आरक्षणाच्या नावानं समाजा समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जात आहे.
सध्या आरक्षणाच्या नावानं समाजा समाजाला भिडवलं जातंय, एकमेकांच्या विरोधात लढवलं जात आहे. आरक्षणाबाबत होत असलेला आक्रमकपणा थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घातलं जात आहे. २००४ मध्ये गोध्रा झालं, २०२३ मणिपूर झालं, ३ डिसेंबरनंतर देशात कुठतरी संघर्ष उभा केला जाईल. भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत, भडकवणाऱ्या संघटनेच्या नेत्याला त्यांच्या मुलाला पुढं आणायला सांगा, आपल्या मुलाला या संघटनेत पाठवा, पण ते स्वत:च कुटुंब सुरक्षित ठेवत आहेत. दुसऱ्याला इजा करत आहेत. पण स्वत:ला करु घेत नाहीत अशी देशात अवस्था आहे. असे स्पष्ट मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित संविधान सन्मान महासभेत ते बोलत होते. समाजाला अविकसित ठेवून समाजा समाजात भांडण लावण्याचं काम सुरु आहे. कापूस आणि त्याच्या मधील उत्पादन, सरकारला मिळणारा कर हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. हा लढा मोठा आहे. या लढ्याचा रिंग मास्टर नरेंद्र मोदी आहे हे लक्षात घ्या. भाजप आणि आरएसएसला संविधान बदलायचं आहे पण वंचित बहुजन आघाडी संविधानाच्या बाजूनं राहणार, संविधानाच्या संरक्षणासाठी लढणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ओबीसींच्या सध्याच्या नेत्यांनी कृपा करुन माझ्या नादी लागू नये. कारण इतिहास जर काढला तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. कारण ओबीसींचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत, जनता दलाबरोबर आणि त्यापूर्वी जनता पार्टीबरोबर. आत्ता आरक्षण वाचवता येत नाही म्हणून भिडवण्याची भाषा सुरु आहे. दुर्देवानं इथल्या शासनानं विकासाच्या योजना आखल्याच नाहीत म्हणून आपला विकास करुन घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. आरक्षण हा काही विकासाचा मार्ग नाही तर ते प्रतिनिधीत्व आहे. राजे-महाराजांच्या काळात शूद्र, अतिशुद्रांना म्हणजे आत्ताचे ओबीसी आणि दलित-आदिवासी यांना अशांना त्यांच्या दरबारात चोपदार होण्याचाही अधिकार नव्हता.
"मंडल आयोगानं दिलेल्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढत होतो त्यावेळी काही ओबीसी मंडळी सोबत होती पण त्याला आरएसएसनं विरोध केला होता. आरएसएस कधीच ओबीसींचं भलं करणार नाही. तसेच जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत रयतच्या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, एवढंच मी जरांगे पाटील यांना सांगतो. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या काळात नव्हताच. अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये तर नव्हताच त्यामुळं उद्या जी लोकशाही देशात ही लोक पुन्हा बाहेर राहू नयेत म्हणून आरक्षण आलं. जे आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी आहेत हे शिक्षण महर्षी आहेत. त्यांनाही हे माहिती आहे की, आज भारतातून परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी किती जातात? २० लाख विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. ४० लाख एका विद्यार्थ्यावर खर्च होत असेल तर किती निधी बाहेर जातो हे लक्षात घ्या. सध्याचे जे शिक्षण सम्राट आणि मराठा नेते आहेत तेच इथल्या विकासाचे विरोधक आहेत. कारण आपल्या संस्था चालल्या पाहिजेत म्हणून त्यांनी नव्या संस्था येऊ दिल्या नाहीत आणि त्यांनी संकुचित शिक्षण केलं. ज्यामध्ये रोजगार निर्माण होऊ शकला असतो. करोडो रुपयांचा निधी परदेशात जातो तो थांबला असतो. देशात नव्यानं २० लाख नोकऱ्या तयार झाल्या असत्या.
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, मोहन भागवत यांना मध्यंतरी आव्हान दिलं होतं की या देशाचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे की भौगौलिक राष्ट्रवाद हे सांगा असा सवाल केला होता. सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणता त्यावेळी तो भौगोलिक नाही. भौगोलिक राष्ट्रवाद नव्हता तेव्हा ब्रिटीश होते. त्यावेळी काँग्रेस आणि मुस्लिम लीग होती. त्या दोघांचं राजकारण कसं चालायचं, वैदिक परंपरेशी संबंध असलेली लोक या देशाला गुलाम करण्याची भाषा केली जात आहे. आजच्या व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आहे. आपली मागणी मांडण्याची संधी आहे त्याला विश्वास आहे. लढा उभा करण्याचा, धर्म पाळण्याचा अधिकार आहे हा लोकांना विश्वास आहे. हा विश्वास जर तुटला तर काय होतंय हे आपल्याला दिसतंय. काय होतंय. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचं संविधान बदललं पाहिजे की न बदललं पाहिजे या दृष्टीनं ती चर्चा आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांच्या अगोदर या मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे, भाजपच्या नेत्यांकडून आणि आरएसएसकडून वारंवार हिंदूराष्ट्र निर्मितीचा दावा केला जातो. पण उद्या जर हिंदूराष्ट्र खरंच तयार केलं तर वाद होणार की नाहीत यावर भाजप आणि आरएसएसनं आमच्यासोबत चर्चा करावी.
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले येऊन गेले, माझा त्यांना आग्रह आहे की वंचितनं या संदर्भानं चर्चा सुरु केली आहे. काँग्रेसनं दुसऱ्या राज्यांमध्ये संविधानाची चर्चा सुरु करावी, जनसभा घ्यावी आणि त्यातून आम्ही सर्वजण जे बदलणारे आहेत त्यांना बदलत का आहात हा प्रश्न विचारत आहे, संविधान बदलण्याची भाषा केली जात असताना नवीन काय येणार याची चर्चाच नाही, संविधान जुनं झालंय सांगून बदलाच्या चर्चा सुरु आहेत, संविधान ही एक व्यवस्था आहे, राज्य चालण्याची व्यवस्था आहे, ही व्यवस्था जिच्या वर लोकांचा विश्वास आहे, आज तिला तुम्ही बदलाय सांगता पण नवी व्यवस्था काय येणार हे तुम्ही सांगा, आज जी लोकशाही आहे त्याऐवजी ठोकशाही आणणार आहात का? ती ठोकशाही आणणार असाल ती कशा पद्धतीची असेल त्याचा आराखडा तरी सांगा? तुम्ही म्हणत असाल लोकशाही राहणार तर ती संसदीय लोकशाही असेल की अध्यक्षीय लोकशाही असेल त्याचं तरी काही सांगा? संसदीय लोकशाही चालवणार असाल तर सध्याच्या संसदीय लोकशाहीत काय कमी आहे, याची मांडणी करा, संविधानाशी ज्यांचा संबंध नाही त्यांनी याची चर्चा सुरु केली आहे.
सत्ता जशी जात आहे, तसे कार्यक्रम बदलत आहेत. सगळ्या गोष्टींचा वापर केला जाईल. मी आज सकाळपासून किती ठिकाणी धाडी पडल्या हे बघत होतो. माझ्या माहिती प्रमाणे ७ ठिकाणी धाडी पडल्या, गेल्या ९ वर्षात किती ठिकाणी धाडी पडल्या ते बघा. ज्यांच्यावर धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली नाही, त्यांना कोर्टात उभं केलं नाही त्यांना लटकवत ठेवलेलं आहे. या राजकारणातून देशात भीती निर्माण करायची आहे, तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर धाडी टाकू, जेलमध्ये जाण्याचा धमक्या देत आहेत, आणि व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
या सभेचे निमंत्रण काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, संविधान सन्मान सभेचे निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याचे आयोजन केले त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत. गेल्या ९ वर्षापासून घटनेच्या मुलभूत अधिकारांवर सातत्याने हल्ला होत आहे. आज देशात चिंताजनक स्थिती आहे. अशावेळी संविधानाचे संरक्षण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे मी आजच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत
0 टिप्पण्या