'सध्या सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखो रुपये वाटप करत आहेत. त्याप्रमाणेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनाही सरकारने आर्थिक मदत द्यावी. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारने मराठा समाजाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ही गंभीर बाब आहे. ओबीसी समाजाच्या अध्यक्षाची व सदस्यांची सरकारने हाकलपट्टी केल्याचा आरोप करीत 'मराठा समाजाने 70 वर्षे सत्ता भोगली आहे. आमच्या हाती पाच वर्षे सत्ता द्या सगळ्या समाजाला न्याय देवू असे, असे ओबीसी समाजाचे नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजानेही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसीचे हे आंदोलन प्रत्येक तालुका, जिल्हा आणि मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी आज पंढरपुरात केली आहे. 'जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईमध्ये आंदोलन आयोजित केले आहे. आम्ही देखील आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे शेंडगे म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये, तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज 2024 च्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपुरात धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे आले असता त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे २० जानेवारी रोजी पायी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. वाटेत त्यांच्यासोबत मराठा बांधव जोडले जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयक ५०० ट्रॅक्टर मुंबईला घेऊन जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यासाठी सध्या गावागावांत बैठका सुरू आहेत. मुंबईमध्ये ट्रॅक्टर नेऊ नये याबाबत ट्रॅक्टर मालकांना ठिकठिकाणी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. यानंतरही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि समाजातील ट्रॅक्टर मालकांनी नोटिसा धुडकावून मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीत ट्रॅक्टर नेण्याचे नियोजन सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून ५०० ते ७०० ट्रॅक्टरचे नियोजन सुरू आहे, असं मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी सांगितले आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून २० जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघतील. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी मात्र आंदोलकांना मोलाचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांचं मुंबईत स्वागतच आहे. मात्र, आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याचं भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, मराठा आरक्षणाचा विषय इतका सोपा नाही. पहिले सरकार बरं-बरं बोलत होतं. आता खरं खरं बोलत आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल. राज्य सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतली, सर्व गोष्टी क्लियर करायला हव्या होत्या. अजूनही सरकारने स्पष्ट बोलायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा जरांगे यांना समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे ही वेळ आली आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी सरकारवरही निशाणा साधला.
0 टिप्पण्या