राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १,३१२ जागांवर विजयासह राज्यात आघाडीवर असल्याचा दावा कॉंगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. टिळक भवनमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. महाविकास आघाडीने एकूण १,३१२ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. एवढेच नाही तर भाजपने केलेले दावे साफ खोटे आहेत. हिम्मत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही पटोले यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा खोटा आणि हास्यास्पद असून ही निवडणूक चिन्हांच्या आधारे घेतली जात नाही. ग्रामपंचायतीने सर्व याद्या बाहेर काढाव्यात तेव्हा कळेल की, खरे विजयाचे दावेदार कोण आहेत. मागील वर्षीही भाजपाने बाजारसमितीच्या निवडणुकांबाबात असाच खोटा दावा केला होता. मात्र खरा विजय हा कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचा आहे. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ असा चंग भाजपने केला आहे. तर नागपुरात भाजपचा सुपडा साप झाल्याचे सांगत, पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भंडारा येथे भाजपने केवळ दोन ग्रामपंचायती आणि कॉंग्रेसने २३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तरीही भाजप स्वत:ची पाठ थोपटत आहे. या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नव्हते, याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. सत्तेत आल्यानंतर २४ तासांत ओबीसी समाजाला आरक्षण देणार, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ओबीसींना राजकीय आरक्षण दिले नाही, याचे उत्तरही जनतेने भाजपला दिले आहे. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील अजित पवार गटाने २५ पैकी २४ ग्रामपंचायतीत विजय मिळवला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाला अजित पवार गटाचा पाठिंबा असेल तर विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घेण्याची हिम्मत का दाखवत नाहीत. तीन तिघाडा आणि काम बिघाडा, अशी त्यांची अवस्था आहे. चिन्ह वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास ते का घाबरत आहेत? असा तिखट सवाल करत नान पटोले यांनी भाजपाचे कान टोचले आहेत.
या निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या पक्षाचे नाव घेत ग्रामपंचायत विजयाचा दावेदार म्हणून आपले घोडे दामटवत आहेत. सोशल मीडियाद्वारे राज्यातील सर्वच नेते आपल्या पक्षाचे अधिक सरपंच विजयी झाल्याचे सांगत आहेत. यामुळे आता नेमका विजयी पक्ष कोण? याबाबत मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या