Top Post Ad

ज्ञान आणि कम्म यांच्यात मेळ झाला तर धम्म चालतो. मानवप्राणी सुखी होतो...


    विशाल पात्र असलेली रोहिणी नदी संथपणे वहात होती. आपली नाव किनाऱ्याजवळील खुंटीला बांधून; त्यामध्ये दोन्ही वल्हे ठेवून नावाडी जवळच्या खडकावर बसून ग्रंथ वाचत होता. इतक्यात भदन्त प्रज्ञानंद घाईघाईने आले आणि त्यांनी नावाड्यास पलिकडच्या किनाऱ्यावर सोडण्यास सांगितले. दोन तीन वेळा सांगून देखील नावाड्याचे त्यांच्याकडे लक्ष नसलेले पाहून त्यांना जरा रागच आला. परंतु रागावून चालणार नव्हते. कारण त्यांना पोहता येत नव्हते आणि पलिकडच्या किनाऱ्यावर लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे होते. नावाड्याचे संपूर्ण लक्ष त्याच्या वाचनात होते. प्रज्ञानंदांना मधून मधून तो हो,हो म्हणत मान हलवित होता. चिवर घातलेले काखेत झोळी अडवलेले भन्ते....! आपण संसार त्याग केलेले एवढे मोठे भिक्खू असतांना हा माणूस वंदन करायचे दूरच पण आपल्याकडे साधे पहातही नाही, याचा मात्र त्यांना फारच राग आला होता. पण करणार काय त्यांना येथपर्यंत यायला आधीच उशीर झाला होता आणि आता पलिकडच्या किनाऱ्यावर  श्रावस्तीस पोहोचणे अगत्याचे होते.  आणि नावाडी मात्र वाचनामध्ये पूर्णपणे रमुन गेला होता. चार पुस्तकं शिकला असेल; वाचता येत असेल; मात्र विद्वत्तेचा आव आणून आपण अगदी मनपूर्वक ग्रंथ वाचत आहोत असे नावाडी दाखवत आहे हे पाहून त्यांना अपमानच वाटला. त्यांचा राग अनावर झाला. 

``नावाड्या आता उठतोस कि नाही? मला श्रावस्तीला पोहोचायला उशीर होत आहे''.  

नावाड्याने त्यांच्याकडे पाहिले आणि नम्रपणे म्हणाला,.``भन्ते आपणास चौथ्या प्रहरी श्रावस्तीला पोहोचायचे आहे, तेथे आपली धम्मदेसना आहे. हो ना?'' 

``होय! पण तू कसे ओळखलेस?'' भन्तेंनी आश्चर्यचकितपणे विचारले.  

``भन्ते श्रावस्तीचे लोक अधूनमधून कोण्यातरी संत महात्म्यांना प्रवचन अथवा धम्मदेसनेस आमंत्रित करीत असतात. आज आपणास आमंत्रित केले आहे. असा मी आपल्याला पाहून तर्क केला.  असे कार्यक्रम सांयकाळीच होत असतात. मी देखील कधी कधी अशा कार्यक्रमांना उपस्थित रहात असतो.'' 

भन्तेंना नावाड्याच्या बुद्धीचे कौतुक वाटले, आताशा त्यांचा राग काही प्रमाणात मावळला होता. पण वरवरच्या रागानेच ते म्हणाले, एवढे तुला कळते, शिवाय तु मला ओळखलेस, तरीही मी एवढी विनंती करुन तू माझ्याकडे दुर्लक्ष करित आहेस.  

मग नावाड्याने ग्रंथ खडकावर ठेवला आणि  हात जोडून उभा राहिला. विनम्रभावाने म्हणाला,``भन्ते मी आपला अपमान तर केला नाहीच, उलट सन्मान करीत आहे.'' 

``वा! म्हणे सन्मान केला. मी आल्यापासून इतक्या वेळानंतर तु आता मला वंदन करीत आहेस.'' प्रज्ञानंद तुच्छतेने म्हणाले. 

``भन्ते मी मनातून तुम्हाला केव्हाच वंदन केले होते. परंतु आपण माझे मन ओळखले नाहीत. ही संथ वाहणारी रोहीणी नदी, तिने शांतपणे, रागलोभ न बाळगता जीवन दिले. किनाऱ्यावर निसर्ग फुलवला हा निसर्गदेखील कोणाशी काही बोलत नाही तरीही स्वधर्माप्रमाणे ज्याला जे हवे ते देतच असतो. असा हा निसर्ग आणि त्यात आपणासारख्या थोर माणसांचा सहवास! आपणास तातडीने जर मी पलीकडे पोहोचवून दिले असते तर आपला सहवास लवकर संपला असता'' - नावाडी. 

``वा वा चतुर आहेस  प्रज्ञानंद हसत म्हणाले, मग मला ऐकायला  तू येणार तर ?'' 

``या क्षणी मी काही सांगू शकत नाही, सायंकाळी काही महत्त्वाचे काम आले तर?'' 

``ज्ञान संपादन करण्यापेक्षा काम महत्त्वाचे वाटते काय?'' - प्रज्ञानंद 

``ज्ञान आणि कार्य हे दोन्ही महत्त्वाचे आहेत परंतु त्या त्या काळी अधिक महत्त्व कशात आहे हे ओळखायलाच पाहिजे.''- नावाडी म्हणाला. 

``बरं बरं तू फारच बोलतोहेस आता उठ आणि मला पोहोचव.''- प्रज्ञानंद 

``अजुन थोंड थांबा भन्ते, यावेळी जर आपण श्रावस्तीला गेलात तर तुमचे स्वागत करण्यास कोणीही सापडणार नाही. कारण यावेळी तेथील लोक आपापल्या महत्त्वाच्या कामात गुंतलेले असतात. जर कोणी सापडलेच तर तुमच्यामुळे त्यांच्या कार्यात खंड पडेल. त्यापेक्षा या सुरम्य स्थानी थांबा. ही नदी, हा निसर्ग. हा फार मोठा पवित्र ग्रंथ आहे. त्यात ज्ञान आणि कम्म आहे. तो वाचा चिंतन करा.'' एवढे बोलून नावाडी खडकाकडे वळला. 

प्रज्ञानंदांनी ओळखले की नावाडी वाटतो तसा अज्ञानी नाही. त्यानी विचारले, ``नाविका तू वाचतो आहेस तो ग्रंथ कोणता आहे. कोणी लिहीला आहे?'' 

``बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मी वाचत आहे.'' 

त्याच्या उत्तराने प्रज्ञानंदाना आश्चर्य वाटले. कारण बोधिसत्व डॉ.बाबासाहेबांच्या बौद्धधम्मदिक्षेनंतरच प्रज्ञावंतांनी बौद्धधम्माच्या सेवेकरिता स्वत:ला वाहून घेतले होते. आपल्या अंगावर चिवर धारण करुन ते भिक्खूसंघात सामील झाले आणि या दूरवरच्या देशात धम्मप्रचारार्थ  फिरत होते. त्यांना मनातल्या मनात खूप बरे वाटले कारण एवढ्या दूरच्या देशात जिथे बुद्धांनी अविरतपणे धम्मप्रसार केला त्याच ठिकाणी आज तेही धम्मप्रचाराचे कार्य करित होते. तेथे नावाडी सारखा माणूस बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे वाचन करित होता. हे पाहून ते मनोमन सुखावले आणि मनातच थोडे खजीलही झाले. 

श्रावस्तीला जायची एवढी घाई नाही. याक्षणी नावाड्याची बुद्धी किती ज्ञानाने भरली आहे याचा आपण अनुभव घेतलाच पाहिजे. जरी आपण कितीही ज्ञानवंत असलो तरीही. त्यांनी मनाशीच ठरवलं. आणि तेही किनाऱ्यावरील खडकावर बसले. काही काळ असाच गेला. इतक्यात एक तरुणी धावत नावाड्याकडे आली. तिला आलेली पाहताच नावाड्याने ग्रंथ मिटला, काखोटीस धरला आणि लागलीच आपली नाव सोडू लागला. नावेस पाण्यामध्ये सोडून त्याने नाव किनाऱ्यास थोडी जवळ लावली. प्रज्ञानंदांना वाटले नावाडी आपणास हाक मारील मात्र नावाड्याने तसे काही केले नाही हे पाहून त्यांनीच त्यास थांब थांब म्हणून थांबवले. नावाड्याने नाव पुन्हा किनाऱ्यास लावली आणि नम्रतेने म्हणाला, यावे भन्ते. प्रज्ञानंद नावेजवळ आले आणि त्यांना नावेच्या तळाजवळच्या भागाकडे धम्म लिहिलेले आढळले. नावाड्याने त्यांना हात देऊन नावेमध्ये चढविले. ती तरुणी मात्र पटकन बसली. त्यामुळे नावेचा तोल जाऊन ती डगमगली. त्याबरोबर प्रज्ञानंदांचा तोल गेला ते पाण्यात पडणारच होते इतक्यात त्या तरुणीने हात दिला. व त्यांना नीट बसवले. प्रज्ञानंदाना काहीसा अपमानच वाटला. 

कायरे तुझ्या होडीचे नाव `धम्म' ठेवले आहेस आणि मी पाय ठेवताच तुझा धम्म डगमगला. 

भन्ते ज्ञानाचे ओझे एका बाजूला जास्त झाले की धम्म डगमगतो. मग कम्म धम्माचा तोल सांभाळतो. ज्ञान आणि कम्म एकमेकांचे पुरक असतात. दोघांचे भांडण झाले की धम्म बुडतो. मग ज्ञानही गेले आणि कम्मही गेले. म्हणून आपणास विनंती करतो की आपण मध्यभागी जवळ जवळ बसावे म्हणजे आपली नाव न डगमगता पैलतीराला लागेल. नावाडी शांतपणे म्हणाला. 

ती तरुणी मध्यभागी बसलीच होती, प्रज्ञानंद तिच्याबाजूला बसले नाव सुरळीत चालू लागली. नावाड्याच्या दोन्ही हातात एकेक वल्हे होते. दोन्ही वह्यांनी तो झपझप पाणी तोडीत होता.  इतक्यात प्रज्ञानंदानी नावाड्याला विचारले ``कायरे मी तुला एवढ्या वेळापासून विनवणी करीत होतो. तेव्हा मात्र तू शांतपणे बसला होतास. मात्र ही मुलगी येताक्षणीच उठलास आणि नाव घेऊन निघालास. तेही मला हाक न मारताच निघाला होतास ही मुलगी तुझी कोण लागते का? हाच का तुझा धम्म?'' 

``भन्ते! आपण दोघेही माझे कोणीच लागत नाही.  तरीही मला दोघेही सारखेच महत्त्वाचे वाटता. माझ्या नावेचे प्रवासी. परंतु मला तिच्या प्रवासाचे अधिक महत्त्व वाटले. कारण श्रावस्तीला तिची आई आजारी आहे. दोघीही एकमेकांस भेटावयास उत्सूक आहेत. म्हणून तिसऱ्या प्रवाशाची वाट न पाहता मी पटकन नाव काढली. दुसऱ्याचे दुःख कमी करण्यास हातभार लावणे हाही एक सद्धम्मच आहे.'' नावाडी नम्रपणे म्हणाला. 

त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतांनाचा प्रज्ञानंदांच्या लक्षात आले की त्याच्या हातात दोन वल्ही होती. एकावर ज्ञान व दुसऱ्यावर कम्म अशी अक्षरे लिहिली होती. एका एका हातात घेऊन तो नाव वल्हवत होता. याची त्यांना गम्मत वाटली. त्यांनी थट्टेने नावाड्यास त्यामागचे कारण विचारले.  

त्याबरोबर नावाड्याने प्रत्यक्षात त्यांना एक वल्हे खाली ठेवून केवळ एकाच वह्याने एकाच बाजूस नाव चालवून दाखवली. नाव चालतच नव्हती. ती तिथेच गोल गोल फिरत होती.नंतर दुसऱ्या हातातील वल्हा घेऊन त्यानेही तसेच करुन दाखवले आणि म्हणाला, ``आलं का लक्षात भन्ते.'' 

``हो, ज्ञान आणि कम्म या सिद्धान्तांनीच धम्म चालतो''. प्रज्ञानंदानी स्पष्टीकरण दिले आणि उत्सुकतेने विचारले,  ``नाविका तुझं नाव काय?'' 

मानव - नावाडी म्हणाला 

मानव? आणि धम्माला वल्हवणारा तू? मानवधर्म,  

प्रज्ञानंद स्वतशीच पुटपुटले. 

त्यांच्या बोलण्याने आणि नाव गोल-गोल फिरुन दाखवल्dयामुळे नावेचा वेग बराच संथ झाला होता. त्यामुळे ती तरुणी चिडली ती नावाड्याला म्हणाली, ``इकडे माझा जीव कासाविस होऊ लागला आहे. आणि तुम्हाला धर्माच्या गप्पा सुचत आहेत. तुम्ही थकला असाल तर द्या माझ्याकडे वल्हे मी चालवते.'' आणि तीने वल्हे घेऊन नाव झपाझप चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नावेलाही वेग आला होता. आता प्रज्ञानंदांनाही स्फुरण चढले त्यांनीही वल्हे घेतले आणि तेही नाव चालवू लागले. मात्र नाव कधी याबाजूला तर कधी त्याबाजूला वळत होती. वेग मंदावत होता. नावाड्यास हसू आले. त्याने त्यांच्याकडून वल्हे घेतले आणि चालवू लागला. 

भन्ते आपण ज्ञानी आहात, पण कर्माने काहीसे कमी आहात. या मुलीकडे ज्ञानाची कमी आहे. ज्ञान आणि कम्म यांच्यात मेळ झाला तर धम्म चालतो. मानवप्राणी सुखी होतो. नावाडी म्हणाला. आणि त्याने नाव श्रावस्तीच्या किनाऱ्यावर लावली.  

प्रज्ञानंद आणि तरुणी यांना नावाड्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता.. दोघेही त्याचाच विचार करित आपआपल्या कामाला निघून गेले. आणि नावाडी पुन्हा आपला ग्रंथ वाचण्यात मग्न झाला. 


1999 ला ही कथा जगन्नाथ मोरे यांच्या निर्भीड या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली.

त्यानंतर पुन्हा २०१६ साली धगधगती मुंबई या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com