बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्वघोषणेनुसार १९५६च्या अशोक विजयादशमी दिनी भेदाभेद करणाऱ्या, श्रेष्ठ-कनिष्ठ मानणाऱ्या, कर्मकांडात गुंतलेल्या, ब्राम्हणी हिन्दू वरचष्माने ग्रस्त झालेल्या विषमतावादी धर्माचा त्याग करुन विवेकनिष्ठ मानवतावादी, विज्ञानवादी, समताभिष्ठित अशा बौध्द धम्माचा स्वीकार केला ते करताना त्यांनी प्रथम महास्थवीर चंद्रमणीकडून रीतसर दीक्षा ग्रहण केली. त्यानंतर त्यांनी पाच लाख अनुयायांना धर्मांतरीत केले. त्यापूर्वी त्यांनी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौध्द महासभा नावाच्या अधिकृत संस्थेची धम्म प्रसारार्थ स्थापना केली. याचा अर्थ त्यांच्या कल्पनेतील हा धम्म आणि त्याचा प्रसार-प्रचार करताना एक जबाबदार संस्था आणि तिच्या मार्गदर्शनातून तयार होणारा भिक्खू वर्ग त्यांना महत्वाचा वाटत होता. धम्मोपदेश करणारा हा वर्ग स्वतंत्र घटक असावा. कारण रोजच्या रोजी-रोटीच्या गंभीर विवंचनेत हरवलेला सर्वसामान्य उपासकांचा वर्ग धम्मनियमांचे नीट उत्कलन आणि पालन करु शकत नाही. त्याकरिता हा भिक्खू वर्ग नियोजीत असावा. हा वर्ग व्यक्तीगत आणि खाजगी जीवनातील राग, लोभ, मोह, माया, लाभ-हानी यांच्या स्वीकृती-विकृती पासून मुक्त होऊन केवळ सेवाभाव, त्याग वृत्तीने, स्वतसाठी नाही, तर इतरांसाठी जगावे या उच्च-उदात्त भावनेने स्वयंप्रेरणेने सेवादान करायला सिध्द झालेला असतो. म्हणून त्याचे अस्तित्व आणि महत्व अपेक्षीत असते,
या वर्गामार्फत धम्म संस्थेचे संवर्धन नि संगोपन करणे उपयुक्त ठरते. हा वर्ग खाजगी, व्यक्तीगत परिवार, त्यातील मानपान या सर्व विकार-विचारापासून अलिप्त असल्याने विविध विचारांचा, धर्म धम्म मतांचा चांगला व तुलनात्मक अभ्यास, अध्ययन करुन समग्र मानवाच्या कल्याणासाठी कटिबध्द झालेला असतो. `हे विश्वचि माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपण जाटला' ही उक्ती ज्ञानेश्वराची नसून मूळ तथागत बुध्दाची आहे. `चरत भिक्खवे, चारिकम्, बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे भिक्खूनों! या जगातील जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी, तुम्ही सतत भ्रमण करा, एक जागी ठिय्या देऊन राहू नका. मानव कल्याण हाच आपल्या उभ्या आयुष्याचा मूलमंत्र आहे, एकमेव ध्येयधोरण आहे. अशी बुध्द काळापासून शिकवण आणि धम्मादेश देण्यात आला आहे. म्हणून भिक्खुंनी समाजात वावरताना या धम्मादेशाचे सतत पालन, स्मरण आणि चिंतन करीत राहिले पाहिजे. भिक्खुंच्या आचार-विचारातून याचे दर्शन घडले पाहिजे. अशी सात्विक अपेक्षा आहे.
जुना धर्म सोडून नवा धम्म घेताना बाबासाहेबांची धारणा व कल्पना सर्वस्वी भिन्न आणि अभिनव होती. ज्या चुका पूर्व इतिहास काळात झाल्या, त्या पुन्हा घडू नयेत, म्हणून ते फार चौकस आणि जागृकपणे चिंतन-मनन करीत होते. मानवी जीवनात ध्येयधोरण, केवळ उच्च-उदात्त नि उन्नत ठेवून भागत नाही, त्यानुसार आचार, विचार व व्यवहार देखील तितकाच स्पष्ट आणि शुध्द असावा लागतो. तेव्हा अपेक्षित क्रांतिकारक परिवर्तन विद्यमान परिस्थितीत घडत असते.बाबासाहेबांसमोर अनेक हेतू-उद्देश होते. मात्र त्यांचे धम्मदिक्षेच्या नंतर अल्पावधीतच परिनिर्वाण झाले आणि धर्मांतरीत समाज जीवनात आचार - विचारांची अराजकता, बेबंदशाही निर्माण झाली. अनेक प्रश्न आणि समस्या अनुत्तरीत राहिल्या. बावीस प्रतिज्ञांचे खरे प्रयोजन काय? धम्माचरण व राजकारण यांची संगत नेमकी कशी व कुठे घालावी; बौध्द धम्माचे आजच्या प्रगत ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान युगात नेमके स्वरुप कसे असावे, केवळ विहारात बसून ध्यानधारणा, चिंतन-मनन केल्याने या अज्ञानी, गरीब आणि शोषित समाजाचे खरे उत्थान होईल काय? रुढी परंपरेच्या कर्मकांडात अडकल्याने या कष्टकरी समाजाचे विकसन घडेल काय? या कर्मकांडाने पुन्हा शोषण-पिळवणूक या दुष्टचक्रात हा अन्यायग्रस्त समाज भरडला जाणार नाही काय? भिक्खू वर्ग म्हणजे शोषण करणाऱया ब्राम्हणी व्यवस्थेची नवी विकसित आवृत्ती ठरणार नाही काय? भिक्खुंनी जन्मतिथी, लग्नविधी, मृत्युदिवस व नुतन गृहात प्रवेश करतांना केवळ परित्राणपाठ करण्याची प्रतिज्ञा करीत राहावे काय? इत्यादी अनेक प्रश्न आजही जैसे थेच आहेत.
आज हा वर्ग दिवसेंदिवस सुखासीन, विलासी, ऐतखाऊ, कमी श्रमात समाजाकडून जास्तीत जास्त सुख व मानसन्मान घेण्याची अपेक्षा ठेवतांना आढळतो. ही वास्तवता आंबेडकरवादी जीवन प्रणालीला शोभनीय नाही. यातून अजून अधोगतीकडे वाटचाल घडेल. याचा सूक्ष्म व गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. भिक्खुंची प्रतिमा समाजात कशी दिसते? तर वर्षावासाच्या निमित्ताने विहारात आसनस्थ झालेला, निमंत्रणाची वाट पाहणारा, पालि भाषेचा अर्थ न समजता केवळ पोपटपंची करणारा, जुन्या ब्राम्हणी विचारधारेत पुन्हा गुंतवून ठेवणारा, गंडा-दोरा बांधायला उपासकांना प्रश्न करणारा, स्वतच्या पाया पडून घेण्यास आसुसलेला, आपण समाजात काही अलौकीक आहोत असे मानणारा-भासवणारा, श्रेष्ठ अधिकारी म्हणूनच वावरतांना दिसतो, याला काही अपवाद आहेत. मात्र त्यांची संख्या अतिशय अल्प आहे. आज बाबांसाहेंबामुळे ही सेवासंधी मिळाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भिक्खू वर्ग आज ब्राम्हणी धर्माचे अंधानुकरण करताना दिसतो. हे योग्य नाही. हिंदू व्यवस्थेत ब्राम्हण स्वतला भूदेव, सर्व ज्ञान-विज्ञान व अध्यात्माचा एकमेव जनक-पालक माणून इतरांनी मरेपर्यंत कष्ट करावेत व त्यांच्या श्रमावर-घामावर यांनी सर्व भौतिक सुख-साधणारा यभेच्छ आनंद आणि आस्वाद घ्यावा. हे तथागत बुध्द नी बाबासाहेबांना अन्यायाचे वाटले. त्यांनी या ऐतखाऊ धोरणाविरुध्द बंडाचे निशान उभारले. हे लक्षात घेतले पाहिजे.
समाजात जन्मजात कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो, सर्व सारखे व समान असतात. सर्वांना बुध्दी-भावना, संवेदना असते. प्रत्येकाने स्वत:तील सुप्तासुप्त गुणांचा विकास करावा आणि स्वकर्तृत्वाने समाजात प्रतिष्ठित व्हावे. ही बुध्द-आंबेडकरांची विचारधारा आहे. भिक्खू निस्वार्थ समाजसेवेचे प्रतीक आहे. त्याचे शुध्द चरित्र आणि चारित्र्य पाहून तो उपासकांना आदर्शवत वाटला पाहिजे. त्रिशरण, पंचशील, अष्टमंगल गाथा, वाट्टेल त्या ताला-सुरात म्हणता येणे, अंगावर चिवर असल्याचा अभिमान बाळगणे, आपण काही वेगळे व श्रेष्ठ आहोत असे न समजता अज्ञ समाजाला सूज्ञ करणे, त्याचे वेळोवेळी प्रबोधन घडवणे, त्यासाठी सतत वाचन, चिंतन , लेखन केले पाहिजे. चिकित्सक व संशोधन वृत्ती बाळगली पाहिजे. समाजाच्या गरजा बदलतात, त्यानुसार मार्गदर्शन दिले पाहिजे. समाजात सांस्कृतिक प्रदूषण, उदा. व्यसनाधिनता, भ्रष्टाचारी मनोवृत्ती, चंगळवाद, सुखासीनता, मुल्यहिनता, परस्पर वैरभाव, दिखाऊ डामडौलपणा, थोरामोठ्याचा अनादर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, यामुळे समाजाचे नैतिक पतन घडत आहे, महिलांची बेअब्रू वाढत आहे, तरुणात नैराश्य ग्रासत आहे, ही स्थिती संतोषजनक नाही. तेव्हा भिक्खुनी अग्रसेर होऊन उचित दिशादर्शन केले पाहिजे. राजकारणी नेते समाजाला मार्गदर्शन करायला असमर्थ ठरले आहेत. ते सत्तेच्या मागे लागले आहेत. त्यासाठी लाड्या-लबाड्या करण्यात ते गुंतले आहेत. लांगूनचालन करणे, उगवत्या सूर्याचे पूजन करण्यात धन्यता मानत आहेत. समाज हवालदिल व दिशाहीन होत आहे. त्याला योग्य मार्गदर्शन नाही.समाजात पोकळी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भिक्खुनी खरी सांत्वना दिलासा देण्यात पुढाकार घेतला पाहिजे. रात्र गडद अंधाराची आहे. खरा प्रकाश हवा आहे. आव्हान अनेक आहेत. शांत मनाने प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करुन नेमकी दिशा दर्शविण्याची संधी भिक्खुंनी घेतली पाहिजे.
लग्नविधी, परित्राणपाठ यात भिक्खुनी गुंतून न राहता समाजाचे उद्बोधन करण्याबरोबर इतर धर्मातील अनुयायांना या विचारधारेत समाविष्ठ करण्यासाठी कटिबध्द झाले पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्म वाढत आहे. प्रचंड प्रमाणात लोक या धम्मात समाविष्ट होत आहेत. अशा वेळी या नवदिक्षीतांना धम्म समजावून सांगण्याची मोठी जबाबदारी भिक्खू संघावर आहे. मात्र त्याने बोलावल्याशिवाय मी जाणार नाही, मला आमंत्रण आल्याशिवाय मी जाणार नाही अशा भ्रमात न राहता सामाजिक बांधिलकी स्विकारून धम्माचे ज्ञान सार्वत्रिक करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. साता समुद्रापलीकडील ख्रिश्चन धर्म येथे वाढला कारण त्यातील धर्मगुरु, फादर, बिशप यांनी धडपड केली. अनेक कट्टर व कर्मठ ब्राम्हणांचे मन परिवर्तन घडविले. नारायण, वामन टिळक हे हिन्दु परंतु एका ख्रिश्चन धर्मगुरुने त्यांच्याशी चर्चा केली. बायबल भेट दिले. ते वाचून टिळक ख्रिश्चन झालेत. रेव्हरंड बनलेत. मराठी ख्रिस्ती समाजात आज त्यांचीच भजने, वंदने आरत्या यांचे वाचन, पठन होते. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई कट्टर ब्राम्हण, पुढे त्यांचेही मन परिवर्तन झाले. 1895 मध्ये त्याही ख्रिस्ती झाल्यात. अनेक ब्राम्हण हिन्दु, ख्रिश्चन झाले आहेत. महाराष्ट्र , गोवा, कर्नाटकात आहेत. फादर फ्रॉन्सीस दिब्रिटो सारखे अनेक धर्मगुरु शुध्द मराठीतून संवाद साधतात. असे भिक्खुनी करायला काय हरकत आहे? केवळ अमूक धर्म-धम्म श्रेष्ठ म्हटल्याने तो श्रेष्ठ ठरत नाही. समोरच्या व्यक्तीची वैचारिक घडण बदलण्यात भिक्खुनी पुढाकार घेतला पाहिजे.
केवळ दान पारमिताचे चंदन उगाळून समाज सुगंधित होणार नाही. भिक्खुनी स्वत:तील संकुचितपणा सोडून, ऐतखाऊपणा, विलासी वृत्ती, चमचेगिरी, पोपटपंची अर्थ न समजता होणारे पाठांतर, समाजाने आपल्याला मिळून घेतले-बोलले पाहिजे ही धारणा सोडावी. समाज मला काय देतो, यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो. आपण आपल्या स्वप्रेरणेने भिक्खू जीवन स्विकारले आहे. मग त्याबाबत समाजाकडून अपेक्षा का ठेवायची? त्यापेक्षा बाबासाहेबांच्या जीवनध्येयाला अधिक महत्व दयावे. केवळ उत्तम आहार, किमती वाहनातून प्रवास, लग्नविधीच्या आमंत्रणाची वाट पाहणे, तेथे थाटात उपस्थित राहणे, यात मशगुल राहू नये. या धर्मांतरीत समाजाने हजारो शतकांपासून अनंत दुःख दारिद्रय अन्याय, मानभंग भोगला आहे. त्याला बाबांसाहेंबासारखा उध्दारकर्ता मिळाला त्यावर समाजाचा प्रचंड विश्वास आहे. आज जगात ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान वाढत आहे. विज्ञानाच्या शोधातून मानवाचे मौलिक जीवन उजळून निघत आहे. अनेक नवी आव्हाने मानवासमोर उभी ठाकत आहेत. शास्त्रज्ञ आपल्या पध्दतीने तो पेलत आहेत. अशा वेळी धम्मविचाराच्या सहप्रवाश्यांनी जुन्या व कोत्या चिंतनात अडकून न राहता बदलत्या काळाची पाऊले ओळखून आपली वैचारिक समज, जाणीव वाढविली पाहिजे. पुढचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याची ही चांगली संधी आहे. तिचे सोने करावे. त्यादृष्टीने या भिक्खू वर्गाने सामुहिक आत्मचिंतन व आत्मपरिक्षण करायला प्रवृत्त झाले पाहिजे.
अरुणा गायकवाड (अहमदनगर)
0 टिप्पण्या