Top Post Ad

यामुळे भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या दर्जाबाबत मोठा विरोधाभास

 


डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून 96 वर्षे झालीत, तरीही आम्हाला पुन्हा-पुन्हा मनुस्मृती जाळावीच लागते आणि नव्हे ती जाळली गेलीच पाहिजे. आज एकविसाव्या शतकात वावरत असताना आमची बंधने दूर झालीत का?   स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण हा कितपत बदलला ? आजही समाजात आम्हाला निर्धास्तपणे का वावरता येत नाही? एखादी घटना घडली तर महिलेलाच दोष का देण्यात येतो? जाण्या-येण्याच्या वावरण्याच्या वेळी तिलाच पाळण्यात याव्या म्हणून का सांगितले जाते? तिच्या पोशाखाबद्दल का बोलले जाते? काय समाजात, कुटुंबात वावरताना ही सर्व बंधने तिच्यासाठीच? तसाही स्त्रियांचा विचार केला तर स्त्री ही स्वतच्या कुटुंबाच्या, समाजाच्या मर्यादा जपणारीच असते. ती स्वतच्या सुरक्षेसाठी स्वतची बंधने स्वतच निर्माण करीत असते आणि ते तिने निर्माण करणे आवश्यकता आहेत. पण पुरुष जातीच काय? पुरुषांना मर्यादा नकोत? त्यांना बंधने नकोत? स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची दोन चाके आहेत. या रथाच एक चाक दुर्बळ केले किंवा काढून टाकले तर हा रथ समोर जाण्यास कितपत यशस्वी ठरेल? हे सर्व कळत असतानाही क्षणोक्षणी, दर एक घटकेला स्त्री अपमानित होताना दिसते. एका बाजुला विद्येची देवता सरस्वती, संपत्तीची देवता लक्ष्मी तर शक्तीची देवता दुर्गा, महाकाली अशा अनेकविध दगडांच्या मूर्तीरुपात स्त्रीरुपाला पुजणारा हा समाज स्वत दगड झाला का? ज्यावेळी चार वर्षाच्या निष्पाप बालिकेपासून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱया आजीपर्यंतच्या स्त्रीला तो आपल्या वासनेचा शिकार बनवितो, तेव्हा विविधरुपात पुजल्या जाणाऱया देवता त्याला आठवत नाही का?  एका बाजुला `मातृ देवो भव' म्हणायचे आणि दुसऱया बाजुला याच विद्यवानांनी  लिहायचे `ढोल शूद्र पशू नारी सब तांडव के अधिकारी' काय विपर्यास चालविला या स्त्राr जातीचा. या सर्वांची बीजे पेरलेली दिसतात ते मनुच्या स्मृती ग्रंथात आणि म्हणून आम्ही मनुस्मृती जाळतो. काय म्हणतो हा मनू पंडित. 

पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने
रक्षति स्थविर पूत्रा, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती
म्हणजे बालवयात पिता, तरुण वयात पती व म्हातारवयात पुत्रानीच स्त्रीचा सांभाळ करावा. कारण ती स्वतंत्रपणे जगू शकत नाही. नव्हे तो तिला अधिकारच नाही. या मनुने निर्मिलेल्या समाजव्यवस्थेत ब्राम्हणाला सर्वोच्च स्थान देण्यात मनुस्मृतीचा अधिकांश भाग खर्ची पडलेला दिसतो. हे सर्व करीत असताना वर्णव्यवस्थेत शूद्राला अत्यंत निम्न व तुच्छ स्थान देण्यास मनूचा फार मोठा हात आहे.  मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात स्पर्श व अस्पर्श याचे विस्तृत विवेचन केले आहे. या अध्यायात अनेक प्रकारची अस्पृश्यता वर्णन केलेली आहे. यात मुलाला जन्म घालणारी आई व मुलाचे वडील दहा दिवस अस्पर्श ठरतात. चांडालाच्या स्पर्शाने माणूसच अपवित्र होत नाही तर निर्जिव वस्त्र व धान्य देखील अपवित्र होते असेही या अध्यायात म्हटले आहे. म्हणजेच एकंदरीत अस्पृश्यतेच्या कुप्रथेचे जनकलही मनुच्याच पदरी पडते. शूद्रासारखेच मनुचे स्त्रीजातीशीही विशेष भांडण दिसते. स्त्रियांविषयी जितक्या प्रतिकूल गोष्टी मनुने लिहिल्या आहेत, तितक्या जगात कोणीही लिहिल्या असल्याचे आढळत नाही. भारतीय स्त्री जीवनाला मनुने उद्ध्वस्त करुन टाकले आहे. मग ती ब्राम्हण स्त्री असो की, शूद्र मनुच्या दृष्टीने ती फक्त स्त्री आहे आणि त्याच्या दृष्टीने प्रत्येक स्त्री पतिता आहे. ती स्वभावत व्यभिचारीणी आहे असे पक्के मत मनुने बनवून टाकले आहे. पण दर एक व्यभिचारी स्त्रीच्या बरोबर एक व्यभिचारी पुरुष देखील असतो. हे मनू का विसरला कोण जाणे. स्त्री जातीच्या विरुध्द मनुने केलेल्या धर्माज्ञांची मोठी जंत्रीच आहे. त्यातील काही उदाहरणे पुढीलप्रमाणे, मनुस्मृतीच्या दुसऱया अध्यायात मनु म्हणतो, `सहज शृंगार चेष्टेने मोहीत करुन पुरुषास दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. वास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहत नाही. देह धर्मामुळे कामक्रोधाच्या आधीन होणाऱया अविद्वान व विद्वान पुरुषासही स्त्रिया उन्मार्गी बनविण्यास समर्थ आहेत. मनुस्मृतीच्या तिसऱया अध्यायात मनु म्हणतो, `स्त्री जर वस्त्रे, भूषणे इत्यादी शोभादायी पदार्थाच्या योगाने सुशोभित न होईल तर ती आपल्या स्वामीस आनंद देण्यास समर्थ होणार नाही. अलंकारदिकांच्या योगाने स्त्री कांतियुक्त झाली की तिचे आपल्या पतीवर प्रेम बसते व ती परपुरुष संपर्क करीत नाही. त्यामुळे ती कुलदीप्तियुक्त होते. पण तिला संतोष नसला म्हणजे ती पतीचा द्वेष करु लागते व परपुरुष संपर्क करिते. त्यामुळे ते सर्व कुल मलिन होते. 

मनुस्मृतीच्या आठव्या व नवव्या अध्यायात हा मनु म्हणतो, पवित्र असलेल्या अनेक स्त्रिया ऋणादानादी प्रकरणी साक्षी योग्य नाहीत. कारण स्त्रियांची बुध्दी अस्थिर असते. या सुंदर रुप पाहत नाहीत व यांचा यौवनादी वयाविषयी आदर नसतो. तर सुरुप किंवा कुरुप कसाही जरी असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्याचा भोग घेतात. परपुरुषास पाहताच त्यांच्यात संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हे त्यांच्या स्वभावातच असल्यामुळे त्यांचे चित्त स्थिर नसल्यामुळे व स्वभावतच त्या स्नेहशून्य असल्यामुळे त्यांचे मोठे प्रयत्नाने जरी रक्षण केले तरी त्या व्यभिचाराचा आश्रय करुन पतीच्या विरुध्द जातात. स्त्रियांच्या जातकमादी क्रिया मंत्राच्या योगाने करु नये अशी शास्त्रांची मर्यादा  आहे. पापाचा नाश करणारा मंत्राचा जप स्त्रियांना करण्याचा अधिकार नसल्यामुळे त्या धर्मज्ञ नसतात. त्यामुळे असल्याप्रमाणे त्या अशुभ असतात. एवढे लांछन स्त्रियांना लावून हा मनु थांबत नाही तर पुढे म्हणतो, पिता, पती  किंवा पुत्र यास सोडून राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा करु नये. कारण अशी स्त्री दुष्ट व दोन्ही कलास निंद्रय करिते. पती जरी विरुध्द असला तरी स्त्रीने हसत मुद्रेने रहावे. गृहकर्मामध्ये दक्ष असावे. पिता किंवा भ्राता तिला ज्याच्या स्वाधिन करेल तो जीवंत असेपर्यंत तिने त्याची सेवा करावी. पती सदाचार शून्य असो की दुसऱया स्त्रीवर प्रेम करणारा असो की विद्यादी गुणशून्य असो तो कसाही जरी असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सतत सेवा करावी. 

स्त्रीच्या पुनर्विवाहास बंदी घालताना मनु म्हणतो, पती मरण पावल्यानंतर स्त्रीने शुभ, पुष्पे, मुळे, फळे यांच्या योगाने अल्पआहार घेऊन देहास क्षीण करावे. परपुरुषाचे नावही तिने घेऊ नये. तिने पूर्णपणे ब्रम्हचर्य पाळून रहावे. विवाहाचे विधान करणाऱया कोणत्याही शास्त्रात स्त्रीचा पुनर्विवाह सांगितलेला नाही. उलट आपल्या हीन पतीला  सोडून जी उत्तम पतीचा स्विकार करते ती लोकांमध्ये निंद्य होते व हिचा पूर्वी दुसरा पती होता असे लोक म्हणतात. असे मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात म्हटले आहे. स्त्री शिक्षणासंबंधी मनु म्हणतो, विवाहविधी हाच स्त्रियांचा उपनयनाष्य संस्कार आहे. पतीची सेवा हाच त्यांचा गुरुकुलवास व गृहकृत्ये हाच सायंप्रात होम होय. म्हणजेच एकंदरीत तिला शिक्षण घेण्याची कोणतीच व्यवस्था या शास्त्रात नाही. संपत्तीच्या संदर्भात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये स्त्रीचा वाटा काय? याबाबतीत मनुस्मृतीमध्ये `दायभाग' स्वतंत्र भागच आहे. या दायभागानुसार स्त्रीला पिताच्या संपत्तीच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पुत्राशिवाय इतर भावंडही संपत्तीचे दुय्यम वाटेकरी ठरतात. तेथे पित्याच्या संपत्तीवर मुलीने अधिकार सांगणे दुरापास्त होते.  

एकंदरीत मनुचा स्त्री व शूद्रांबद्दलचा हा दृष्टीकोन म्हणजे कित्येक जन्माच वैरच जणू तो काढतो आहे असे वाटते. स्त्रियांबद्दल आकसाची भूमिका ठेवताना मात्र हा महाभाग पुरुषांबद्दल फारच लिनतेची भूमिका घेताना दिसतो. पुरुषाला शिक्षणाचा अधिकार, त्याला पुनर्विवाहाचा अधिकार, एकापेक्षा अनेक स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार म्हणजे तो सर्व सत्तेचा अधिकारी असल्याची भूमिका मनु निर्माण करतो. आजही स्त्रियांबद्दल असलेली समाजाची मानसिकता बघता याचे सर्व मुळ मनुवादातच आढळते. यामुळे भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या दर्जाबाबत मोठा विरोधाभास आढळतो. एका बाजुला धर्माधिष्ठित काल्पनिक गौरवीकरण, तर दुसऱया बाजुला त्यांचे मनुष्यत्व नाकारण्याचा अमानवी प्रकार. अशा उत्समान मनु व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे पहिले पाऊल 19 व्या शतकात महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनीच केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय  स्त्रियांची हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करुन समानतेचे संविधानिक हक्क प्रदान केले. तरीही आजही मुलगा हाच वंशाचा  दिवा आहे तोच संपत्तीचा वारसदार आहे व मुलगी म्हणजे परक्याचे धन समजण्याची मानसिकता गेलेली नाही. आताही विवाह समारंभात कन्यादानाचा प्रकार करुन वस्तुप्रमाणे तिचे दान करण्याचा प्रकार धर्म परंपरेच्या नावाखाली सर्रास सुरु आहे. याचेही मूळ मनुस्मृतेतच दिसते. कारण मनुने स्त्रीची विक्री, गहाण, देणगी केली जाऊ शकते असे मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातच म्हटले आहे. म्हणजे स्त्रियांबद्दलची मनुची कायदेसंहिता आजही धर्म परंपरेच्या नावाखाली टिकून राहिलेली दिसते व इथल्या धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेने ते स्विकारले आहे आणि म्हणून आज देश संविधानावर चालत असतानाही राजस्थान मधील न्यायालयासमोर मनुचा पुतळा  उभा आहे. हा या भारतीय स्त्री जातीचा अपमान आहे. हे जोपर्यंत आजची स्त्री वाचून समजून घेत नाही, तोपर्यंत परंपराविरुध्द ती उभी राहणार नाही. स्त्रियांच्या बंधनाचे व त्यांच्या अस्तित्व शून्यतेचे मूळ मनुस्मृतीत आहे हे लक्षात घेऊनच ग्रंथावर अपार प्रेम करणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये मनुस्मृती जाळली. 

पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर मनुस्मृतीची चर्चा संयुक्तीक आहे का? आजही तिचे दहन आवश्यक आहे काय? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. भारतीय संविधान लागू झाल्यापासून मनुस्मृती किंवा तत्सम धर्मग्रंथातील आज्ञा, कायदे व रुढी परंपरांना कायदेशीर मूठमाती देण्याचे कार्य साधले गेले. असले तरी भारतीय सवर्ण हिंदू समाजमनाने मनुप्रणित आदर्शची पूजा बांधलेली दिसते.  ज्या मनुस्मृतीमुळे या देशातील  स्त्रियांच्या माणूसपणाच्या चिंधड्या करण्यात आल्या व आजही त्याचे पडसाद धर्म परंपरा, संस्कृती या नावाखाली ती भोगतच आहे. आजही मनुवादी मानसिकतेतूनच हा भारतीय समाज तिच्याकडे बघतो. अशा मनुस्मृतीचा आम्ही निषेध करणार नाही का? एकदा नव्हे तर पुन्हा-पुन्हा तिचे दहन करुन आम्ही निषेध करणार, जेणे करुन इथल्या मनुवादी समाज व्यवस्थेला कळून चुकले पाहिजे की, आता या देशातील बहुजन महिला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने जागृत झालेली आहे व भविष्यातील पिढीलाही याची जाणीव निर्माण व्हावी की जोपर्यंत इथला मनुवाद संपत नाही तोपर्यंत मनुस्मृती जाळली जात राहील. 

प्रा. माधुरी गायधनी   ...9130088095

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com