Top Post Ad

नशीब समजा... ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते...

 


 नशीब समजा, ते तरुण पाकिस्तानी अतिरेकी नव्हते...त्यांचे उपकार माना, ज्यांनी तुमच्या टुकार-भिकार सुरक्षायंत्रणेतली भगदाडं दाखवून दिली...!!!
सर्वप्रथम, २० हजार कोटींचा 'सेंट्रल-व्हिस्टा' प्रकल्प (तथाकथित अमृतकाळात, सगळी ब्रिटीश व मोगल-राजवटीतली नावं बदलली जात असताना, 'सेंट्रल-व्हिस्टा' हे इंग्रजी नाव ठेवलं जातं किंवा गुजराथच्या 'अहमदाबाद'चं नाव बदललं जात नाही, हे विशेषच) बांधणाऱ्या भाजपाई 'वास्तुविशारदा'ला तुरुंगात टाका, ज्याने जेमतेम ६ फूट उंचीवर प्रेक्षक-कक्ष (Visitors' Gallery) उभारला...मग, पुढच्या बाता मारा!
ते तरुण आणि ती तरुणी, कुणी दहशतवादी होते की, आतंकवादी? भले, त्यांचा मार्ग वरकरणी चुकीचा असला व ते निखालस दुःसाहस असलं...तरी, त्याला मनमानी पद्धतीने एवढी गंभीर कलमं लावायची??
...कुठल्या घोषणा देत होते ते? 'जय भीम' आणि 'भारत माता की जय' अशाच ना? अशा घोषणा देणारे निःशस्त्र आंदोलक; जर देशद्रोही असतील; तर, यांच्या लेखी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हीआम्ही, राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' न चुकता उद्घोष करत भारतमातेवर निरतिशय प्रेम करणारे, सारेच देशद्रोही ठरतो!  

...काय वयं आहेत हो, त्या पोरांची? भगतसिंग तरुण होता, म्हणूनच भडक माथ्याचा होता, तो अमित मालवीयसारखा पन्नाशी ओलांडलेला आणि अर्ध्याहून अधिक लाकडं स्मशानात गेलेला नव्हता. तेव्हा, या 'व्यवस्थे'त भरडून निघालेल्या तरुणाईला, जरा प्रेमाने समजून घ्यायला नको...ते काय कुणाचे जीव घ्यायला निघाले होते की, काय? ते ही, कुठेतरी भगतसिंगासारखेच तारुण्यसुलभ भडक माथ्याचे आहेत ना...देशाची सद्यस्थिती पाहून आतून भडकले असतील, झाला असेल थोडाबहुत उद्रेक...पण, तो काय भाजून काढणारा ज्वालामुखीचा उद्रेक होता की, काय? साधा निर्विष पिवळा धूरच सोडला ना त्यांनी??
...सध्या 'स्वातंत्र्याची दुसरी लढाई' या देशात लढली जात असताना, या नवथर तरुणांची 'भगतसिंगां'शी तुलना करायला, म्हणूनच काही हरकत नसावी.
देशात 'न्याय, सत्यता आणि व्यक्तिस्वातंत्र्या'चा पूर्ण 'संकोच' झाला असताना; ही वाट चुकलेली वैफल्यग्रस्त पोरं, देशातल्या तरुणाईचं 'प्रतिनिधित्व' करतायत...हे बिलकूल विसरुन चालणार नाही. इतर कुठल्या पद्धतीने ते निषेध व्यक्त करणार होते, कुणी सांगावं तरी? आमच्यासारख्या तब्बल चार दशकांहून अधिककाळ समाजकारणात-राजकारणात घालवणार्‍याला, या देशातली सध्याची 'गोदी-मिडीया' व्यक्त होण्यासाठी, धड 'अवकाश' उपलब्ध करुन देत नसेल, 'राजकीय व सामाजिक बहिष्कृता'चं (खरंतरं, 'राजकीय-अस्पृश्यते'चं) जीणं जगणं आम्हाला भाग पाडलं जात असेल...तर, गुजराथ-मारवाडी बापजाद्यांच्या मालकीच्या असलेल्या 'गोदी-मिडीया'तून ही तरुण पोरं, कधि आणि कशी व्यक्त होऊ शकली असती? कुणाला फसवू पहाताय, कुणाची दिशाभूल करताय (कुणीतरी पूर्वी, या गोदी-मिडीयातल्या 'मेंदूविक्या' दलाल पत्रकारांना व त्यांच्या संपादकांना 'प्रेस्टिट्यूट्स्' म्हटल्याचंही, या निमित्ताने आठवलं, हो)??

"भगतसिंगांना, म. गांधींनी शक्य असूनही वाचवलं नाही", असा कायमच बेशरम, निखालस खोटा आरोप करणारे संघीय-भाजपाई लोकं, आता नव्या पिढीतल्या, भगतसिंगाच्याच वाटेवर चालणाऱ्यांना, एकप्रकारे फासावर लटकविण्यासाठी आपली पाशवी ताकद वापरत असताना, हा देश पहातोय, हे लक्षात ठेवा
'अमित मालवीय पंथीय' लोकांच्या दुर्दैवाने, हा देश जातधर्मीय 'विद्वेषाच्या झापडां'नी अजून पुरता 'आंधळा' झालेला नाही. तेव्हा, सैतानी-सत्तेच्या धुंदीत चाललेला तुमचा नंगानाच, त्यांना खचितच दिसतोय, हे विसरु नका...श्रीकृष्णाच्या 'कर्मसिद्धांता'नुसार त्या महापातकांचा हिशोब, तुम्हाला कधि ना कधि चुकता करावाच लागेल, संघियांनो! आणि, समजा, न द्यावा लागला हिशोब...तर मग ते महाभारतही खोटं, तो गीता सांगणारा कृष्णही खोटा आणि ज्याचं अयोध्येत भांडवलदारांच्या काळ्या पैशातून भव्यदिव्य 'मंदिर' तुम्ही बांधताय...तो 'राम'ही खोटा, खुशाल समजा! 
...त्या तरुणांची, कसाबशी तुलना करणाऱ्या अमित मालवीयसारख्यांचे मेंदू तपासून घ्याच...तहहयात, आपल्या काळ्या अंतरी 'विद्वेषाची धुनी' चेतवणाऱ्या, समाजाचे लचके तोडणार्‍या या 'गिधाडां'च्या मेंदुच्या संरचनेतच मोठा बिघाड झालाय. म्हणूनच, त्या भाजपा 'आयटी-सेल'वाल्या, अमित 'मालवीय'ला 'जागतिक तापमानवाढी'तून महासागरात बुडू पहाणाऱ्या 'मालदीव'ला पाठवून द्या (नाहीतरी, सध्या मालदीव-सरकारने मोदींनी २०१९ला सही केलेला 'हायड्रॉलाॅजी-करार' एकतर्फी रद्द करुन भारतीय परराष्ट्र धोरणाची लक्तरं वेशीवर टांगलीयतच)!

खरंतरं, या तरुणांच्या मनात-अंतःकरणात कुठलाही गुन्हेगारी अभिनिवेश (Mens Rea) नसल्यानेच, हा कुठलाही गुन्हा नाहीच; फारतर, ते दुःसाहस आहे. त्याची थोडक्यात काय सजा द्यायची ती द्या (खरंतरं, त्याचीही गरज नाही). ज्यांची काॅलर पकडून एक गरीब खेडूत स्त्री देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरुंना विचारती झाली होती, "सांगा, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने माझा काय फायदा झाला?"...त्यावर, संवेदनशील व तरल बुद्धीचे आपले महान पंतप्रधान व देशातल्या लहानग्यांचे लाडके 'चाचा नेहरु' म्हणाले होते, "हो, या देशाच्या पंतप्रधानाची काॅलर धरण्याचा 'लोकशाही-हक्क' तुला स्वातंत्र्याने दिलाय"...आभाळाएवढ्या उदार अंतःकरणाचे पं नेहरु आज, पंतप्रधान म्हणून हयात असते तर?
आज, पं. नेहरुंच्या अनुपस्थित, असली काही...मनाच्या मोठेपणाची, व्यक्तित्वाच्या महानतेची; आपल्या एखाद्या वादळी स्वप्नात तरी, आपण साधी कल्पना करु शकतो काय? इथे एका गोष्टीची, आवर्जून आठवणं करणं गरजेचं आहे की, "राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधींनी, त्यांचे पती व भारताचे भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी, यांच्या मारेकर्‍यांना मोठ्या मनाने माफ केलं होतं!

...तेव्हा, यासंदर्भात, लक्षात घेणं गरजेचं आहे की, हा 'अमृतकाळ' वगैरे नव्हेच; हा 'विषामृत' काळ आहे...देशातल्या तरुणाईसाठी, तळागाळातल्या शेतकरी-कामगार-पोलिस-लष्करी जवानांसाठी हा 'विषा'समान काळ आहे; तर, अदानी-अंबानीसारख्या मोजक्या भांडवलदारांसाठी आणि विद्वेषाच्या राजकारणातून तिजोर्‍या खच्चून भरणाऱ्या भाडखाऊंसाठी 'अमृता'समान आहे!
ज्या खासदारांनी... त्या निव्वळ, रक्तपिपासू-निर्मम-शोषक 'व्यवस्थे'ला (Vampire-State System) विरोध दर्शवू पहाणार्‍या, निशःस्त्र तरुणांना बदडून काढलं...ते कुणीही असोत, कुठल्याही पक्षाचे असोत; त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहीजेत...अन्यथा, कायदे बनवणारेच, जर अशाप्रकारे कुठलंही संयुक्तिक कारण नसताना, कायदा हातात घेणार असतील...तर, तोच या देशातला 'बेकायदेशीर प्रघात' रुढ होईल. भारतीय संसदेला आपल्या राष्ट्रपित्याने 'वेश्यागृह' का म्हटलं होतं, ते एकूणच आजच्या संसद सभागृहाचं, या तरुणाईच्या निषेधात्मक आंदोलनादरम्यानचं व आदोलनानंतरचं लाजिरवाणं वर्तन पाहून कळतं (बोगस-बनावट 'हिंदुत्व'वाद्यांची, तर साध्या पिवळ्या रंगाच्या फुसक्या बाराने, पिवळी झालेली, या देशाने पाह्यलीय, अजून किती यांच्या अब्रूची लक्तरं निघालेली पहायचं बाकी राह्यलंय?)!
निवडून आलेली सरकारं निर्लज्जपणे आमदार खरेदी करुन पाडणार, EVMचा निवडणुकीतला गैरवापर तुम्ही जबरदस्तीने चालूच ठेवणार, आंदोलनं बदनाम करुन चिरडून टाकणार, मनमानी पद्धतीने बुलडोझर फिरवणार, न्यायालयंसुद्धा प्रसंगी खिशात टाकणार, संसदेत तर राजरोज अधिवेशन-सत्र धड चालवण्याऐवजी 'निलंबन-सत्र' चालवणार...मग, तरुणाईची माथी काय बर्फासारखी थंडगार रहाण्याची अपेक्षा बाळगताय होय?

...आम्ही त्या तरुणांच्या दुःसाहसाचं, त्यांच्या कृत्याचं अजिबात समर्थन करत नसलो; तरीही त्यांच्या कायदाबाह्य कृतितून का होईना, पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न...आम जनतेच्या आणि देशातल्या लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून फार फार महत्त्वाचे आहेत...त्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांच्यावरचे राजकीय-इलाज कोण आणि कधि करणार, हे सांगा? त्यामुळेच, आजच सांगतो की, आम्ही 'धर्मराज्य पक्षा'च्या व्यासपीठावरुन महाराष्ट्राच्या, त्या 'अमोल शिंदे' नामक तरुणाचा जाहीर सत्कार करणार आहोत...UAPAसारखी दहशतवादविरोधी कायद्याची खोटी गंभीर कलमं लावून तरुणपिढीला धडा शिकवू पहाणाऱ्या, भांडवलदारांच्या दलाल गधड्यांनो, जास्त अन्याय-अत्याचार, दिल्ली-पोलिसांकरवी त्या पोरांवर पोलिस-कोठडीत डांबून कराल; तर, हा देश आणि भारत देशातला हा, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र-देश, गपगुमान सहन करणार नाही...लोकसभा-निवडणूक-२०२४च्या मतपेटीतून (फक्त, निवडणूक EVM वर नको, हिंमत असेल तर बॅलेट-पेपरवर होऊ द्यात, मग बघाच!) धडा, तुम्हाला शिकवला जाईल!

            || जय महाराष्ट्र, जय हिंद ||
            (संयुक्त-महाराष्ट्रानंतर, आता 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, 'स्वायत्त-महाराष्ट्र'...'शिवछत्रपती-राष्ट्र'!)

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com