Top Post Ad

आंदोलनांची पुण्याई संपवल्यामुळेच, भांडवलदारी-व्यवस्था फोफावली...

 


_शेतकरी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राजन राजे यांचा, प्रस्थापितांवर जोरदार घणाघात..._

"या महाराष्ट्रात कंत्राटी-कामगारपद्धतीविरुद्ध, मी गेली २५/३० वर्षे लढतोय. 'कंत्राटी-कामगार पद्धत' ही गुलामगिरी तर आहेच, पण ती एकप्रकारची नव-अस्पृश्यतादेखील आहे. अस्पृश्यता म्हणजे, एका विशिष्ट समाज-घटकाने समाजाच्या दुसर्‍या मोठ्या हिश्श्याला विकासाच्या परिघाबाहेर ढकलून देत, त्याला जगण्याचा सन्मान आणि त्याला विकासाचे मूलभूत फायदे नाकारणे... 'कंत्राटी-कामगार पद्धत', ही नव-अस्पृश्यता यासाठी की, या प्रकारच्या अस्पृश्यतेत जन्माची जात गुंतलेली नसली; तरी, जन्माचं पोट गुंतलेलं आहे आणि तो कंत्राटी-कामगार अर्धपोटी आहे, त्याला माणुसपणाचे हक्क कामाच्या ठिकाणी नाकारलेले आहेत! मी, गेली तीन दशकं एकहाती या व्यवस्थेविरोधात 'धर्मयुद्ध' पुकारुन संघर्ष करतोय. लोकचळवळीकडून, डाव्या चळवळीकडून याबाबतीत काही मोठ्या त्रुटी राहून गेल्या. . डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी 'नागरी आण्विक दायित्व कायदा-123' (Civil Nuclear Liability Bill-123) साठी बंगाल-केरळ मधील आपले ४३ खासदार संसदेत पणाला लावले;

 पण, भारतातील सर्वात मोठी समस्या असलेल्या 'कंत्राटी-कामगार पद्धती'विरोधात त्यांना अंशानेही तसं काही करावसं वाटलं नाही, हे देशाचं आणि एकूणच डाव्या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे. एकांडी शिलेदारी करीत 'कंत्राटी-कामगार पद्धती'विरोधात आम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलून-बोंबलून थकलो, मोठमोठी आंदोलनं केली, संपासारखे टोकाचे संघर्ष केले, बड्या बड्या राजकीय नेत्यांना भेटलो, सर्वपक्षीय प्रमुखांच्याही भेटीगाठी घेतल्या...पण, आमच्या हाती 'राजकीय ताकद' नसल्याने कंत्राटीकरणाची विषवल्ली अधिकाधिक फोफावली. मी, 'धर्मराज्य पक्षा'ची स्थापना यासाठीच केली. कारण, चळवळीतील नेत्यांनी, कंत्राटी-पद्धतीचा विषय लावूनच धरला नाही. दुर्दैवाने, आंदोलनांची पुण्याई आता संपलेली आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसलात, चक्री-उपोषणाला बसलात; तरी, शंभर टक्के सांगतो, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत; त्यासाठी, तुम्हाआम्हाला निवडणुका जिंकून विधिमंडळात, संसदेत धडक द्यावी लागेल. 

कष्टकऱ्यांच्या अपरिमित शोषणातून चाललेली ही संपूर्ण भांडवलदारी व्यवस्था, देशात साम्यवाद-समाजवाद आणूनच संपवावी लागेल...इतर कुठलाही राजकीय पर्याय नाही", अशा घणाघाती शब्दांत 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष राजन राजे यांनी, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात जोरदार शरसंधान साधले. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने, मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर-२०२३ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शेतकरी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी राजन राजे बोलत होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला भाताचा हमीभाव अत्यंत तुटपुंजा असल्याने, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरुन, भाताला प्रति क्विंटल किमान चार हजारांचा हमीभाव देऊन, तसा कायदा करण्यात यावा, भातखरेदी केंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यावीत, शेतकऱ्यांना वीजपंपासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी-शेतमजूर व असंघटित बांधकाम कामगार आणि महिलांना, वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पाच हजारांची पेन्शन सुरु करण्यात यावी,

 सरकारी (जिल्हा परिषद) शाळांचे खासगीकरण थांबवून, कंत्राटी नोकरभरतीचा कायदा रद्द करण्यात यावा, आरोग्यसेवेचे खासगीकरण थांबवा आणि आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करुन, सर्वसामान्य जनतेला मोफत सेवा देण्यात याव्यात, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य किसान सभा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, मंत्रालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही प्रखर निदर्शने *"महाराष्ट्र किसान सभे"च्या* बिरुदाखाली करण्यात आली. 

यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना, 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष राजन राजे पुढे म्हणाले की, *"ज्याप्रमाणे उंदीर, सारखं काही ना काही कुरतडत असतो, तसेच या व्यवस्थेचे हात तुमच्या खिशाला, तुमच्या पैशाच्या पाकिटाला कुरतडत, ओरबाडत असतात... आणि, म्हणूनच या व्यवस्थेला मी 'रक्तपिपासू शोषक-व्यवस्था' म्हणतो. या व्यवस्थेचे जे सगळे बगलबच्चे आहेत, ते कसलेल्या 'पाकिटमारा'सारखे आपल्या खिशात हात घालून असतात, आपल्याला ते कळत नाही. एकीकडे उड्डाणपूल होतायत, मॉलटॉल होतायत, विकासकामं होताना दिसतायत, पण आमच्या पगाराची पाकिटं कधी जाडजूड होताना दिसतात का?* 

आम्ही मात्र, अजूनही टेकड्यांवर आणि त्यांची प्रगती हिमालयाच्या उंचीएवढी. म्हणूनच, आमचं जीवन खाली-खाली घसरत चाललंय... ना आम्हाला आरोग्यसेवा परवडत, ना आम्हाला खासगी शिक्षण परवडत. शिक्षणसेवा आणि आरोग्यसेवा या खासगी असूच कशा शकतात?" असा प्रश्न उपस्थित करीत, राजे पुढे म्हणाले, *"ज्याला आम्ही 'कल्याणकारी राज्य' म्हणावं, त्याचा अगदी उलट हा कारभार सुरु आहे. आरोग्य व शिक्षण या सकस, दर्जेदार सेवा सरकारतर्फेच पुरविल्या गेल्या पाहिजेत. जोपर्यंत, आपल्या देशात 'कल्याणकारी राज्य' संकल्पनेची धारणा व धोरणं होती, तोपर्यंत, मूलभूत सुविधा सर्वसामान्यांना समाधानकारक मिळत होत्या, पण आता भाजपा-नरेंद्र मोदी सरकारच्या बेलगाम खाजगीकरणाच्या, 

खरं म्हणजे 'अदानी-अंबानीकरणा'च्या, गेल्या दहा वर्षांच्या लोकशाहीविरोधी कालखंडात सगळंच बदललंय. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय, फडणवीस झाले काय आणि पवार झाले काय, आपले मूलभूत प्रश्न कधिही सुटणे नाही... ही व्यवस्थाच आपल्याला मुळातून आमूलाग्र बदलायला हवी. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही स्वतःच तपासून पाहा, अमेरिकेत-युरोपात आता, समाजवादी-साम्यवादी चळवळी जोर धरु लागल्यात. ज्याला आपण समाजवाद व साम्यवादाचा विचार म्हणतो, तो पुन्हा जोरकसपणे पुढे यायला लागलाय. आता फक्त आंदोलनापुरते सीमित न राहता, राजकीयदृष्ट्या सुशिक्षित होणे गरजेचे आहे. तुम्ही आम्ही एकाच चळवळीतील लोकं आहोत, आपण वेळीच जागे झालो नाही तर, राजकीयदृष्ट्या अज्ञानी माणसाला, या पुढारलेल्या आणि विज्ञानवादी जगात कुठलाही थारा मिळणार नाही !"* अशा रोखठोक भाषेत, उपस्थित शेतकरी आणि कंत्राटी-कर्मचाऱ्यांना राजन राजे यांनी, आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com