गेली ९ वर्षे सातत्याने ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात रंग भरणाऱ्या समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंचाचा नाट्यजल्लोष या वर्षी साने गुरुजी जयंती दिनी, रविवारी २४ डिसेंबर रोजी ठाण्यात कोर्ट नाक्यावर असलेल्या टाउन हॉल मधे संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत संपन्न होणार आहे. हे वर्ष साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे वर्ष असल्याने ‘साने गुरुजी १२५ अभियाना’ अंतर्गत यंदा नाट्यजल्लोषच्या १० व्या पर्वात ‘ध्येयाच्या प्रवासात उत्तराच्या शोधात’ अर्थात ‘आपले ध्येय आपली धडपड’ या थीमवर नाटिका सादर होणार आहेत.
या मधे सावरकर नगर, रमाबाई आंबेडकर नगर, क्रांती नगर, राबोडी, घणसोली, कळवा, मानपाडा, चिराग नगर आदि वस्तीतील एकलव्य युवा सहभागी होणार आहेत. या वेळी नाट्य जल्लोषच्या दशकपूर्ती च्या निमित्ताने नाटिकांबरोबरच नृत्य, गाणी, कविता, अभिवाचन, शॉर्ट फिल्म्स, रील्स सुद्धा सादर केले जाणार आहेत. किसन नगरचा एकलव्य गट एकांकिका सादर करणार आहे. भारतीय महिला फेडरेशन व ज्ञानसाधना महाविद्यालय एन एस एस टीम पथनाट्य, संविधान प्रचारक मंच, अनुबंध व कायद्याने वागा लोक चळवळीचे कार्यकर्ते क्रांती गीते व कवयित्री वृषाली विनायक कविता सादर करणार आहेत.
या उपक्रमात सुरुवातीपासूनच मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रसिद्ध रंगकर्मी प्रतिभाताई मतकरी या वेळी उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर, विश्वस्त ॲड. विजय दिवाणे त्याच बरोबर सिने - नाट्य क्षेत्रातील मिलिंद अधिकारी, अरविंद औंधे, सुप्रिया मतकरी विनोद, विजू माने, उदय सबनीस, रविन्द्र करमरकर, शर्वरी बोरकर, पल्लवी वाघ केळकर, शुभांगी भुजबळ रूपल नंद, संतोष पाठारे आदि दिग्गज मान्यवर या दिवशी मुलांना प्रोत्साहन द्यायला आवर्जुन येणार आहेत, असे नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर यांनी सांगितले.
सर्व संवेदनशील ठाणेकरांनी दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या संख्येने हजर राहून लोकवस्तीतील युवांच्या या आगळ्या वेगळ्या धडपडीला दाद द्यावी, असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक विश्वस्त जगदीश खैरालिया, विश्वस्त लतिका सु. मो. व अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी व या उपक्रमास आर्थिक सहयोग देण्यासाठी, संस्थेचे कार्यकारी सचिव अजय भोसले यांना ८१०८९४९१०२ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या