. त्यावर लांडे आणि कदम यांनी वेगवेगळी उत्तरे देत चकवा देण्याचा प्रयत्न केला. सुरत-गुवाहाटी दौर्‍याच्या प्रश्नावर दिलीप लांडे यांनी ही माझ्या खासगी जीवनातील बाब असल्याचे सांगत अधिक काहीही सांगण्यास नकार दिला. शिवाय महाराष्ट्राबाहेर मी रिक्षा चालवत गेलो किंवा बैलगाडीने गेलो हे सांगू शकत नाही, असेही सुनावले. योगेश कदम यांनी मात्र आपण सुरतला आणि गुवाहाटीला गेल्याचे कबूल केले. मात्र गुवाहाटीत किती दिवस होतो, मुंबईत कधी आलो हे आठवत नाही. शिवाय गुवाहाटीत कोणत्या हॉटेलमध्ये राहिलो त्याचे नावही आठवत नसल्याची साक्ष कदम यांनी दिली. मात्र, या दौर्‍याचा खर्च कोणी केला या प्रश्नावर खासगी बाब असल्याचे सांगत उत्तर देण्यास साफ नकार दिला. गुवाहाटीत एकनाथ शिंदेंसोबत एकूण 39 आमदार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी मागितली मुदत फेटाळून लावली. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरळ विधानसभा अध्यक्षांना दिलेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय याच वर्षी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय नवीन वर्षांत होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचा निर्णय फेब्रवारी अखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याचे सांगत वेळापत्रक सादर केले. परंतु कोर्टाने ते फेटाळून लावत शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिले.  शिवसेनेकडून अध्यक्ष वेळेत निर्णय घेणार नाही, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने यामुळेच आता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे म्हटले. तसेच पुन्हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी ठेवली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक फेटाळून मुदतीत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com