Top Post Ad

अखिल भारतीय महाकविसंमेलन!


   पाच डिसेंबरला संध्याकाळी एकटेच घराबाहेर पडायचं आणि वरळीहून आरामात चालत, चालत चैत्यभूमीच्या दिशेने निघायचं. सहकुटुंब दुसर्‍या दिवशी येणार असतं. पण पाच तारखेला मात्र मी एकटाच चैत्यभूमीच्या दिशेने निघतो. तोपर्यंत सिध्दीविनायक मंदिरापर्यंत रांग आलेली असते. शांतपणे रांगेच्या शेवटी उभा राहतो. हळूहळू मुंगीच्या पावलाने पुढे सरकत राहते. इथे एक गोष्ट सांगतो. तसा मी काही फार सुप्रसिद्ध वगैरे नाही बरं का! तरीही बर्‍यापैकी लोकं मला ओळखतात. अनेक वेळा काही प्रभावशाली मित्रांनी मला समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याचे बॅच देण्याचा प्रयत्न केला. या बॅचची गंमत अशी की, हा बॅच छातीवर लावला की आपल्याला रांग लावण्याची गरज पडत नाही. आपण डायरेक्ट रांग न लावता चैत्यभूमीवर प्रवेश करतो. आपल्याला कोणीही अडवत नाही. हा बॅच म्हणजे एक प्रकारचा व्हिआयपी पासच असतो. पण हा बॅच मी नम्रपणे नाकारला आहे. कारण मला ते पटत नाही. बाबासाहेबांच्यासमोर आपण सगळेच सर्वसामान्य आहोत. मग त्यांना वंदन करण्यासाठी व्हीआयपी बनून जायची गरज काय? आपले सगळेच भाऊ, बहीण जर रांगेतून जाताहेत तर मग आपणही तसेच जायला हवे, अशी माझी धारणा आहे. त्यामुळेच मी नेहमीच पाच व सहा तारखेला रांगेतून जाऊनच बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर नतमस्तक होतो. 

     या दिवशी मला कसलीच घाई नसते. अगदी कसलेही महत्वाचे काम असले तरी मी ते पुढे ढकलतो. तसा माझा प्रत्येक दिवसच नव्हे तर उभा जन्म हा बाबासाहेबांसाठीच आहे. पण हे दोन दिवस मी विशेषत्वाने बाबासाहेबांसाठी राखून ठेवले आहेत. साधारण साडेनऊ, दहा वाजेपर्यंत मी चैत्यभूमीवर पोहोचतो. चैत्याला वंदन करुन बाहेर येईपर्यंत साडे दहा अकरा वाजलेले असतात. बाजूलाच असलेल्या चहाच्या दुकानातून एक कटींग चहा घेतो. आणि शिवाजी पार्कात शिरतो. पार्कात उभारलेले सर्व स्टाॅलवाले ओळखीचेच असतात. त्यांना जयभीम करत, करत मी मनोजभाईंच्या स्वाभिमानी रिपब्लिकनच्या भव्य स्टाॅलवर येतो. मनोजभाईला गळामिठी मारल्यावरच मी पुढे सरकायचो. हो, 'सरकायचो' हाच शब्दप्रयोग आज करावा लागतोय. कारण आता मनोजभाई या जगात नाहीत. मनोजभाईच्या स्टाॅलला लागूनच शिवाजी पार्कचा आणखीन एक गेट आहे. आणि त्याला लागूनच हिंदुस्थान पेट्रोलियमचा म्हणजेच आमच्या उठावचा कवी सुदेश जगतापचा स्टाॅल लागतो. सुदेश जगतापचा स्टाॅल असे म्हणण्याचे कारण हे की, सुदेश हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये कामाला आहे. पण आता बहुतेक तो रिटायर झाला असावा. या स्टाॅलवर गेल्यावर सुदेश मला आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व कवीमित्रांना हमखास चहा पाजणारच. 

     सुदेशच्या स्टाॅलवरचा चहा घेतला की पाच सहा स्टाॅल सोडून आमचा जेष्ठ परमस्नेही शांतू डोळसचा भवतु सब्ब मंगलमचा स्टाॅल आहे. मी जे महाकवीसंमेलन जे म्हणतो ते याच स्टाॅलवर असते. ते सांगण्याआधी शांतू डोळस या अवलीयाबद्दल सांगतो. शांतू रेल्वेमधला एक साधा कर्मचारी. वरळीच्या जिजामाता नगरात राहणार्‍या या माणसाच्या डोक्यात पंचवीस वर्षापूर्वी एक भन्नाट आयडीया आली. ही आयडीया शांतूने सर्वप्रथम भाई संगारे व नामदेव ढसाळांना सांगीतली. या दोन्ही पँथर नेत्यांनी शांतूची ही कल्पना एकदम उचलून धरली. आणि शांतू डोळस या माझ्या मित्राने, 'भवतु सब्ब मंगलम' या वधू वर सूचक मंडळाची स्थापना केली. पंचवीस वर्षापूर्वी ही कल्पना अगदीच नवीन होती. त्यावेळेस बौध्द समाजात अश्या संस्थाच अस्तित्वात नव्हत्या. शादी डाॅट काॅम सारख्या धंदेवाईक कंपन्या तर जन्मालाही आल्या नव्हत्या. हळूहळू शांतू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबई ते ठाण्यापर्यंत वस्त्यान वस्त्या फिरुन नाममात्र शुल्क आकारुन गरजू लोकांचा डेटा गोळा केला. त्यानंतर छोट्या, मोठ्या प्रमाणात मेळावे होऊ लागले. आज या संस्थेचा व्याप इतका वाढलाय की चर्चगेट ते पालघर आणि व्हिटी ते कर्जत, कसारा, बदलापूर, वांगणीपर्यंतचे पालक या मंडळात नोंदणी करत आहेत. असे जरी असले तरी शांतू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या संस्थेला आजतागायत धंदेवाईक स्वरुप येऊ दिलेले नाही. आजही ही संस्था सेवाभावी वृत्तीने नाममात्र शुल्क घेऊन हे सोशल वर्क करत आहे. हे काम करत असतानाच काव्यस्पर्धा, वैद्यकीय शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे समाजोपयोगी कामेही ते करत आहेत. चार वर्षापूर्वी त्यांनी समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आयांना 'आई' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

 चैत्यभूमीच्या प्रवेशद्वारासमोर या संस्थेने एक वाचनालयही बांधले आहे. तसेच दरवर्षी सहा डिसेंबरला वैद्यकीय शिबीर व भोजन वाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. हे सगळं करणारा हा माणूस म्हणजे कोणी फार मोठा धन्ना शेठ आहे असे नाही. शांतू हा आपल्याच सारखा सर्वसामान्य माणूस आहे. पण या पंचवीस वर्षांत त्याने जी माणसे जोडलीत त्यांच्या बळावर किंवा स्वतः पदरमोड करुन तो गेली पंचवीस वर्ष अविरतपणे हे काम करतोच आहे. या पंचवीस वर्षांत त्याने आपल्या संस्थेमार्फत अनेकांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. मला वाटतं आता आपण सगळ्या मित्रांनी मिळून त्याला एका मोठ्या 'मित्र' पुरस्काराने सन्मानित करायला हवं. असो!

     तर सांगायचा मुद्दा हा की, रात्री पावणे बाराच्या सुमारास आम्ही शांतूच्या स्टाॅलवर पोहोचतो. खरं तर हा शांतूचा नव्हे तर आमचाच म्हणजे आमच्या हक्काचाच हा स्टाॅल आहे. दरवर्षीच आम्ही येथे येतो. रात्री बारा वाजता इथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. अगरबत्ती लावली जाते. नंतर सामुहिक बुध्द वंदना घेतली जाते. नंतर शांतू प्रास्ताविक करुन कविसंमेलन सुरू करतो. त्यावेळेस शिवाजी पार्कातील सर्व ध्वनिक्षेपक बंद झालेले असतात. फक्त आमचा ध्वनिक्षेपक चालू असतो. कधीकधी पोलिसही कविता ऐकायला येतात. 

गेली पंचवीस वर्ष आम्ही या कविसंमेलनात येतो आहे. समोर बसलेले बरेच भिम अनुयायांचे चेहरे परिचयाचे असतात. त्यांनाही आता ही सवयच लागून राहिले. भारताच्या कानाकोपर्‍यातून कुठून, कुठून ही लोकं येतात. अंगावर अठरा विश्व दारिद्र्याच्या खुणा पांघरलेल्या असतात. काखोटीला जुनी पुराणे गाठोडे असते. त्यात काही बदलायचे कपडे आणि भाकर, तुकडा असतो. दरवर्षी ही सगळी मंडळी तीन, चार तारखेलाच मुंबईत डेरेदाखल होतात. अगदी गडचिरोली, चंद्रपूर ते अगदी युपी, मध्यप्रदेश, बिहारमधून ही माणसे सहकुटुंब येथे येतात. पाच तारखेला चैत्यभूमीवर वंदन करुन रात्री बारा वाजता ही मंडळी अगदी न चुकता भवतु सब्ब मंगलमच्या या स्टाॅलसमोर येऊन बसतात. आताशी त्यातले बरेचसे ओळखीचे झालेत.

     या कविसंमेलनाला लोकशाहीर कुंदन कांबळे अगदी त्यांच्या निधनापर्यंत आवर्जून नियमीतपणे हजेरी लावायचे. दर वर्षी माझ्यासोबत उठावचे गझलकार गजानन गावंडे नेहमी असतात. कधी, कधी सुदेश जगतापही असतो. रमेश भवार पूर्वी नेहमी असायचा. पण सध्या तो नाशिकला रहायला गेल्यापासून तिथे त्याची शिफ्ट ड्युटी असल्याने त्याला यायला जमत नाही. पण त्याचा मुलगा मात्र आवर्जून भेटून जातो. बबन सरवदे या दिवशी चेंबूर गार्डन मधील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ व्यवस्थापनेच्या कामात गुंतल्याने तो जसा वेळ मिळेल तसा येऊन जातो. मुलुंडचे शाहीर कांबळे मात्र आपला डफ घेऊन तिथे आवर्जून उपस्थित असतात. कधी, कधी विठ्ठलदादा उमप यांचा मुलगा, आनंद शिंदेंचा मुलगा स्टाॅलवर धावती भेट घेऊन जातात. काकासाहेब खंबाळकर तर नेहमीच येतात. 

     असा हा आमचा कवितांचा कार्यक्रम गेली पंचवीस वर्ष अव्याहतपणे चालू आहे. या कविसंमेलनाचं आमचं मानधनही अगदी गलेलठ्ठ असतं. तुम्ही विचार कराल की किती? पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार? याचं उत्तर आहे, एक रुपयाही नाही. तरीही मानधन गलेलठ्ठ असतं की त्याचं शब्दात वर्णन करणंही शक्य नाही. आणि हे मानधन म्हणजे तिथे उपस्थित असणाऱ्यां या माझ्या गोरगरीब भावाबहिणींकडून मिळालेली मनमुराद दाद. ही दाद इतकी अमुल्य, अपूर्व आणि चैतन्यदायी असते की, ही दाद आम्हाला वर्षभर पुरुन उरते. मला जर कोणाला भेटायचं असेल तर याठिकाणी मी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत इथेच असतो. होय, रात्री बारा वाजता सुरू झालेलं आमचं हे कविसंमेलन सकाळी सहा वाजेपर्यंत येथे चालू असतं आणि तोपर्यंत एक माणूसही तेथून हलत नाही. 

आमचे काही मित्र त्या घालमोड्या दादांच्या म्हणजेच अखिल भारतीय मराठी संमेलनात निमंत्रण नसतानाही जातात आणि उप-यासारखे त्या कवी कट्ट्यावर कविता म्हणतात. आपल्या तात्यासाहेबांनी म्हणजेच महात्मा फुल्यानी या घालमोड्या दादांचे निमंत्रण धुडकावून कष्टकऱ्यांचे, शोषितांचे स्वतंत्र संमेलन भरविण्याचे कधीचेच सुतोवाच करुन ठेवले आहे. मग कशासाठी त्या प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनाची पायरी चढायची? आम्ही कधीही या साहित्य संमेलनाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. आमच्यासाठी भवतु सब्ब मंगलमचं  रात्रभर चालणारं हे कविसंमेलनच आमच्यासाठी अखिल भारतीय महाकवीसंमेलन आहे. आपल्या सगळ्या कवी मित्रांना मी या अखिल भारतीय महाकवीसंमेलनाला येण्याचं कळकळीचं निमंत्रण देतो. मित्रांनो, या एकदा या महाकवीसंमेलनात. मग बघा कसा धुरळा उडतोय तो. आपण ज्या माणसांसाठी कविता लिहतो तो माणूस प्रत्यक्षात समोर बघून तुम्ही हरखून जाल. आणि परत कधी त्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाची पायरी चढण्याचेच विसरुन जाल. मग येताय ना या अखिल भारतीय महाकवीसंमेलनाला?

                 - विवेक मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com