Top Post Ad

लोककल्याणकारी राजा - छत्रपती शिवाजी महाराज

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे समतेचे, रयतेचे राज्य होते. त्यांची लढाई मुघल- आदिलशहाविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती, धार्मिक नव्हती. त्यांच्या सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिमही होते. त्यांच्या राज्यात भेदाभेद नव्हता. त्यामुळेच महात्मा जोतिराव फुले शिवरायांना "कुळवाडीभूषण' म्हणतात. शिवरायांनी शत्रूंच्याही स्त्रियांचा आदर केला. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचा महाराजांनी सन्मान केला होता.

महाराजांना शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम होते, हे त्यांनी चिपळूण येथील जुमलेदार आणि हवालदार यांना 19 मे 1673 रोजी पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. ते म्हणतात, ""....रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही....'' रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हात लावू नका, अशा कडक सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. याच पत्रात महाराज पुढे सांगतात, "पावसाळा जवळ आलेला आहे. चारा, धान्य काटकसरीने वापरा. चारा आता संपवलात, तर पावसाळ्यात घोड्यांना चारा मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली, असे होईल. धान्य संपले, तर शेतकऱ्यांकडील दाणे, भाकरी, गवत, जळण, भाजीपाला आणाल. तेव्हा रयत म्हणेल, की मुघलापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. उन्हाळा असल्यामुळे आगट्या, चुली, रंधनाळा प्रसंगी आग भडकेल आणि खणाला (लाकडाला) लागेल. त्यामुळे लाकूड मिळणार नाही. रात्रीस दिवा घरात असेल, उंदीर दिव्याची वात नेईल. आग भडकेल, ते गोष्टी न हो, या करणे हमेशा फिरत जाऊन काळजी घेणे. सर्वांनी हुशार राहणे. जनावरांची आणि शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, अन्यथा मराठियांची इज्जत वाचणार नाही.''

शिवरायांनी मावळ्यांना काटकसर करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास सांगितले. घोडी मरू नयेत, आग लागू नये, याबाबत घ्यावयाची काळजी म्हणजे शिवरायांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मावळ्यांना दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. शिवरायांचे आपत्ती व्यवस्थापन आदर्शवत आहे. आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी नव्हे, तर आगच लागू नये यासाठी करावयाचे नियोजन, असे त्यांचे आपत्ती व्यवस्थापन होते. आग लागून लाकूड आणि चारा जळाला, तर मराठ्यांची इज्जत राहणार नाही, असे महाराज म्हणतात. प्रजेचे, जनावरांचे, पर्यावरणाचे रक्षण हीच मराठ्यांची इज्जत, अशी त्यांची भूमिका होती.

प्रांताधिकाऱ्यांची वागणूक रयतेबाबत कशी असावी, याबाबतचे पत्र शिवरायांनी 5 सप्टेंबर 1676 रोजी लिहिलेले आहे. त्यात महाराज म्हणतात, ""...इमाने इतबारे साहेबकाम करावे येसी तू क्रियाच केलीच आहेस. तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन दाखविता रास व दुरुस वर्तणे... रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत येसे बरे समजणे... कष्ट करून गावचा गाव फिरावे..ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेत ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबल आसेली, त्या माफीक त्या पासी बैलदाणे संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, त्या वीण तो आडोन निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खडि दोन खडि (खंडी) दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल, तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी (व्याज- चक्रवाढ व्याज) न करिता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफीक घेतघेत उसूल घ्यावा...'' म्हणजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा गय केली जाणार नाही. कष्ट करून म्हणजे कंटाळा न करता गावोगावी जाऊन रयतेच्या समस्या पाहा. ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी, धान्य नाही, त्याला बैलजोडी घेण्यास पैसे द्या. खंडी- दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी दोन लाख लारी खर्च झाला तरी चालेल; पण शेतकऱ्यांकडून बिनव्याजी मुद्दलच, तेही तो ऐपतवान झाल्यावर वसूल टप्प्याटप्प्याने करावे, अशा सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. शिवरायांचे स्वराज्य भ्रष्टाचारविरहित, श्रमकऱ्यांचे हित जोपासणारे होते. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले; पण कर्जाचा व्याजदर शून्य टक्के होता, हे वरील पत्रावरून सिद्ध होते. त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला नाही. शेतकऱ्यांना बैलबारदाना तर दिलाच, पण त्याच्या पोटासाठी खंडी- दोन खंडी धान्यही दिले. शेतीसाठी अनुदान देऊन उत्पादनात आणि शेती व्यवसायात प्रगती साधण्याचा शिवरायांचा प्रयोग अनुकरणीय आहे.

सध्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या शेतकऱ्याची स्पर्धा विकसित देशांतील शेतकऱ्यांशी सुरू आहे. आजही शेतकऱ्याला स्वतःची गुंतवणूक करूनच शेती करावी लागते; पण साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा मोफत पुरवठा केला. त्यांना बैलजोडी घेऊन दिली. शेतकऱ्यांच्या पोटाला अन्न दिले. बिनव्याजी कर्ज दिले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. त्यासाठी तिजोरीवर बोजा पडला, तरी पर्वा केली नाही. आज महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळाने होरपळत आहे. अशा काळात शिवरायांचे कृषिधोरण शासन- प्रशासनाला मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, विनामोबदला काही घेऊ नका, असे सांगताना यातून शिवरायांची रयतेप्रती असणारी कनवाळू भूमिका प्रकर्षाने जाणवते. शिवरायांनी जमीन महसूल व्यवस्थेत आमूलाग्र क्रांती केली. जमिनीची पाहणी करून मोजणी केली, प्रतवारी ठरवली. आग्र्यावरून परतल्यानंतर शिवरायांनी सुमारे तीन वर्षे कृषी व्यवस्थेच्या सुधारणेसाठी खर्च केली. शिवकालीन पाणी साठवण योजना ही आजही त्यांच्या जल व्यवस्थापनाची साक्ष देत आहे.

शिवरायांचा इतिहास केवळ ढाल- तलवारींचा आणि लढा यापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी सर्वोत्कृष्ट कृषिधोरणाचा पाया घातला. रचनात्मक प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यामुळेच साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याचे महत्त्व कायम आहे. राजे एका आज्ञापत्रात सांगतात, ""लाकूडफाटा तोडू नका. सागाची आणि आंब्याची झाडे अत्यंत उपयुक्त, ती एका सालात पैदा होत नाहीत. त्यांची जोपासना करावी. गडावरील पालापाचोळा खाली लोटू नका. तो एकत्र करून जाळावा व त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करावी.''

औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंह, सिद्दी जोहर यांच्याशी संघर्ष करतानाच्या काळातही आपल्या प्रजेची हेळसांड होणार नाही, याची दक्षता शिवरायांनी घेतली. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; पण ते हतबल, निराश, नाउमेद झाले नाहीत. शौर्य, धैर्य, औदार्य या गुणांच्या बळावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे वा भाषेचे नव्हते तर ते रयतेचे, लोककल्याणकारी राज्य होते. त्यामुळेच शिवरायांच्या राजमुद्रेत म्हटले आहे.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

अर्थ - प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची ही विश्‍वाला वंदनीय अशी मुद्रा लोककल्याणार्थ शोभत आहे.

श्रीमंत कोकाटे


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com