दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलचा प्रथमच ठाण्यात लावणीचा कार्यक्रम झाला. पण, हा कार्यक्रम गौतमी पाटील यांच्या इतर कार्यक्रमांप्रमाणे हुल्लडबाजी आणि गोंधळामुळे चर्चेत आला नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेने गौतमी पाटील यांना दिवाळीत पहाटेच नाचवलं यामुळे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचे नाचगाणे झाले आणि ठाण्यात चर्चेचा विषय रंगला. चिंतामणी चौकात झालेल्या या दिवाळी पहाट निमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. १२ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून गौतमी पाटीलचं स्वागत केलं. शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणवणाऱ्या ठाण्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आदल्या दिवसापासून त्याची चर्चा सुरु होती. या कार्यक्रमावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं अनेक नेतेमंडळींनी बोलत आहेत.
“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बदललीये….. ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालंय” अशा शेलक्या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत प्रकट केलं. तर आतापर्यंत दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा… हे सगळं ऐकत होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच झंम,,, झम संस्कृती आणि डान्स बार मधील धुंदीत नाचणाऱ्या ललना ही ठाणे शहराची महाराष्ट्राला पुढील ओळख असेल. हे शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले गरीब मराठे नेते यांनी दिवाळी साजरी करणे टाळले मात्र सत्तेच्या धुंदीत असलेल्या शिंद्यांनी पाटलीन ठाण्याच्या, दिघे साहेब यांच्या आनंद आश्रमा समोर नाचवली. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते प्रा. चंद्रभान आझाद यांनी दिली.
ठाणे शहराला संस्कृतीक नगरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील अनेक कलाकार मराठी सृष्टीत नाव लौकिक करताना दिसली आहे. या शहराने गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्याच ठाण्यात दिवाळी पहाटची सुरुवात गौतमी पाटीलच्या लावणीने व्हावी याच्या इतके दुर्भाग्य दुसरे कुठले नसेल असे ट्रोल करणाऱ्यांनी म्हटले आहे. अशा कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावणे कितपत योग्य आहे ? असाही प्रश्न यावर उपस्थित करण्यात येत आहे. शहराच्या ठिकाणी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी हजारोंची झुंबड उडालेली असते. अशा कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी विविध स्तरातून केली जाते. पण राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी अशाच कार्यक्रमांना मूठमाती देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. आता तर दिवाळी पहाट मध्ये सुद्धा असे बदल घडून येत आहेत हे पाहून आपली संस्कृती जपली पाहिजे याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत अनेक ठाणेकरांनी व्यक्त केले. मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही त्यामुळे गप्प राहण्याशिवाय पर्याय नसल्याचेही अनेकांनी सांगितले.
थिल्लरबाजीला राजाश्रय !!
दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजेच्या दणदणाटात अनेक तरुण - तरुणी आवाजाचा धडका सहन न झाल्याने चक्कर येऊन पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्वपक्षीय उंडगळ कार्यकर्ते चमकोगीरी करण्यासाठी जिथे आपसूक गर्दी जमते अशा सार्वजनिक ठिकाणी गौतमी पाटील सारख्या वादग्रस्त नृत्यांगनाना बोलावून नाचगाण्यांचे कार्यक्रम आयोजित करतात. दिवाळीच्या पहील्याच दिवशी रस्ते अडवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या, भारतीय संस्कृतीशी कवडीचाही संबंध नसलेल्या या थिल्लर कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी आणि खुद्द मुख्यमंत्रीच हजेरी लावत असल्याने या सर्वपक्षीय हुल्लडबाजीला राजाश्रय मिळाल्याचे भेसूर चित्र आहे. इतकी वर्षे राम मारुती रस्त्यापुरता मर्यादित असणारा उत्सव राजकीय चढाओढीत तलाव पाळी चिंतामणी चौकापर्यंत जाऊन पोहोचलाय. देशभरात डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे हजारो मृत्यू झाले आहेत याची इकडे नाचणाऱ्या तरुण तरुणींना आणि त्यांच्या पालकांना कल्पना असेल याची शक्यता नाहीच. मुंगी सुद्धा शिरू शकणार नाही अशा गर्दीत विपरीत घडल्यास न भूतो न भविष्यती अशी दुर्घटना घडू शकते किंबहुना ती घडण्याची वाट पाहणार असू तर सामाजिक जाण आपण हरवून बसलो आहोत. या सर्वाची कल्पना असूनसुद्धा आयोजकांना पोलीस परवानगी देतात त्यामुळे या आयोजकां सकट पोलिसही तितकेच दोषी आहेत. - रोहित जोशी (सामाजिक कार्यकर्ते)
0 टिप्पण्या