मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ठाण्यात सर्वात मोठा अनधिकृत इमारतीचा बांधकाम घोटाळा झालेला असून याची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या अखत्यारीत लावावी. असे जाहिर आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केले आहे. एकथान शिंदे प्रामाणिक असतील तर ठाणे महापालिकेची खुली चौकशी त्यांनी लावून दाखवावी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका टेंडर वाटप कसे आणि कोणत्या प्रकारे होते ? शासनाच्या निधीमध्ये आणि यांच्या मतदारसंघात यांनी केलेली आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या अंतर्गत झालेल्या कामांसाठीच्या निधीची माहिती जनतेला द्यावी. मातोश्रीच्या जीवावर मोठे झालेले आता मातोश्रीवर खालच्या पातळीची टीका करत आहेत. मातोश्री ते मातोश्री दोन याबाबत बोलणाऱ्यांनी त्यांचा प्रवास टेम्पो चालक, चाळीत राहणारे ते ठाण्यात दोन बंगल्याचे मालक व गावी दोन हेलिपॅड हा गडगंज संपत्तीचा प्रवास कसा झाला त्याची गुपित जनतेला सांगावे .असेही घाडीगावकर यांनी प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत शेवटच्या दिवशी ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना मातोश्री ते मातोश्री दोन बाबत खालच्या पातळीवर टीका केली होती.खरं तर त्यांनी ठाण्यातील भ्रष्टाचारावर बोलायला हवे होते. ज्या मातोश्रीच्या जीवावर ते मोठे झाले त्याच मातोश्रीवर खालच्या पातळीवर टीका करताना त्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असा टोला घाडीगावकर यांनी लगावला आहे. ते जेव्हा दुसऱ्यांवर आरोप करतात तेव्हा त्यांनी त्यांच्याबाबत ही वस्तुस्थिती जनतेला सांगावी.स्वतः टेम्पो चालक असणारे पण सहानभूती मिळविण्यासाठी रिक्षाचालक म्हणून प्रसिद्धी करणारे व त्यावेळी चाळीत राहणारे आज दोन आलिशान बंगल्यांचे मालक कसे? त्याचबरोबर स्वतःकडे सत्ता असतानाही स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाचा आणि स्वतःच्या गावी शाळा किंवा आरोग्य व्यवस्था न निर्माण करणारे पण गावी दोन हेलीपॅड कशी निर्माण केलीत आणि कोणासाठी? ही प्रगती नेमकी कशी झाली याचे गुपित त्यांनी जनतेला सांगावे असे जाहीर आवाहन संजय घाडीगावकर यांनी दिले आहे.
यामुळे ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून याबाबत आता शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा नरेश म्हस्के काय उत्तर देतात याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. मात्र अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून ठाण्याला ओळख कुणी करून दिली, याबाबत घाडीगावकर यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न योग्य असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
0 टिप्पण्या