भाकरी नसेल तर पिझ्झा खा
आणि
पाणी नसेल तर कोकाकोला प्या.
कोकणात कोकाकोलाच्या कारखान्याचे भूमिपूजन झाले. यातून रोजगार निर्माण होणार असल्याचे नेहमीप्रमाणे सांगण्यात आले. आणीबाणीनंतर, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातुन जनता पक्षाचे सरकार आले होते. कोकाकोला कंपनी भारतीय कायद्यानुसार पेयातील घटकद्रव्यांची माहिती देत नव्हती. म्हणून जाॅर्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने कोकाकोला या बलाढ्य कंपनीस जनता सरकारने देशातुन गाशा गुंडाळायला लावला. आज देशात बालकांच्या दुधातही विषारी रसायने असतात किंवा रसायनांमधे थोडेसे दूध असते असे म्हणू. ही शीतपेये आरोग्याला अपायकारक आहेत हे आता जागृत जनतेला कळू लागले आहे. परंतु या कंपन्यांचे मनावर मोहिनी घालणारे प्रसिद्धी तंत्र, या कृत्रिम पेयाची जनतेवरील पकड सुटू देत नाही.
प्रदूषण करणारा विकास जेथे पोहचला नाही, तेथील नैसर्गिक शुद्ध अवस्थेत असलेले भूजल उपसुन काढून या शीतपेयांची व बाटलीबंद पाण्याची निर्मिती केली जाते. औद्योगिक जीवनशैली औद्योगिकरणामुळे जलस्त्रोतांना प्रदूषित करते. मग प्रचाराद्वारे, नैसर्गिक पाणी पिण्याला कमी लेखले जाते आणि उच्चभ्रू जीवन म्हणजे शीतपेये पिणे, अशी कल्पना मनात रुजवली जाते. ५०- ६० वर्षांपूर्वी युरोप व अमेरिकेत हे घडवले गेले. औद्योगिकरणाने आपले पिण्याचे पाणी आपणच प्रदूषित केले हे लपवले गेले व त्याबद्दल खंत बाळगण्याऐवजी आपण वरच्या आर्थिक स्तरात गेलो आहोत आणि जीवनाचा दर्जा वाढल्याने शीतपेये, प्रक्रिया केलेले हवाबंद अन्न व फास्टफूड खाणे आवश्यक असते, असे नागरिकांच्या मनात बिंबवले गेले. परिणाम, कॅन्सरपासुन अनेक आजार ही सर्वसाधारण स्थिती झाली.
नैसर्गिक व विनाशुल्क उपलब्ध असलेले शुध्द पाणी दुर्मिळ झाले किंवा केले गेले, आणि तसे पाणी पिणे हे मागास आहे, अशी प्रतिष्ठेची नवी कल्पना आणली गेली. ही अर्थव्यवस्था अशी पृथ्वीच्या सहज कार्यपद्धतीच्या विरूद्ध काम करते आणि आपले विध्वंसक व रोगट स्वरूप लपवते. जे विकसित म्हणवून घेतात, त्या देशांतील बहुतेक सर्व नद्या आणि जलस्त्रोत आज अतिप्रदूषित आहेत, त्यातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.
भुकेल्या जनतेला फ्रान्सची मदोन्मत्त राणी म्हणाली होती की, 'पाव नसेल तर केक खा' .
आपले राज्यकर्ते ५ किलो धान्याच्या मदतीवर ( भिकेवर ) जगणाऱ्या ८१ कोटी जनतेला हेच सांगणार आहेत की, भाकरी नसेल तर पिझ्झा खा आणि पाणी नसेल तर कोकाकोला प्या . रिफायनरी, अणुऊर्जा, औष्णिक विद्युत, जलविद्युत, विमानतळ, बंदर इ. करून उध्वस्त झालेल्या कोकणवासीयांवर हीच पाळी येणार आहे. हजारो वर्षे या कृषिप्रधान देशातील गावे, पाणी, बियाणे - अन्न व निवाऱ्याबाबत स्वयंपूर्ण होती. आताप्रमाणे, सरकारने धरणातून दिलेल्या पाण्यावर आणि अन्नावर जनता लाचार बनुन जगत नव्हती. ८१ कोटी बहुसंख्य जनता आज अशी जगते. पृथ्वीला, निसर्गाला, पर्यावरणाला व जैव विविधतेला उध्वस्त करून मूठभरांनी भौतिक समृद्धी मिळवली. ही शीतपेय आणि जंक फूड संस्कृती आहे. एवढ्याने देखील, पृथ्वीच्या ९४% परिसंस्थांचा आणि विविध प्रकारच्या ६० ते ९०% जीवजातींचा, फक्त १०० वर्षांत नाश झाला आणि मानवजात व जीवसृष्टीच्या उच्चाटनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, नव्हे, उच्चाटन सुरू झाले आहे.
पृथ्वीला तंत्रज्ञानाच्या नादी लागलेल्या बुध्दीमत्तेची गरज नाही. तंत्रज्ञानाने दिलेल्या कनेक्टिव्हिटीची गरज नाही. विनाशाकडे नेणारे हे तंत्रज्ञान सोडून, पृथ्वीशी जोडणाऱ्या, कनेक्ट करणाऱ्या साधेपणाची आणि शहाणपणाची गरज आहे. देशात शहरीकरण वाढवण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. त्याला प्रगती व विकास म्हटले जात आहे. ही चूक आहे. कोकाकोलाचा कारखाना ही प्राधान्यक्रम चुकल्याची निलाजरी कबुली आहे. पृथ्वीवर जीवनाच्या अस्तित्वासाठी आणिबाणीची स्थिती आहे. परंतु राजकारण्यांना आणि बहुतांश जनतेलाही याची जाणीव नाही. औद्योगिक प्रकल्प आणि शीतपेयांच्या कारखान्यांची नाही, तर पुन्हा विहिरी आणि तळ्यांच्या, नद्यांच्या सरळ उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जगणाऱ्या, स्थानिक पिके घेऊन संतुष्ट व समाधानी राहणाऱ्या गावांच्या पुनरूज्जीवनाची कोकणाला आणि देशाला गरज आहे.
आता लोक म्हणतील की ते कसे शक्य आहे? आता विहिरींना पाणी कोठे आहे? तर समजुन घ्या की, पृथ्वी जीवन देण्यासाठी आहे, ती नोकरी देण्यासाठी नव्हती. तो पृथ्वीचा अपमान आहे. हा अपमान आपण भौतिक आधुनिकतेच्या नादी लागुन केला, म्हणून ही निसर्ग व पर्यावरणाची दुरावस्था आली आणि विनाशाकडे प्रवास सुरु झाला. पृथ्वीचा अपमान थांबवला तर परिस्थिती सुधारत जाईल, परत जीवनाकडे वाटचाल सुरू होईल. परंतु, त्यासाठी वेळ फार कमी उरला आहे, फार तर दोन - तीन वर्षे.
अॅड. गिरीश राऊत... दू. क्र. ९८ ६९ ०२ ३१ २७
निमंत्रक- भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
0 टिप्पण्या