"मला चिड येत नाही हा माझा गुन्हा,
दोष देऊ कुन्हा... दोष देऊ कुन्हा".
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री नाम. अजित दादा पवार यांनी सतेज पाटील यांच्या पी एच डी संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पी एच डी करून काय दिवे लावणार? अशा पद्धतीचे उत्तर दिलं. सदर विषय हा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यासंदर्भात होता, एकूणच मागील कालखंडामध्ये बार्टी संस्थेच्या अंतर्गत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा विषय चर्चेत आला होता, त्यातून सरसकट विद्यार्थ्यांना सारथी व महाज्योतीच्या धर्तीवर पीएचडी देण्याचा मागणी होत आहे,
आजही पुण्यामध्ये बार्टी कार्यालयाच्या समोरच विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. सातत्याने या विषयावर आंदोलन होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उच्च शिक्षणासारख्या संवेदनशील विषयाबद्दल चेष्टा केल्यासारखं मंत्री महोदयांनी बोलणं हे योग्य नाही. ते स्वतःही आपलं शिक्षण पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे कदाचित त्यांना पीएचडी चे महत्व काय कळणार नाही, संशोधन करणे, विषयाचा सखोल अभ्यास करणे, हा एक वेगळा प्रांत आहे आणि त्यांना आपण सन्मान हा दिलाच पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने दुर्बल घटकातील अनेक लोक शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षणाच्या संध्या उपलब्ध होत आहेत आणि शिष्यवृत्ती आहे म्हणून शिक्षणही पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे, अशा परिस्थितीमध्ये गाव गाड्यांमध्ये पारावर चर्चा करतात तशा पद्धतीचं वक्तव्य करणे हे राज्यकर्त्यांना शोभत नाही.
मान नाम. अजितदादा हेही विद्या प्रतिष्ठान व रयत सारख्या शिक्षण संस्था चालवणारी लोक आहेत, प्रश्न विचारणारे सतेज पाटील हे ही शिक्षणाचे साम्राज्य चालवणारे लोक आहेत, मात्र या सर्व प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मागासवर्गीय समुदायातील लोकप्रतिनिधी यावर काहीच भूमिका घेताना दिसले नाहीत किंवा प्रसारमाध्यमांमध्ये ते कळलं नाही किंवा ते दाखवलं नाही अशी परिस्थिती आहे. सदर प्रकार गंभीर असून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचं गीत लोककवी वामनदादा कर्डक यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गायलेलं तसेच आज-काल अनिरुद्ध वनकर त्यांच्या शैलीमध्ये जे सातत्याने आपण पाहतो त्याची आठवण येते. "मला चिड येत नाही हा माझा गुन्हा, दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा".
- प्रवीण मोरे
- रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता
- खारघर,नवी मुंबई
0 टिप्पण्या