सर अलेक्झांडर कनिंगहॅमजमिनीखाली गडप झालेल्या बौद्ध वारसा उजागर करणारे महान बौद्ध विचारवंत ! भारतीयांचा खरा धर्म हा विषमतावादी हिंदू धर्म नसून तो समतावादी, विज्ञानवादी बुद्ध धम्म आहे याचा सर्वप्रथम शोध घेणारे, बुद्ध भूमीतून बुद्धांना पुनर्जीवित करणारे महान संशोधक सर अलेक्झांडर कनिंगहॅम ( जन्म- २३ जाने. १८१४ - निर्वाण-२८ नोव्हेंबर १८९३)
जन्म २३ जानेवारी १८१४ रोजी लंडनमध्ये झाला. वयाच्या १९ व्या वर्षी ते बेंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले आणि २८ वर्षे ब्रिटिश सैन्यात काम करत मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. १८३४ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची भेट जेम्स प्रिन्सेप बरोबर झाली. जिचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले. जेम्स प्रिन्सेप त्यावेळेस अनेक शिलालेखांवर काम करत होते व लिपीचा शोध घेत होते. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना देखील भारतीय इतिहासाची आवड निर्माण झाली. ब्रिटिश सैन्यातील त्यांची कामगिरी जरी वाखाणण्याजोगी होती तरी इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले ते त्यांच्या उत्खननातील अनेक शोधांमुळे !
वयाच्या २१व्या वर्षी, वाराणसी मध्ये सैन्यात काम करताना त्यांचे लक्ष सारनाथ येथील मातीत गाडलेल्या काही अवशेषांकडे गेले. एखादा प्राचीन महाल असावा म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे उत्खननासाठी परवानगी व निधी मागितला. परवानगी मिळाली पण निधी काही मिळाला नाही. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी स्वतःचा पगार या उत्खननासाठी दिला. त्यात सापडलेला शिलालेख जेम्स प्रिन्सेपने लिप्यांतरित करून हा धम्मेक स्तूप असून भगवान बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले. १४५ फूट उंचीचा स्तूप पाहून सर अलेक्झांडर कनिंगहॅम नतमस्तक झाले. नंतर त्यांनी सांची येथील स्तूप, त्याची चारही तोरण, अनेक शिल्पाकृती उत्खननातून बाहेर काढल्या. काही अर्हत आणि सारीपुत्त व मोग्गलान यांच्या अस्थी शोधून काढल्या. येथील सर्व स्तूप पुनर्जीवित केले.
हुएन त्सँग या चिनी बौद्ध भिक्खूच्या प्रवास वर्णनातून सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अनेक बौद्ध स्थळे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुशीनारा येथील बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ शोधून काढले व तेथील १५०० वर्षे जुनी भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतील मूर्ती उत्खननातून शोधून काढली. १८४६ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्यावेळच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कँनिंग यांना प्रस्ताव पाठवून भारतात पुरातत्त्व सर्वेक्षण सुरु करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १८६१ साली भारतीय पुरातत्व खात्याची ( Archaeological Survey of India ) स्थापना करण्यात आली आणि त्याचे पहिले डायरेक्टर जनरल म्हणून सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतात उत्खननास खूप चालना दिली.
१८८१ मध्ये त्यांनी बोधगयेतील उत्खननास प्रारंभ केला. तेथे सम्राट अशोक यांनी बांधलेले वज्रासन व बुद्धांच्या अस्थी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी शोधून काढल्या. त्यांना प्रचंड आनंद झाला. नालंदा येथील उत्खनन जरी फ्रान्सिस बुकानन यांनी केले असले तरी ही वास्तू नालंदा विश्वविद्यालय असल्याचा शोध सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी लावला. तक्षशिला हे सर्वात प्राचीन बौद्ध विद्यापीठ त्यांनी शोधून काढले व उत्खननास प्रारंभ केला जे पुढे वीस वर्षे चालले. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अयोध्या ( साकेत नागरी ) येथे उत्खनन केले व हे पूर्वीचे बौद्ध विहार असल्याचा दाखला दिला. नंतरच्या काळात झालेल्या उत्खननात सापडलेल्या कसौटी स्तंभ व त्यावरचे शिल्पकाम याला पुष्टी देते.
सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध घेतला व ती जगासमोर आणली. त्यांनी संपूर्ण भारतात उत्खनन केले व अनेक प्राचीन वास्तूंचा शोध लावला. १८८५ मध्ये, सर अलेक्झांडर कनिंगहॅम भारतीय पुरातत्व खात्यातून निवृत्त झाले, मात्र त्यांनी जे आदर्श घालून दिलेत ते आजही आधुनिक पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरत आहेत. प्राचीन भारतातील अनेक शहरे व तेथील पुरातत्त्व त्यांनी शोधले. उत्खनन केलेल्या प्रत्येक वास्तूचे त्यांनी सुंदर स्केचेस काढले तेही संपूर्ण बारीक तपशीलासहित ! आजही त्यांचे स्केचेस जगभर अभ्यासली जातात. सम्राट अशोक यांचे संपूर्ण शिलालेख, स्तंभलेख सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी तंतोतंत उतरवून काढले. शिलालेख कसे लिहून घ्यावेत याचे ते मूर्तीमंत उदाहरण आहे. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अनेक ग्रंथ लिहिले मात्र त्यांनी सुरु केलेल्या Corpus inscriptionum indicarum ही ग्रंथ मालिका भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व या विषयातील मानदंड समजले जातात.
0 टिप्पण्या