Top Post Ad

बलिप्रतिपदेच्या निमित्ताने-

सावित्रीमाई फुले यांच्या 'बळीचे स्तोत्र' या अवघ्या 7 ओळींच्या कवितेतील हा जबरदस्त आशय  

         खरे तर स्वतःला देवगणातले समजणाऱ्या आर्य ब्राह्मणांनी क्षत्रिय बळीला कपटाने ठार मारल्याची ही कथा आहे.पण या कथेला देव-दानवांच्या संघर्षाचे रूप देऊन,सर्वसामान्यांना बळीराजाशी अन्याय झाल्याचे समजू नये म्हणून एक चमत्काराने भरलेली सुरस कथा पुराणातल्या कथेत टाकून दिलेली आहे.सर्वसामान्य जनता वर्षानुवर्षे ही कथा ,देवांच्या रक्षणासाठी विष्णूने वामनाच्या रुपात येऊन केलेले योग्य कृत्य म्हणून स्वीकारतात.लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ब्राह्मणी लेखणीने बळीराजाला लोकांच्या समोर 'दानवांचा राजा'म्हणून उभे केले आणि 'दानवांचा पाडाव करणे हे देवांचे कामच होते'असा संदेश देण्यात ही लेखणी यशस्वी झाली.मात्र जोतीराव फुले यांनी 1873 साली 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून यातील खोटेपणा उघड केला.

देव-दानव म्हणजे नेमके कोण हे आपल्या लेखणीने लोकांना सांगितले.आर्य-आनार्यांचा संघर्ष म्हणजेच देव-दानव यांचा संघर्ष हेही धर्मग्रंथाच्याच पुराव्यानिशी स्पष्ट केले.जोतीराव फुले यांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्या धनंजय किर,गं.बा.सरदार यांच्यासारख्या अनेकानी याची सकारात्मक दखल घेतलेली आहे आणि आपापल्या पद्धतीने त्याची मांडणीही केलेली आहे.यातील एक अभ्यासक शिवप्रभा घुगरे  याविषयी लिहितात, "हिरण्यकश्यपू,बळीराजा,बाणासूर यांनी अनुक्रमे नरसिंह व वामन यांच्याशी कसा अटीतटीचा सामना केला याची माहिती जोतिबांच्या हिंदू धर्म वाङ्मयाच्या आधारे दिली.बळीराजाच्या सुबत्तेची सुखद कारकीर्द जनमानसातून अद्यापही कशी लोपली नाही याचा पुरावा जोतीबानी आधुनिक काळातही चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक चालीरीतीतून दिला. 

बळीराजावरील विजयाची स्मृती ब्राम्हण स्त्री विजयादशमीच्या दिवशी पिठाची बळीची मूर्ती करून व तिचे पोट आपल्या पतीकरवी आपट्याच्या काडीने फोडून साजरी करते. तर शूद्र स्त्री खंडेनावमी व भाऊबीजेच्या दिवशी आपल्या कुटुंबातील पुरुषांना ओवळताना 'इडापीडा टळो व बळीचे राज्य येवो'या शब्दांनी बळीराजाच्या सुखद कारकिर्दीचा उल्लेख करते,हे जोतीबानी अप्रतिमरीत्या सांगितले.त्या काळातील बळीराजाच्या राज्यातील अधिकारपदे उदा.काशीच्या राज्यातील भैरोबा,दक्षिण भारतातील नऊ खंडांचे नऊ खंडोबा ,स्थानिक अधिकारी म्हसोबा यांच्याविषयी आदराची व सन्मानाची भावना जनमानसात अद्याप उपास्य दैवते म्हणून कशी वास करते आहे याचीही आठवण जोतीबानी शुद्रतिशूद्र समाजाला दिली.(संदर्भ:महात्मा फुले गौरव ग्रंथ.पृष्ठ584)                 

  'बळीचे स्तोत्र'या कवितेत सावित्रीबाईंनी जोतिबांच्या याच विचारांचे सूत्र पकडून बळीचे गुणगान केलेले आहे.बळीचा इतिहास कवितेच्या रुपात वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
           'बलुत्यांचे बळीराज्य।दानव दैत्य पावन
            दानशूर बळी होता।सुखी त्यांचे प्रजानन
            राज्यात सर्व संतोषी।त्याचे त्रिलोकी कीर्तन'

ज्याला आर्य ब्राह्मणांनी पुढे शूद्र संबोधले त्या बारा बलुतेदारांचे राज्य म्हणजेच 'बळीराज्य' होय.देव-दानवांच्या संकल्पनेत या बलुतेदारांना दानव किंवा दैत्य म्हटले गेले.तर असे हे दानव-दैत्य 'पावन'म्हणजेच वर्तनाने पवित्र होते.त्यांचा राजा बळीराजा.तो तर अतिपावन!कितीतरी दानशूर अशा या बळीराजाची कीर्ती चोहीकडे 'दानशूर राजा 'म्हणून पसरलेली होती.त्याच्या राज्यात सर्वजण सुखी होते.बळीराजाला वामनाने मारल्याचे समर्थन करणाऱ्यांनी ,बळीराजा धर्माचरण करणारा नव्हता असा भ्रम लोकांच्यात पसरवला होता.म्हणूनच सावित्रीबाई बळीराजाच्या धर्मचरणाचा या कवितेत आवर्जून उल्लेख करतात.
             'स्वयंभू धर्मराज्यात।होतसे शास्त्रमंथन
            यज्ञयाग सुरू होते।दान मिळते कांचन'
बळीराजा तर त्यावेळच्या धर्मकल्पनेनुसार शास्त्रमंथन,यज्ञयाग ,ब्रह्मणांसाठी सोन्याच्या मोहरांचे दान देणे यात कुठेही कमी नव्हता आणि हे सारे करूनही तो आपल्या प्रजेच्या हितासाठीही बांधील होता.
        सावित्रीमाई बळीराजाच्या अजून एक वर्तनाचा इथे आवर्जून उल्लेख करतात.हे वर्तन म्हणजे 'बळीराजाने पत्नी विंध्यवलीला बरोबरीचे स्थान देणे.'डोईवर रत्नांचा मुकुट घातलेला बळीराजा विंध्यवलीसोबत जनतेसमोर येत असे हे वर्णन करताना सावित्रीमाई म्हणतात,
            'विंध्यवली बळीपत्नी।उभयता अभिजन
            मनोभावे बळीविंध्या।त्याचे गाऊ संकीर्तन'

सावित्रीमाई बळीबरोबरच विंध्यावलीचेही मनोभावे संकीर्तन गाऊया असे वाचकाला सांगतात आणि पुढे समजावतात की,आपण त्यांचेच वंशज आहोत.म्हणूनच प्राचीन काळापासून आजपावेतो लोक बळीराजाचे स्तोत्र गात आहेत.सावित्रीमाईंच्या प्रार्थनाविषयक कवितेतील ही एक 'प्रचलित सांस्कृतिक संदर्भांचे विच्छेदन करणारी'कविता आहे.म्हणूनच या कवितेला सामाजिक आशयही आपोआपच प्राप्त होतो.

   सावित्रीमाईंच्या सर्वच प्रार्थनाविषयक कवितातील 'वेगळेपण' मराठी  वाङ्मयाच्या इतिहासात नोंद घेण्याजोगे आहे आणि याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे,या कवितातील सामाजिक आशय.इतर सामाजिक कवितात तो पूर्णपणे भरलेला आहेच ,पण जिथे निव्वळ भक्तीच पाहिजे अशा कवितांतही तो डोकावतो.अर्वाचीन मराठी कवयित्रींच्या अभ्यासक डॉ. अलका चिडगोपकर याविषयी आपले निरीक्षण नोंदवतात की,सावित्रीबाईंच्या प्रार्थनेला सामाजिकतेचा स्पर्श झालेला जाणवतो.(संदर्भ:अर्वाचीन मराठी कवयित्री.पृष्ठ 47)

 प्रा. आशालता कांबळे (सावित्रीमाई फुले:साहित्यमीमांसा') 

                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com