Top Post Ad

दिक्षाभूमी कुणाच्या ताब्यात....?

 


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला, नाशिक, महाराष्ट्र येथे मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु मी धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली, त्यानंतर  २१ वर्षानंतर ऑक्टोबरच्या विजयादशमी दिनी  १९५६ ला  नागपूर येथे स्वतः बौध्द धम्माची दिक्षा घेऊन, लाखो अनुयायांना २२ प्रतिज्ञा देऊन बौध्द धम्माची दिक्षा दिली, आज त्याच नागपूरच्या भुमीला दिक्षाभुमी नावाने जगात ओळखले जाते,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमीवर धार्मिक क्रांतीची बीजे रोवली. तीच क्रांती अधिक मजबूत होऊ नये म्हणून ब्राम्हणवादी विचारसरणीच्या व्यक्ती व संघटनांचे प्रतिनिधी आता दिक्षाभुमीवर येऊन छुप्या पद्धतीने ही क्रांती रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याला आपल्यातलेच काही लोक बळी पडलेले आहेत.  सन १९५८ च्या काळात परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभुमी नागपूर या संस्थेची ६ उद्देशाच्या पुर्ततेसाठी स्थापना करण्यात आली होती. ते उद्देश खालीलप्रमाणे :

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उभारणी करायची 
२) भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करायचा. 
३) बौध्द धार्मिक साहित्यावर संशोधन करायचे. 
४) शिक्षणाचा प्रचार व प्रसार करायचा. 
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती कायम लक्षात राहतील असे काम करायचे. 
६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाची उभारणी व इतर कामे पुर्ण झाल्यावर नविन ट्रस्ट स्थापन करून सर्व व्यवस्थापन त्या ट्रस्टकडे सोपवायचे, 

परंतु आता दिक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनूसार परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावात बदल करुन दिक्षाभूमी शब्द कमी केला आहे. उद्देशामध्येसुध्दा  ६ उद्देशाचे ५ उद्देश करण्यात आले आहेत. मात्र बौध्द समाजाला याची कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे  अॅड. हर्षवर्धन गोडघाटे, वर्धा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे.  आज इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये दिक्षाभुमी स्मारक व्यवस्थित बनले नाही, मागील दोन वर्षापासून पावसाळ्यात सतत स्मारकामध्ये पाणी येत आहे, स्मारकाच्या परिसरात सुधारणा नाही, इतक्या वर्षात स्मारक समितीने संस्थेच्या संविधानानुसार किती उद्देशावर काम केले हा समिक्षेचा भाग आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा स्मारक समितीद्वारे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन / अनुवर्तन दिनाच्या कार्यक्रमात जाहीरपणे वाचल्या जात नाही. बौध्द धम्माचा प्रचार-प्रसार होईल असे कोणतेच काम दिक्षाभुमीवरुन होतांना दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते या देशाचा इतिहास हा बौध्द व ब्राम्हणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. परंतु परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभुमी नागपूर प्रत्येक वर्षी ज्या ब्राम्हणवादा सोबत बौध्दांचा घातक संघर्ष आहे त्याच ब्राम्हणवादाला मजबुत करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना कार्यक्रमात मुख्य / प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात व बौध्द समाजाच्या मनात असलेले धार्मिक क्रांतीचे बीज नष्ट करण्याचे षडयंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात.

बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी विहार हे बौध्दांचे असून सुध्दा महाबोधी विहार कमेटीमध्ये दि बोध गया टेंपल अॅक्ट १९४९ सुधारित  कायदा १९५५ च्या कलम ३ (२) नुसार समितीच्या रचनेत चार बौध्द व चार महंत अशी कायदेशीर तरतुद करण्यात आली आहे. भविष्यात दिक्षाभुमी स्मारक सुध्दा बौध्दांच्या हातून जाऊ शकते. भविष्यातील दिक्षाभुमीवर असलेला धोका ओळखून आता बौध्दांनी दिक्षाभूमी वाचवण्याकरीता भूमिका घेतली पाहिजे. दिक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदी नुसार जनरल काउंसिलमध्ये ३१, गर्व्हनींग बॉडी मध्ये १३, बोर्ड ऑफ ट्रस्टी मध्ये ३, अॅडवायजरी कमिटी मध्ये १० ते १५ व एक्झीक्युटीव्ह कमिटी मध्ये ५ ते ७ सदस्यांचा समावेश कायदेशीर रित्या आहे, परंतु परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभुमी नागपूर जनरल काऊंसिल, गर्व्हनींग बॉडी, बोर्ड ऑफ ट्रस्टी, अॅडवायजरी कमिटी व एक्झीक्युटीव्ह कमिटी यांची संपुर्ण यादी कधीच जाहीर करत नाही, त्यामुळे दिक्षाभुमी स्मारकाच्या समितीमध्ये सुध्दा घुसखोरी झाली की काय? अशा संशय आल्याशिवाय रहात नसल्याचे मत गोडघाटे यांनी व्यक्त केले आहे. 

परमपुज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभुमी नागपूर समितीवर बौध्द समाजाचा कोणताही सामाजिक दबाव नसल्यामुळे स्मारक समिती निरंकुशपणे दिक्षाभुमीचे मालक असल्याप्रमाणे काम करीत आहे, म्हणून आता बौध्द समाजाने दिक्षाभुमीच्या संदर्भामध्ये जागृत असले पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिनांक ०४/१२/१९५४ रोजी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद रंगून (बर्मा) येथील भाषण वाचून बौध्द समाजाने समजुन घ्यावे, तेथील भाषणाचा काही भाग खालीलप्रमाणे.

The danger to Buddhism from Islam no longer exist but the danger from Brahminism exists. it will be it's toughest opponent. A brahmin will remains a brahmin no matter what color he assums or what party he join. that because brahmin wants to maintain the system of graded social inequality..............that is why the brahmins hate it.....the precaution to exclude them from position of power at least in the early stages of our movement is therefore very necessary.

सविस्तर भाषण खंड क्रं. १७ भाग ३ पेज नं. ५०६ ते ५१२ इंग्लिश मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे, ते बौध्द समाजाने काळजीपूर्वक वाचावे. 

बौध्द समाजाने आता स्मारक समितीला मागील कामाचा हिशोब मागावा व समितीच्या सर्व सदस्यांवर भविष्यात स्मारक समिती योग्य पध्दतीने काम करेल याकरीता सामाजिक दबाव निर्माण करावा. बौध्द समाजामध्ये दिक्षाभुमीच्या संदर्भात जागृती आणण्यासाठी स्मारक समिती व स्मारक समितीच्या वागणूकीमध्ये कसा सुधार करायचा याकरीता दिक्षाभुमी स्मारक समितीचे संविधान, धम्मक्रांतीचा इतिहास व दिक्षाभुमीचे ब्राम्हणीकरण रोखण्यासाठी ठोस भुमिका मांडण्याची गरज आहे.  परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभुमी नागपूर ही कोणत्याही परिवाराची खाजगी संपत्ती नसून बौध्द समाजाची अस्मिता, क्रांतीभूमी, उर्जाभुमी आहे त्यामुळे दिक्षाभुमी स्मारक समितीच्या जनरल काऊंसिल, गव्हनींग बॉडी, बोर्ड ऑफ ट्रस्टी, अॅडवायजरी कमिटी व एक्झीक्युटीव्ह कमिटीमध्ये आता बौध्द समाजाने निवडणूकीच्या माध्यमातून दिक्षाभुमी स्मारक समितीच्या संविधानातील तरतुदीप्रमाणे निश्चित कालावधीकरीता निवडणून गेले पाहिजे, दिक्षाभुमी स्मारक समितीमध्ये येण्यासाठी सर्व बौध्द अनुयायांना समान संधी मिळावी याकरीता कायदेशीर संघर्ष सुध्दा करायचा आहे. दिक्षाभुमी स्मारक समितीच्या कामामध्ये पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. याकरिता सामाजिक दबाव व कायदेशीर लढा उभारावा लागेल. येणाऱ्या काळात दिक्षाभुमी स्मारक बचाओ आंदोलनाला व्यापक स्वरुप देऊन सामुहिक लढा उभारला तरच दिक्षाभुमी बौद्धांची राहिल, अन्यथा महाबोधि विहार कमिटीप्रमाणे या ठिकाणीही हिन्दुत्वाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. 

१) स्मारक समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व  संविधानाच्या संशोधन केलेल्या प्रती सार्वजनिक कराव्या.
२) स्मारक समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ऑडीट रिपोर्टच्या कॉपी सार्वजनिक कराव्या. 
३) परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावातून दिक्षाभूमी शब्द कमी का केला, जाहीर करावे.

स्मारक समितीच्या संविधानामधील तरतुदी प्रमाणे स्थापनेपासून ते आजपर्यंतचे जनरल काऊंसिल, गर्व्हनींग बॉडी, बोर्ड ऑफ ट्रस्टी, अॅडवायजरी कमिटी, एक्झीक्युटीव्ह कमिटी, सबस्क्रायबर व पॅट्रॉन यांची संपुर्ण यादी जाहीर करावी. असे आवाहन अॅड. हर्षवर्धन गोडघाटे, वर्धा (महाराष्ट्र ) - 9822836095 यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com