Top Post Ad

राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई

 राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई

१४० वाहनांची पाहणी, दोन वाहनांना दंड

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी, पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या दोन गाड्यांवर कारवाई केली.  आतापर्यंत, महिनाभरात अशा १३८ वाहनांवर कारवाई करून ०५ लाख १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कचरा जाळणाऱ्या ५३ घटना नोंदवण्यात आल्या असून त्यांच्याकडून दंडापोटी ०२ लाख ०९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण १४० डम्पर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी दोन वाहने बांधकामाचा राडारोडा ठाण्याच्या हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. हे भरारी पथक या परिसरात अशाचप्रकारे अचानक भेट देऊन कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.  त्याचबरोबर, ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डम्परला राडारोडा वाहतुकीचा स्कॅन कोड असणे बंधनकारक आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेचा राडारोडा वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे. त्याचबरोबर, गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणे आवश्यक आहे. तसे याची माहिती देणारा फलक या भागात लावला जाणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ/ धूराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा/डेब्रिजची (C & D Waste) विना- आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल-बेकरीमधून होणारे धूळ/ धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास, वाहनांचे अवैध पार्किंग, इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरीक हेल्पलाईनवर व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात. ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत २२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. 

             


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com