Top Post Ad

भारतीय बौध्द आणि अन्य धर्मीय एक तौलणीक चिकीत्सा

 


स्वयं प्रकाशित व्हा! तुमच्या बुध्दीला जर पटेल तर धर्मांतराला होकार द्या !- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय बौध्द आणि अन्य धर्मीय एक तौलणीक चिकीत्सा या लेख. त्याग करुन बौध्द झालेल्या समूदयाची तुलना हिंदू धर्मातील अनुसुचित जाती जमाती आणि तमाम हिंदू धर्मीय तसेच भारतातील सर्व धर्मीयांच्या विकासाची चिकीत्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातराची कारणीमिमसेबाबत दिलेल्या भाषणाचा सारांश दुसऱ्या भागात मनुष्यबळ विकासाची आठ निर्देशांकाची तौलणीक माहिती (डाटा) जनगणना आयोग २०११ चे सादरीकरण केले आहे. भाग तीन मध्ये निर्देशांकाचे विश्लेषण करण्यात आले असून भाग चार मध्ये निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

भाग - १
१) १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला जि. नाशिक येथून  "मी हिंदू म्हणून जन्मलो । परंतू हिंदू म्हणून मरणार नाही!" अशी घोषणा केली. ३१ मे १९३६ रोजी धर्मांतराबाबत भुमीका निश्चि निश्चित करण्यासाठी परळच्या कामगार मैदानावर अस्पृश्यांतील महारांची परिषद घेतली. त्यांनी धर्मांतराची गरज आणि त्यात धर्मांतराची मुख्य कारणे विषद केली. १९४६ मध्ये शुद्र मुळचे कोण? शुद्र कसे झाले ? हा ग्रंथ लिहिला. १९४८ मध्ये अस्पृश्य मुळचे कोण ? अस्पृश्या कसे झाले ? यावर शोध ग्रंथ लिहिला, भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याची हमी दिली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धर्मपत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ५ लाखापेक्षा जास्त अनुयायांनी बौध्द धम्माची दिक्षा पंचवर्गीय भिक्खुकडून घेतली. पंचशिल, अष्टशिल, ग्रहण स्वतः आणि आपल्या अनुयायांना भिक्खू संघाकडून देण्यात आले. २२ प्रतिज्ञा या धम्मदिक्षा सोहळयात बौध्द अनुयायाकडून ग्रहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला. बौध्द धर्मीयांना  सोप्या भाषेत तसेच बुध्दाच्या संदेशाचा सार असलेला हा ग्रंथ तमाम बौध्दांना मार्गदर्शनिय असा मौलिक ग्रंथ त्यांनी दिला.

२) १९३५ ते १९५६ या २१ वर्षाच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात असलेली धार्मीक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक असमानता आणि त्याच्या उच्चाटनासाठीचे सुत्र मांडले आहे. जन्म, धर्म, वंश जात,, प्रांत, पंथ, रंग याच्या आधारे असलेली देशातील विषमतेचे उच्चाटन करण्यासाठी कायद्या बरोबरचं धर्म आणि धर्मांचे स्वातंत्र आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी "बुध्द धम्माची दिक्षा" घेतली. बुध्द धम्म हा या देशातील विषमताधिष्ट, सामाजिक, धार्मीक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवस्थेला पूर्नचित करण्याचे तंत्र त्यांनी दिले. समता स्वातंत्र, बंधुभाव आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र तथा नवसमाज निर्मितीसाठी गुणकारी औषधच असल्याचे त्यांनी मांडले.

३) नागपूर मुक्कामी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी "आम्ही बौध्द का झालो" या बाबतची कारणेमीमंसा दिक्षाभूमी सोहळयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे. तसेच मुंबई येथील महारांच्या परिषदेतील १९३६ मधील भाषण "मुक्ती कोण पथे" या नावाने प्रकाशित झाले असून तमाम भारतीयांना ही प्रेरणा भाषणे दिपस्तंभासमान आहेत.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला क्षुद्र मुळचे कोण? क्षुद्र कसे झाले ? यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निष्कर्ष काढला की, "क्षुद्र हे मुळचे क्षत्रिय आहेत". तसेच अस्पृश्य मुळचे कोण ? अस्पृश्य कसे झाले या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निष्कर्ष काढला आहे की, "अस्पृश्य मूळचे बौध्द" आहेत. अस्पृश्यांनी ब्राम्हणाचा विरोध केला म्हणून ब्राम्हणांनी बौध्दांवर अस्पृश्यता लादली असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात मांडले आहे. अस्पृश्यतेच्या सर्व सिध्दांताला मोडीत काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य आणि अस्पृश्यता याबाबत नवासिध्दांत मांडला आहे. अस्पृश्यांना "ब्रोकन मेन" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात संबोधले आहे. ब्रोकन मेन हे बौध्द धर्माचे अनुयायी होते. ब्रोकन मेन ब्राम्हणाचा व्देष करत असे कारण ब्राम्हण हे बौध्द धर्माचे शत्रू होते म्हणूनच ब्राम्हणानी ब्रोकन मेनवर अस्पृश्यता लादली कारण ब्रोकन मेन बौध्द धर्म सोडणार नाहीत. अस्पृश्यतेच्या मुळाशी बौध्दांविषयीचा व्देष तथा तिरस्कार हेच कारण असल्याचे त्यांनी मांडले आहे. तसेच ब्रोकन मेनला अस्पृश्य बनण्यामागे बौध्द धर्म आणि ब्राम्हणवाद यांच्यातील व्देष हे एकमेव कारण नसुन ब्राम्हणाने ब्रोकन मेन चा केलेला व्देष आणि तिरस्काराला बौध्दाकडून विरोध केला जात होता, हीच ब्राम्हणांनी ब्रोकन मेनवर अस्पृश्यता लादण्याची भुमीका बजावल्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात नमुद केले आहे. अस्पृश्य हे मुळचे ब्रोकन मेन असून ते बौध्द संस्कृतीचे अनुयायी होते असे या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नमुद केले आहे.

५) भारतात असलेली हजारो वर्षांपासूनची अस्पृश्यता आणि अस्पृश्य लोक याबाबतची माहिती ब्रिटीश काळात जनगणना आयुक्ताने १९११ मध्ये जनगणना सर्वेक्षणाद्वारे संकलीत केली आहे. १९११ च्या जनगणनेत हिंदू आणि अस्पृश्य यांना विभाजीत करण्यासाठी १० चाचण्यापैकी पाच चाचण्या पूर्ण करणाऱ्या जाती जमातीला अस्पृश्य म्हणून गणण्यात आले. त्या ५ चाचण्या १) ब्राम्हण किंवा इतर मान्यता प्राप्त हिंदू गुरुकडून ज्यांना मंत्र मिळत नाही. २) अस्पृश्यांची सेवा चांगल्या ब्राम्हण पुरोहित पुजाऱ्याकडून होत नाही. ३) ब्राम्हण पुरोहीत अजिबात अस्पृश्यांना मिळत नाही. ४) हिंदू मंदीराच्या आतील भागात अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नाही. ५) गोंमांस खातात आणि गायीचा आदर करत नाहीत अश्या हया पाच कसोटयाची पुर्तता करणाऱ्या जाती जमातींना अस्पृश्य म्हणून जनगणना आयोगाने त्यांची गणण्यात आले आणि त्याची स्वतंत्र शिरगणती करण्यात आली.

६) अस्पृश्यतेच्या कारणावरुन कलंकीत असलेल्या सर्व जाती जमातींची स्वतंत्र यादी जनगणना आयोगाने १९३१ मध्ये सुचीबध्द केली. त्या यादीला तथा सुचिला अनुसुचित जाती जमातीसूची म्हणून संबोधले जाते. १९३१ पासून २०११ पर्यंत अस्पृश्यतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती जमातीच्या यादीत अर्तभूत करण्यासाठी असंविधानिक मार्गाने अनेक लढे केले आणि केले जात आहेत. २०११ पर्यंत अनुसुचित जातीच्या यादीत ११०८ जातीचा आणि अनुसुचित जमातीच्या यादीत ७४४ जमातीचा अंर्तभाव संसदेने केला आहे. त्यामुळे सध्या अनुसुचित जाती जमातीच्या यादीत एकुण १८५२ जाती जमातीचा समावेश आहे.

भाग - २
७) जातीयव्यवस्था आणि जातीयव्यवस्थेमुळे देशावर झालेले दुष्परिणाम आणि त्यावर उपाय यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१६ ते १९५६ अशी ४० वर्षे अखंड हिंदू धर्म सुधारकांना लेखना आणि भाषणाद्वारे संबोधीत केले. त्याचा हिंदू धर्माच्या नेते, सुधारक आणि हिंदू धर्म चालकावर सकारात्मक परिणाम झाला नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी "धम्म् दिक्षा" सोहळा घेऊन धर्मांतर केले. धातिर कशासाठी तथा आम्ही बौध्द का झालो याची कारणीमिमसा त्यांनी धम्म दिक्षा सोहळयातील भाषणात मांडले आहे.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना (अनुसुचित जाती जमातींना) अस्पृश्यतेच्या तथा जाती व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जिवनभर लेखन, भाषणे, संघर्ष केले. अनेक लढे अस्पृश्यांच्या मानवी हक्कासाठी लढले. देशातील सर्व नागरिकांना संविधानाव्दारे समान संधी आणि दर्जेची हमी दिली. अस्पृश्यता  कायदयाने मोडीत काढली. अस्पृश्यता पाळणे कायदयाने गुन्हा आहे तसेच अनुसुचित जाती जमातीच्या नागरिकासाठी संविधानात शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय आरक्षणाची विशेष तरतूद केली त्याला संविधान सभेने मंजूरी दिली. तसेच अस्पृश्यता आणि जाती आधारीत भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी नागरी संरक्षण हक्क कायदा, अनुसुचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा, देवदासी प्रतिबंध कायदा, वेठबिगार कामगार निर्मुलन कायदा, किमान वेतन कायदा, समान वेतन कायदा, बालकामगार प्रतिबंध कायदा आणि अर्थसंकल्पात आर्थिक विकासासाठी विशेष घटक योजना सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढयामुळेच अनुसुचित जाती जमातींना समान संधी आणि दर्जेचा हक्क प्राप्त झाला आहे. तसेच संविधान सुसंगत नवाभारत उभा करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या सरनाम्यात संकल्पीत केला आहे.

९) भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याची हमी सर्व भारतीयांना दिली आहे. त्यामुळे जातीय अन्याय अत्याचार, अस्पृश्यतेचा कलंक पुसून सदधम्माच्या वाटेने जाण्याचे चिंतन मनन लाखो नागरिक करीत आहेत. बौध्द धर्म हा विश्वव्यापी धर्म आहे. बौध्द धर्म हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे. भगवान बुध्दाचा धम्म सर्वांसाठी मुक्त आहे. जगभरातील वैज्ञानिक बुध्द धम्माकडे आकर्षीत होत आहे. जगभरात सरासरी ७ टक्के बौध्द धर्माचे अनुयायी आहेत. १९५६ पासून आज तागायत हिंदू धर्माचा त्याग करुन बौध्द जिवन मार्ग स्विकारलेले केवळ ८७ लाख नागरिक २०११ च्या जनगणना सर्वेक्षणात दिसून आले आहेत. भारतात एकुण ६४० जिल्हे आहेत या ६४० जिल्हयांपैकी ७४ जिल्हयांत बौध्द धर्मीयांची पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या आहे.

१०) संविधानातील धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामूळे धर्मातर चळवळीला अल्प गति मिळाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण १२१ कोटी नागरिकापैकी केवळ ८७ लाख बौध्द धर्मीय आहेत. ८७ लाख बौध्दधर्मीयापैकी हिंदू अनुसुचित जातीतून (८८ टक्के) अनुसुचित जमातीतून (९ टक्के) ओबीसीतून (१ टक्का) आणि सर्वसाधारण संवर्गातून (२ टक्के) नागरिकांनी पुर्वाश्रमित हिंदू धर्माचा त्याग करुन बौध्द धर्मीय झाले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीच्या ३० कोटी नागरिकांपैकी जवळपास २९ कोटी नागरिकांचा धर्म हिंदू आहे. हिंदू धर्मातील तत्व, व्यवहार, वारसा आणि निष्ठा जोपासण्यात २९ कोटी अनुसुचित जाती जमातीचे नागरिक गुंतले आहेत.

११) भारतात २९ कोटी अनुसुचित जाती जमातीचे नागरिः विखुरलेले आहेत. जातीय छळ, जातीय अन्याय अत्याचार, अस्पृश्य.. शिदोरी तथा सामाजिक गूलामितून मुक्त होण्यासाठी हिंदूत्वाच्या चौकटीत पथ शोधत आहेत. हिंदू धर्म, हिंदू धर्मांचे तत्वज्ञान, परंपरा रिती, रिवाज, सण, उत्सव आणि हिंदू म्हणून होत असलेला पक्षपाती व्देषमुलक व्यवहाराच्या प्रेमात अनुसुचित जाती जमातीचे हिदू आडकले आहेत

भाग - ३
१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दाची शिकवणूक, त्याचा धम्म त्यांनी निर्माण केलेला भिक्खू संघाकडून "बुध्द धम्म दिक्षा" घेतली आपल्या लाखो अनुयायाला बुध्द धम्म दिक्षा दिली. त्याच बरोबर २२ प्रतिज्ञा आपल्या अनुयायाकडून वधवून घेतल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी सम्राट अशोकोप्प्रमाणे बौध्द धर्माचे खरे नेते, संरक्षक तथा अनुयायी होते. त्यांचा लोकशाहीवर आणि व्यक्तीस्वातत्र्यावर मोठा विश्वास होता. प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या काळात भारत जगामधील वैभवशाली देश होता. भारताला सम्राट अशोक कालीन वैभवशाली बनवण्यासाठी बौध्द धर्मांचा त्यांनी स्विकार केला. धर्मांतराच्या घोषणेच्या दिवसापासून आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक धर्मांतराच्या निर्णयाविरोधात तथा बुध्द धम्म चळवळीच्या यश अपयशाबद्दल अनेक टिका टिपणी करतात. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करुन बौध्द धर्मांची स्विकार केलेले बौध्द आणि हिंदू धर्मीयाच्या विकासाची चिकीत्सा गुणात्मक आणि संख्यात्मक तटस्थ पध्दतीने होणे आवश्यक आहे. धर्मांतराची फल निष्पती यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले आहे. तसेच जनगणना आयोगाने सर्व धर्मीयांची लोकसंख्या शास्त्रीय माहिती दर दहा वर्षांनी सकलीत केली जाते, जनगणना आयोगाने लोकसंख्या शास्त्रीय संकलीत केलेली माहिती आणि आचार्य पदवीसाठी संशोधकांनी केलेल्या संशांधनाच्या आधारे बौध्द धर्मीय आणि हिंदू धर्मातील अनुसुचित जाती जमाती, हिंदू धर्मीय आणि देशातील सर्व धर्मीय नागरिकाच्या विकासाची तौलनिक चिकीत्सा मी या लेखात करण्यात प्रयत्न केला आहे. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या, लोकसंख्येतील वाढ, जातीची संख्या, साक्षरता, स्त्रि पूरुष गुणोत्तर प्रमाण, कुटूंब संख्या, प्रजाजन क्षमता दर आणि वयोमान हे निर्देशांक चिकीत्सक अभ्यासासाठी निर्देशांक म्हणून निवडले आहे.


विश्लेषण :
१) २०११ च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटी आहे. त्यापैकी ९६ कोटी हिंदू धर्मीय, ९६ कोटी हिंदू धर्मीयापैकी २० कोटी अनुसुचित जाती हिंदू, १० कोटी अनुसुचित जमातीचे हिंदू आणि हिंदू धर्माचा त्याग करुन बौध्द झालेले केवळ ८७ लाख बौध्द धर्मीय नागरिक आहेत. त्यामुळे धर्मांतराची गती फारच अल्प आहे.

२) राष्ट्रपतीने जाहिर केलेल्या राजपत्रानुसार २०३१ जाती हया अनुसुचित जाती जमातीच्या सुचित आहेत. या यादीत अनेक जाती संविधानिक सवलतीसाठी घुसण्याचा असंविधानिक मागनि प्रयत्न करीत आहेत.

३) भारत सरकाने अनुसुचित जातीतून बौध्द धर्मात धर्मांतरीत झालेल्या अनुसुचित जातीच्या नागरिकाच्या संविधानिक सवलीती १९५६ पासून १९९० पर्यंत नाकारल्या होत्या. तसेच १९९० पासून धर्मांने बौध्द आणि पुर्वाश्रमित अनुसुचित जाती जमातीचा उल्लेख जनगण सर्वेक्षणात नोंदविल्या शिवाय त्या नागरिकाची नोंद अनुसुची जाती जमातीत केली जात नाही. या शासनाच्या आदेशामुळे हजारो धर्मांतरीत बौध्दांच्या नोंदी बौध्दांच्या तसेच अनुसुचित जातीच्या लोकसंख्येत समावेशित केली जात नाही. महाराष्ट्र सरकारद्वारे नवबौध्द असे अनुसुचित जातीतून धर्मातरीत बौध्दांना दिले जाते.  महाराष्ट्रातील बौध्द स्वतःला नवबौध्द समजतात त्यामुळे नवबौध्द नावाचा धर्म जनगणना सर्वेक्षणात बौध्द धर्मीय म्हणून नोंदवीला जात नाही. त्या शिरगंती अचुक झाली आहे असे म्हणणे उचित नाही.

४) २०११च्या जनगणनेनुसार देशातील नागरिकाची सरासरी साक्षरता ७. बौध्द धर्मीयाची साक्षरता ८४ टक्के आहे. हिंदू धर्मीयांची साक्षरता ६३.६ टक्के हिंदू अनुसुचित जातीची साक्षरता ६२.८५ टक्के हिंदू अनुसुचित जमातीची साक्षरता ५९ टक्के आहे. साक्षरतेच्या बाबतील बौध्द धर्मीय सर्वांपेक्षा सर्वाधिक साक्षर आहेत. देशाच्या सरासरीपेक्षाही बौध्दांची साक्षरता १० टक्क्यांनी जास्त आहे. आणि हिंदू धर्मीयांपेक्षा २० टक्क्यांनी बौध्दांची साक्षरता जास्त आहे.

५) देशाची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. वाढत असलेल्या लोकसख्येचा भार बेकारी आणि अन्य भौतिक सामाजिक सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शाळा, अनधान्याचा पुरवठयावर भार पडत असतो त्यामूळे लोकसंख्या वाढ ही कमीत कमी असावी अशी शासनाची धारणा आहे. २०११ च्या जनगणना आयोगाची आकडेवारी पाहता बौध्दांची २००१ च्या जनगणनेची तुलना २०११ च्या जनगणनेशी केली असता बौध्दांची लोकसंख्या वाढ दर देशाच्या सरासरी लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. हे देशाच्या हिंताचे आणि शासन धोरण सुसंगत आहे.

६) भारत सरकारद्वारे "बेटी बचाव ! बेटी पढाव !" मोहीम राबवली जात आहे. तसेच गर्भलिग चाचणीला शासनाने प्रतिबंध केला आहे. गर्भलिंग चाचणी करुन गर्भलिंग चाचणीत मुलगी आढळल्यास त्या गर्भाची हत्याकरण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. ही प्रवृती अमानवी आणि स्त्रीलिंग विरोधी आहे. म्हणून स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाणाची पडताळी करण्याचा प्रघात गेली अनेक वर्षांपासून आपल्या देशात आहे. त्यासाठी स्त्री पुरुष गुणोत्तर जनगणना आयोग संकलित करत असते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १००० पुरुषामागे सरासरी ९४३ स्त्रीया असे प्रमाण आहे. हिंदू धर्मीयामध्ये ९३९, बौध्दाधर्मीयामध्ये ९५५ असे प्रमाण आहे. हिंदू आणि बौध्द धर्मीय यांची स्त्री पुरुष गुणोत्तर निर्देशांकाची पडताळणी केली असता. बौध्द धर्मीया १००० पुरुषामागे ९५५ स्त्रीया हे देशाच्या सरासरी आणि हिंदू धर्मीयापेक्षा १६ ने जास्त आहे.

७) सरकारद्वारे लहान कुटूंबाचा प्रचार केला जात आहे. "हम दो हमारा एक" हे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी प्रत्येक १० वर्षांला दर १०० री होणारी बालकांतील वाढ हा प्रजाजन दर म्हणून ओळखला जातो. २०११ च्या जनगणनेनुसार दर १०० ला २.२० हिंदू मध्ये, ३.३० बौध्दामध्ये २.९० असा प्रजाजन दर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. हिंदू आणि बौध्द धर्मीयांचा प्रजाजन दराची तुलना केली असता बौध्दांचा प्रजाजन क्षमता दर हा हिंदू धर्मीयापेक्षा ०.४० ने कमी आहे. बौध्दांची प्रवृत्ती लोकसंख्या नियंत्रणाला पुरक ठरणारी आहे.

८) २०११ च्या जनगणनेनुसार भारतीयांचे सरासरी वयोमान ६३ वर्षे आहे. हिंदू चे वयोमान ६५ वर्षे आहे. तर बौध्दांचे वयोमान ६८ वर्षे आहे. हिंदू अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि देशाचे सरासरी आयुमान बौध्दांपेक्षा कमी आहे.

भाग - ४
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या कारणाची मिमांसा करताना अपेक्षित असलेले उद्दिष्ट साध्य झाले का? तसेच होत आहे यावर अनेक संशोधकानी संशोधन केले आहे. जनगणना आयोगाच्या निष्कर्षांशी सुसंगत निष्कर्ष संशोसथकानी काढले आहेत. धर्मांतरीत बौध्दांच्या दृष्टीकोनात धर्मांतरामुळे अमुलाग्र फेरबदल झाला आहे. हिंदू धर्मीय अनुसुचीजाती जमातीपेक्षा आणि हिंदू धर्मीयापेक्षा शिक्षणाच्या बाबतीत धर्मांतरीत बौध्द अग्रेसर आहेत.

१०) धर्मांतरीत बौध्दांची जिवन जगण्याची शैलीच बुध्द धम्म सुसंगत झाली आहे. बौध्द धर्मीयांच्या जिवनावर बुध्द शिकवणूकीचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे बौध्द संस्कृतीचे पुर्नजिवन झाले आहे. सर्व धर्मीयापेक्षा बौध्दाचे आयुमान तथा जगण्याचे वय अन्य धर्मीयापेक्षा जास्त आहे. धर्मातरीत बौध्दांनी धर्मांतरापुर्वीच्या परंपरागत हिंदू धर्मीय विश्वास आणि अर्धश्रध्देला सोडचिट्टी दिली आहे. शांततामय तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यात धर्मातरीत बौध्द अग्रेसर आहेत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

११) धर्मांतरित बौध्दांनी हिंदू धर्मातील बौध्द धर्माशी विसंगत वर्तनाला सोडचिट्टी दिली आहे. बौध्द संस्कृतीच्या नव्या खाणाखुना निर्माण करण्याची दृष्टी त्याच्यात निर्माण झाली आहे. प्राचीन कालीन बौध्द संस्कृतीचे अवशेष, लेण्या, पाली साहित्याच्या संरक्षणासाठी चळवळ करीत आहे. त्रिशरण, पंचशिल, आर्य आष्टांगिक मार्ग, दसपारमिताचे आचरण आणि बावीस प्रतिज्ञा धर्मांतरीत बौध्दांचा जिवन मार्ग झाला आहे.

१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धर्मांतराची चळवळ व तिची गती अल्प आहे मात्र धर्मांतरीत झालेल्या बौध्दांची संस्कृती सदधम्माला पुरक पोषक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा पूर्ण करणारी झाली आहे. धर्मांतरीत बौध्दांनी धर्मातराच्या ६१ वर्षांत बौध्द संस्कृतीचे नवे भारतीय मॉडेल विकसित केले आहे. विशेषतः बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा स्वतंत्र भिक्खू संघ आणि श्रध्दावान उपासकाच्या संघटीत समुदाय भारत बौध्दमय करण्याच्या दिशेने कार्यरत झाला आहे. सर्व भारतीयांना नम्र आव्हान आहे की, त्यांनी धर्मातरीत बौध्दांच्या सदधम्म चळवळीकडे डोळसपणे पाहावे. "स्वयंप्रकाशित व्हावे!" संविधानमुल्क बौध्द संस्कृतीचे लाभार्थी होऊन दुःख मुक्त जिवनाचा आनंद घ्यावा देशाला वैभवशाली बनवण्यात हातभार लावावा ।

  • प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर ... मो. नं 9930958025
  • एम.कॉम, एम.एम.एस, एम.एड, एल.एल.बी, पीएच.डी


प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर सध्या सत्याग्रह महाविदयालय, नवी मुंबई येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणतज्ञ, प्रोफेसर, सामाजिक, धार्मीक, राजकिय, शैक्षणिक चळवळीचे विश्लेषक, स्तभ लेखक, संशोधन मार्गदर्शक आहेत. १० ग्रंथाचे लेखक असून भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सर्व धर्मीय नागरिकांना धम्म प्रचार प्रसारासाठी विनामुल्य आहेत. धर्मांतरीत बौध्दांच्या दृष्टीकोनात धर्मांतरामुळे अमुलाग्र फेरबदल झाला आहे. हिंदू धर्मीय अनुसुचीजाती जमातीपेक्षा आणि हिंदू धर्मीयापेक्षा शिक्षणाच्या बाबतीत धर्मांतरीत बौध्द अग्रेसर आहेत,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com