आरएसएस आणि भाजपासारख्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना या विभाजनवादी विचारांना पेरण्याचे काम करत आहेत. समाजाला तोडण्याचे आणि विभागण्याचे काम इथे सुरू आहे. या देशात जर सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करायची असेल, सर्वसमावेशकतेच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणायचे असेल तर काय केले पाहिजे? या संदर्भातील आराखडा हा नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे २५ डिसेंबर रोजी मांडण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्याकरिता आज प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे उपस्थित होते.
२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून इथली विषमतावादी, विभाजनवादी व्यवस्था नाकारली होती. मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २७ वर्षापासून राज्यभरात भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन केले जाते. मनुस्मृती ही हिंदू व भारतात आलेल्या इतर धर्मातही विषमतावादी आणि विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करते. तर राज्यघटनेच्या माध्यमातून संत चार्वाक, तथागत बुद्ध, महावीर, गुरु नानक, संत कबीर, संत रविदास, संत एकनाथ, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव या संताना अभिप्रेत असलेली समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक सामाजिक व्यवस्था निर्माण करणे ही इथल्या सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांची जबाबदारी होती. संविधानाने संपूर्ण समतेची हमी दिली तरी आजही आपल्या देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था प्रचंड विषमतेची आहे. कायदा संविधानाचा परंतू व्यवस्था मनुस्मृतीची आहे.
लोकसभा विधानसभांमध्ये महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. महिलांमधील शिक्षणाचे प्रमाण चिंताजनक रित्या कमी आहे. दलित, आदिवासी, ओबीसी स्त्रिया गरीबी, बेकारी, निरक्षरता, अत्याचार व भेदभावाच्या बळी आहेत. कारण, आजही ब्राह्मणी वर्चस्वाची व्यवस्था मजबूत आहे, अशा सामाजिकदृष्ट्या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधत प्रकाश आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने नागपूर मध्ये स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यासंदर्भात बोलताना प्रकाश यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच भूमिका जाहीर केली आहे. मात्र काँग्रेस कडून याबाबत भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याविषयी चर्चा केली. इंडिया आघाडीत सहभागा विषयी आमचे वकील म्हणजेच शिवसेना बाजू मांडत असल्याचे ते म्हणाले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले. याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, संसदेची सुरक्षा धोक्यात असताना त्यावर गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी बोलावं अशी मागणी करणे हा खासदारांचा अधिकार आहे. मात्र, त्यांना बोलू न देता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असेल तर ते चूक आहे. त्याबरोबरच उपराष्ट्रपतींनी पदाची गरिमा राखणं आवश्यक आहे. उपराष्ट्रपती आहात म्हणून कसेही वागलात तर ते मान्य नाही. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी पदाची गरिमा राखली नाही तर त्यांची मिमिक्री ही होणारच, १९९६ पर्यंत वॉच अँड वॉर्ड सिक्युरिटी ही संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहत होती. ही सुरक्षा व्यवस्था लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत होती. मात्र, त्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेचा स्टाफ कमी करण्यात आला आणि दिल्ली पोलिसांच्या स्टाफचा अधिक भरणा करण्यात आला. दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी १४१ खासदारांच्या निलंबनावर बोलताना व्यक्त केले.
0 टिप्पण्या