“स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला छ. शिवाजी महाराजांचा हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्याचे विश्वासू ‘महार’ साथीदार पुरवत असत….”
(जेम्स ग्राण्ड डफ – ‘हिस्ट्री ऑफ दि मराठा’ . ‘महार रेजिमेंटचा इतिहास ,पृष्ठ-७)
“शत्रूस हुलकावणी देऊन भ्रमित करुन त्यास भलतीकडेच नेऊन अगदी शत्रू सैन्याची दमछाक करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या ‘ हूळ (हूल)पथका’त असलेले सर्व सैनिक हे फक्त महारच असत… ”
( मेजर आर. एन. बेहतम – महार रेजिमेंटचा इतिहास, संपादक- बलभद्र तिवारी, प्रकाशक- ब्रिगेडियर ईश्वरदत्त.)
” महारांनी छ. शिवाजी महाराजांच्या बरोबर राहून आणि नंतर कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वाखाली समुद्रातील युद्धात जे पारंगत्व मिळवले, त्यामुळे ते ‘मरिन बटालियन’चा फार मोठा भाग बनले. त्याचबरोबरीने मैदानी युद्धातही बहादुरीने लढून ,लौकिक प्राप्त करुन त्यांनी अनेक पुरस्कार तर प्राप्त केलेच, शिवाय सैनिकी सेवेत आपल्या इमानदारीने व पराक्रमाने अनेक उच्च विक्रमही स्थापित केले….”
( महार रेजिमेंटचा इतिहास -पृ. १५.)
पुरंदरच्या सर दरवाजावरील ढालीचे संरक्षण ( ढाल म्हणजे निशाण, झेंडा ) व बालेकिल्ल्याच्या घेऱ्याची महत्त्वाची व मानाची जबाबदारी तिथल्या ‘बेंगळे’ आडनावाच्या महारांवर सोपवलेली होती…..”
( शिवचरित्र साहित्य -लेख ९२, पृ.१११-११२.)
” इतकेच काय पण शिवाजी राजे यांचे अवतार समाप्त जाहले. नारोशंकर लहान संभाजी महाराजे धरून नेले. मागे धनी कोणी नाही, राजीक फार जाले. मुलूख उजेड जाला. किल्ल्यावरील लोक नामजाद होते ते उठोन गेले. त्रिंबक सिवदेव सचीवाचे मामा त्यास पुरंधरी ठेवले. पैसा मिलेना लोक मिलेनात गडेवरीत गस्त चालीली पाहिजे व सदरेस वेढा पाहिजे या करिता बेगले महार गढावरील आणून संताजी बतदल येलदेकर याला नाईकी पहिलेच होती अलग होती ते जागा महारास देवून गडावरी ठेविले. गस्तीची चूड धरावी व सदरेस वेढा आणून द्यावा गस्तीच्या आसाम्या व वेढेकराची असामी करुन दिली. कोणी कोणी किल्यावर नव्हते. या प्रती ते त्रिंबक सिवदेव होते तो चालीले त्याचा काल जाला ते गेले…..
( शिवचरित्र साहित्य- सं. शंकर नारायण जोशी. इ. स. १९३०. पृ. १७, खंड ३रा भा. इ. सं. मंडळ, पुणे.)
” पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला किल्लेदार उदयभानू कडून जिंकूण पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तान्हाजी मालुसरे यास कोंढाणा किल्याच्या चोरवाटा, चौकी पहाऱ्याच्या जागा व किल्यावर असलेल्या शिबंदीची खडानखडा बातमी रायाजी घेरे सरनाईक, गोंदनाक महार, मल्हारबा, राणबा, शिदबा महार इ. महारांनीच पुरविली व यशवंता महार हा अवघड कडा घोरपडीसारखा सरसर चढून वर गेला व तेथील बहाव्याच्या झाडाला दोर बांधून तो त्याने तानाजी व त्याच्या सैन्यासाठी खाली सोडला…..”
( ‘गड आला पण सिंह गेला’ – ले. ह. ना. आपटे. पृ. ७१, ८८, ९४. ‘झुंजारमाची’ – ले. गो.नी.दांडेकर. ‘हरहर महादेव’- ले. गो. नी. दांडेकर, पृ. २३९-२४०.’ सप्त प्रकरणात्मक चरित्र – पृ. ७८. ‘चित्रगुप्त बखर’- पृ. ७६, ‘शेडगांवकर बखर’- पृ. ५८.’ शनिवार वाडा, सिंहगड’ ले- गणेश हरी खरे, पृ.१४.)
” छ.संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविण्याचा शेवटचा सशस्त्र प्रयत्न रायाप्पा महार याने केला. त्या प्रयत्नात रायाप्पा यास आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. त्यानंतर झालेल्या संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर संभाजी महारांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करुन , स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करणारा शूरवीर गोविंदनाक गोपाळनाक हा महार होता. औरंगजेबाच्या ४०,०००बलाढ्य फौजेला अवघ्या ६०० सैनिकांच्या तुटपुंज्या शिबंदीनिशी रामसेज किल्ला सतत सहा वर्षे झुंजवत ठेवणारा रामसेजचा शूर किल्लेदार हाच गोविंद गोपाळ महार होता….”
( ‘संभाजी’- ले. विश्वास पाटील, पृ. ७५६ ते ७६२ आणि ८२२ते ८२८.’ शिवकालीन महार योद्धे – रायाप्पा व गोविंदा महार यांचे चरित्र ‘ ले. सिधाप्पा मोरे, बेळगांव. प्रकाशक – प्रबोधनकार ठाकरे. इ.स. १९६७.)
” मोगल बादशहा औरंगजेबाने आपल्या शहजादीचे संरक्षक म्हणून पन्हाळ्याच्या महारांवर ही जबाबदारी सोपवून त्याबद्दल त्यांना पन्हाळ्याच्या आसपास काही जमीन इनाम दिली होती…..”
(‘महार रेजिमेंटचा इतिहास’ – पृ. ५, सं. बलभद्र तिवारी, प्रकाशक-ब्रिगेडियर ईश्वरदत्त.)
” १७३८ साली नागेवाडीच्या कोंडनाक महार या सरदाराने जंजिऱ्याच्या युद्धात मोठा पराक्रम केला. त्याची हिंमत व रणकौशल्य पाहून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भारावून जाऊन कोंडनाकास मिठी मारली व आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यात घातला…..”
( ‘क्रांतीवीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘- पृ.१२,१३. ले. भाऊ लोखंडे.)
” १७३९ च्या वसईच्या मोहीमेत किल्ल्याच्या तटावरून सततच्या होणाऱ्या बंदुकीच्या माऱ्याला न जुमानता तटास भिडून शिड्या लावून किल्यावरील पोर्तुगीजांचा ध्वज काढून, तिथे मराठ्यांचा भगवा फडकावण्याचे जिगरबाज काम तुकनाक महाराने केले. यात त्याला सीता महार, फकीरा महार, वीरा महार, यमा महार, हंसा महार या महार शूरवीरांनी मदत केली…..”
( ‘महार-मांग संबंध’, पृ.६९, ले. प्रा. वी. सी. सोमवंशी.)
” मध्यप्रदेशातील ‘श्रीवर्मा’ नावाच्या राजाचा ‘सत्यपाल’ नावाचा महार सेनापती होता…..”
( ‘ क्रांतीवीर डॉ. आंबेडकर’ – पृ.१३ ले. भाऊ लोखंडे.)
” बहमनी , निजामशाही , आदिलशाही सल्तनतीत, तसेच, मोगल बादशहा व छ. शिवाजी, संभाजी, राजाराम व ताराबाई यांच्याही काळात महारांना किल्लेदार म्हणून नेमणुका मिळाल्या होत्या. ‘वाकणगिरी’ या किल्याचा आदिलशाही किल्लेदार पामनाक व त्याचा भाऊ रामनाक हे महारच होते…..”
( ‘ अस्मिता दर्शन ‘ पृ. ६४,६५ . अंक ८०.)
” परंतु, मध्यंतरीच्या काळात महारांना महाराष्ट्राच्या समाजरचनेपासून दूर करणारी एक घटना घडली. गणपतनाक या अतिशय धिप्पाड, प्रचंड बलवान असलेल्या , देखण्या महाराच्या व्यक्तीमत्वावर भाळून पेशवीणीने त्यास तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले . ही गोष्ट पेशव्यास कळताच ,चिडलेल्या पेशव्याने गुलटेकडीच्या मैदानात त्याचा जाहीर शिरच्छेद केला. आणि त्याची शिक्षा म्हणून या घटनेनंतर पेशव्यांनी महारांवर अस्पृश्यता लादून त्यांचेवर अनन्वित अत्याचार केले आणि समस्त महारांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू आला…..”
( ‘द महार लोक फॉर ए स्टडी ऑफ अनटचेबल इन महाराष्ट्र ‘ ले. मि. अलेक्झांडर रॉबर्टसन, इ.स.१९३८. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र’- खंड ६ वा, ले. चां.भ. खैरमोडे, पृ.२७६,२७७.)
“मराठ्यांनी मिळवलेला शेवटचा विजय म्हणून इतिहासात ज्या खर्ड्याच्या लढाईची नोंद आहे, तो खर्ड्याच्या लढाईतील विजय पेशव्यांना सांगली जिल्ह्यातील ‘कळंबी’ या गावच्या ‘शिदनाक’ नावाच्या शूर महार सरदारानेच मिळवून दिला होता……”
(‘खर्ड्याच्या स्वारीची बखर’.)
” महारांच्या अस्पृश्यतेहूनही अधिक नीच व अवमानकारक अशा , पेशव्यांनी लादलेल्या गळ्यातील मडके आणि कमरेच्या झाडूच्या मानहानीकारक प्रथेमुळे स्वाभीमानाने पेटून उठलेल्या शूरवीर व महापराक्रमी अशा अवघ्या ५०० महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढून पेशव्यांच्या २८,००० फौजेला कोरेगांव भिमा येथे १ जानेवारी १८१८ रोजी नेस्तनाबूत करुन अन्यायी व जुल्मी अशा पेशवाईचा अस्त घडवून आणला…..”
” सात प्रमुख धर्म, सात हजारांच्या आसपास जाती-उपजातींत तसेच सोळा प्रमुख भाषा व सोळाशे बोलीभाषांमध्ये विभागलेल्या,आणि विविधतेने नटलेल्या या खंडप्राय देशाला सुसूत्रतेत बांधून ‘लोकांनी, लोकांच्या व लोकांसाठी’ चालवलेले या देशाचे शासन ‘लोकशाही’च्याच मार्गाने चालवण या देशाला ‘संविधान’ देऊन उपकृत करणारे, भारतीय संविधानाचे ‘शिल्पकार’ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वाश्रमीचे ‘महार’च होते…..”
” माणसामाणसांमध्ये जातीपाती, उच्चनीचता व अस्पृश्यतेचा भेदाभेद करणाऱ्या ‘मनुस्मृती’ची जाहीररीत्या होळी करुन, ‘हिंदू’ धर्माचा त्याग करून, संपूर्ण मानवजातीसाठी ‘आदि कल्याणं, मज्झे कल्याणं, परियोसान कल्याणं ‘ अशा सदैव कल्याणकारी असलेल्या तथागत बुद्धाच्या सद्धम्माचा स्विकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर लाखोंच्या संख्येने १४ऑक्टोबर१९५६ रोजी स्वयंस्फूर्तीने स्विकारुन जगातील सर्वात मोठे ‘धम्मचक्र प्रवर्तन’ करणारे आजचे बौद्ध बांधव हे पूर्वाश्रमीचे ‘ महार’च होते…..”
” अशा या शूरवीर व महापराक्रमी व इमानदारी साठी प्रसिद्ध असलेल्या आमच्या ‘महार’ पूर्वजांनी ज्यांना ज्यांना साथ दिली, त्यांच्याच पदरात इतिहासाने ‘विजयश्री’ च्या दानाची ओंजळही रिती केली…..”
-अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, तथा इतिहास अभ्यासक.
पारनेर, जि. अहमदनगर.
साभार :- धम्मचक्र टीम
संकलन :- मिलिंद आशा तानाजी धावारे
0 टिप्पण्या