Top Post Ad

"त्या" आंदोलकांना पास देणारा खासदार मुस्लिम असता तर…


  संसदेच्या आवारात आणि थेट लोकसभेत घुसून चार तरुणांनी केलेल्या आंदोलनावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारनं कठोर कारवाई करत आंदोलकांवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.  संसदेत शिरणाऱ्यांना भाजप खासदाराच्या शिफारसीमुळं पास मिळाल्यानं संपूर्ण भाजपच्या तोंडास टाळं लागलं आहे. हाच खासदार विरोधी पक्षाचा असता व त्यातही मुसलमान असता तर भाजपनं देशात एव्हाना ‘हिंदू खतरे में’ व ‘देश खतरे में’च्या डरकाळ्या फोडत २०२४ च्या प्रचाराचा नारळ फोडून घेतला असता. पाच तरुणांतील कोणी मुसलमान असता तर मोदी-शहांना मारण्याच्या इस्लामी राष्ट्रांच्या कटाचा शंख फुंकून देशातील माहौल गरम केला असता, पण पास देणारा भाजपचा खासदार व घुसखोर हिंदू असल्यानं कार्यक्रमास रंगत चढली नाही, असा खोचक टोला शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये 'संसदेत विद्रोह' या मथळ्याखालील अग्रलेखात हाणण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारासाठी नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेली खोटी आश्वासनं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

संसदेतील आंदोलनाचा परामर्श या अग्रलेखात घेण्यात आला आहे. 'संसदेत घुसलेले तरुण या देशाचे नागरिक आहेत. त्यात एक तरुणी नीलम हरयाणातील आहे. महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे आहे. त्यांनी विद्रोही भावनेचा स्फोट घडवला. महागाई, बेरोजगारीनं मेटाकुटीस येऊन त्यांनी हा मार्ग स्वीकारला. मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची ‘गॅरंटी’ दिली होती. त्या गॅरंटीची अंमलबजावणी झाली असती तर अमोल शिंदेवर असं टोकाचं आंदोलन करण्याची वेळ आली नसती. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी गॅरंटी अमलात आणली असती तर हरयाणाच्या उच्चशिक्षित नीलम आझादला संसदेबाहेर ‘राडा’ करण्याची दुर्बुद्धी सुचली नसती, ‘देशभरातील तरुणांमध्ये वैफल्य आहे. बेरोजगारांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाही. महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता अमोल शिंदेसारख्या तरुणानंही एक प्रकारे आत्मघातच केला. कारण सरकारनं त्याला अतिरेकी ठरवून दहशतवादविरोधी कलमांखाली अटक केली. त्यामुळं आजन्म तुरुंगात राहणं चौघांच्या नशिबी आलं. मोदींचे सरकार व त्यांचा पक्ष निवडणूकग्रस्त असल्याचा परिणाम देश भोगत आहे, असं 'सामना’नं म्हटलं आहे.

भाजप व त्यांच्या सरकारच्या सुरक्षाविषयक धोरणांची पोलखोल झाली आहे. दोन तरुण धुराची नळकांडी घेऊन संसदेत व सभागृहात घुसले आणि दोघांनी संसदेबाहेर हल्लाबोल केला. आता या हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचं धोरण कारणीभूत आहे काय? कालच्या हल्ल्यास नेहरूच जबाबदार आहेत हे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन एकदा जाहीर करून टाकावं, असं खोचक आवाहनही शेवटी अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

यामागे आरएसएस आणि भाजपचं काही षडयंत्र असावं. सर्वत्र विरोधात होत असलेला जनाधार, महाराष्ट्रातील दोन समाजात आरक्षणावरून तेढ करण्याचं कारस्थान या सर्व विषयांवरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करून प्रसार माध्यमांना नवीन बातमी पुरवण्याकरिता कदाचित हा खेळ केला असावा अशी चर्चाही आता सर्वसामान्य नागरिकांत रंगली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com