भारत देशाला गुलामगिरी ही नवीन बाब नाही. या देशाला जातीच्या नावाखाली गुलामगिरीची किड लागली आहे. आज एकविसाव्या शतकातही ती कायम आहे. याविरोधात अनेक संत महात्मे, सामाजिक धुरीणांनी लढे दिले. या गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी केवळ मालकाला गुलामगिरी वाईट असल्याचे समजावून ही गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न पूर्वापार पद्धतीने होत आला आहे. मात्र त्या गुलामाला त्याच्या गुलामगीरीची जाणीव करुन देण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेते ठरले की, ज्यांनी त्या गुलामाच्याच हातात बंडाचा झेंडा दिला. मालक हा मालकच असतो. त्याला गुलाम ठेवायची सवय झालेली आहे. आणि धनसंपत्तीच्या जोरावर तो ही गुलामगीरी कायम ठेवणार. पण जेव्हा इथला गुलामच त्याविरुद्ध बंड करून उठेल तेव्हाच त्याची गुलामगिरी संपेल. हे बाबासाहेबांनी जाणले होते. म्हणूनच आज ते इतर समाजसुधारकांपेक्षा उजवे ठरतात.
असा किती दिवस गुलामगीरीत राहणार आहेत. उठ आणि याच्याविरुद्ध संघर्ष कर तरच तुझी गुलामगीरी नष्ट होईल नाहीतर तु असाच कायमचा गुलाम राहशील.असे म्हणत त्यांनी इथल्या प्रत्येक गुलामाला अज्ञानाच्या अंधकारातून कायमचे बाहेर काढले. त्यामुळेच आजही हा गुलाम इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात अद्यापही संघर्षशील आहे. परंतु हा संघर्ष संघटीतरित्या नसल्याने अद्याप आजही इथली गुलामगीरी संपुष्टात आलेली नाही. कारण प्रस्थापित व्यवस्था संघटीतपणे कार्य करून दिवसेंदिवस अधिक शक्तीशाली होत आहे. समाज उत्थानाची सर्व साधणे, सत्तेच्या सर्व चाव्या आता तीच्या हातातच आहेत. डोळे मिटून घेण्याने किंवा झोपेचे सोंग घेण्याने ही परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे.
स्वतंत्र भारतात लोकशाहीमध्ये मतशक्ती हे एक महत्त्वाचे हत्यार बाबासाहेबांनी आपल्याला दिले. आज या मतशक्तीचा अंकुश राजकारणाला लागावा असे खरोखरच वाटत असे तर ती शक्ती विभागली जाऊ नये याबाबत दक्ष असणे गरजेचे आहे. परंतु ही मतशक्ती दिवसेंदिवस अधिकच विभागत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक गटाला प्रस्थापितांचे आश्रित व्हावे लागत आहे. कधी या गटाचे शेपूट. कधी त्या गटाचे शेपूट लावून आमदारक्या-खासदारक्या-नगरसेवकत्व, मंत्रीपद मिळवून बहुजनांचे नेतृत्व करणारी मंडळी संतुष्ट होत आहेत. यामुळे आजही काही मुठभरांचे हितसंबंध साधले जात आहेत. मात्र सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती मिळत नाही. सत्तेचे चार तुकडे मिळवण्यासाठी जमलेली टोळकी असे आजचे बहुजनांच्या चळवळीचे स्वरुप दिसत आहे.
भारतातील शोषित समाजाला जाती-धर्माच्या आधारे हजारो वर्षे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टीपासून ज्यांनी वंचित ठेवले होते तीच व्यवस्था आजही मोठ्या संख्येने कार्यरत आहे. दिवसेंदिवस ती अधिक उग्र स्वरूप धारण करत आहे. मागील अनेक वर्षापासून याचा प्रत्यय संपूर्ण देश अनुभवत आहे. त्याच व्यवस्थेकडून सामाजिक परिवर्तनाची कल्पना करणे म्हणजे मुर्खपणाच ठरेल. आज सत्तेची सर्व यंत्रणा या प्रस्थापित व्यवस्थेने व्यापून ठेवली आहेत. धर्माच्या नावावर ज्यांनी या देशाची सत्ता, संपत्ती, शक्ती संपादन केली, त्यांनीच आजही इथली शेती, कारखानदारी, सत्तासाधनांवर वर्चस्व ठेवले आहे. स्वांतत्र मिळाले. लोकशाही आली तरी इथल्या बहुजनांचे प्रश्न, अस्पृश्यता अद्यापही टिकून आहे. कारण ती नष्ट करण्याला ही व्यवस्था कालही तयार नव्हती आणि आजही तयार नाही. कायद्याने देखील हे शक्य झाले नाही.
कारण कायद्याची अंमलबजावणीही त्यांच्या हातात आहे. महाराष्ट्रात एल्गार परिषदेच्या निमित्ताने घडलेला नव्हे घडवून आणलेला प्रकार हे सर्व याची साक्ष देतात. बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था या नित्यांच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष उडावे म्हणून असे प्रकार करून आपली सत्ता अबाधित करणारी ही व्यवस्था आहे. सत्तेची सर्व केंद्रे, उत्पादनाच्या सर्व वाटा, देशाची अर्थव्यवस्थाच त्यांच्या कचाट्यात आहे. त्यामुळे बहुजनांचे प्रश्न आजही जैसे थेच राहिलेत. आज जातीयवाद हा शोषणाचा, नियमीत बदलल्या जाणाऱया सत्तेला पुरक असा जगाच्या पाठीवरचा अत्यंत हिन प्रकार आहे. त्याच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे. त्याची पालेमुळे आपल्याला कळाली तर या जातीवादाच्या आडून होणाऱया शोषणाच्या मर्मावर निश्चित प्रहार करता येईल.
1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. काळाप्रमाणे राज्यकर्त्यावर्गाचे मुखवटे बदलते गेले. पण चेहरा तोच राहिला. आज इतक्या वर्षाच्या कालखंडात नुसत्या घोषणांचा महापूर आला आणि गेला. शोषित पिढीत समाजाचे प्रश्न आहेत त्याच अवस्थेत आजही पहावयास मिळतात. त्यांच्यावर फक्त चर्चेसाठी समित्या नियुक्त होतात पण निष्पन्न मात्र काही नाही. लोकराज्याची, समाजवादाची, गरीबी हटावची, हरीत क्रांतीची वल्गना करुन प्रस्थापित वर्ग बहुजनांच्या, भूमिहीनांच्या, शेतमजूरांच्या. कामगारांच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्यांना रगडत आहे. त्यांच्या जीवनाशी खेळून, सौदेबाजी करुन त्यांच्यातल्या तथाकथित बोटावर मोजता येतील अशा हुजरेगिरी करणाऱया लोकांना अमिषे दाखवून ह्या सर्वांच्या केवळ अस्तीत्वाला सातत्याने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे.
धार्मिक, जातीय, फुटीर तंत्राचा वापर करुन लोकशाहीच्या एकसंघालाच धोका दिला जात आहे. आज प्रतिगाम्यांनी संधी मिळेल तसे बहुजन वर्गाला नामोहरम करण्याचे धोरण ठरवून ठेवले आहे. सत्तेची केंद्र त्यांच्या हातात असल्यामुळे भविष्यातही ही व्यवस्था अशीच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे तरच येणाऱया काळात जाती-धर्माच्या आडून लादली जाणारी गुलामगिरी कायमची नेस्तनाबूत होईल. बाबासाहेबांना अभिवादन करताना या गुलामगिरीतून मुक्त होण्याकरिता प्रयत्नशील राहणे हेच आद्य कर्तव्य ठरेल....
सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या