महानगर प्रदेशात उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगीही दिली. त्याआधी ६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने रात्री ७ ते १० या दरम्यान फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र, हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत नसल्याने न्यायालयाने शुक्रवारच्या आदेशात फटाके फोडण्याच्या वेळेत कपात केली. मूळात फटाके वाजविण्यास बंद घालण्याची मागणी करणारी याचिका होती. मात्र, नागरिकांच्या भावनांचा विचार करत न्यायालयाने फटाके फोडण्याच्या वेळेवर बंधन घातले. निरोगी हवा हवी आहे की, फटाके फोडायचे आहेत, हे नागरिकांनी ठरवावे, असे म्हणत न्यायालयाने ही जबाबदारी नागरिकांवर सोपवली. मात्र नागरिकांनी अवघ्या दोनच दिवसांत ही जबाबदारी धुडकावून लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातही धनत्रयोदशीपेक्षा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या. अनेक भागांत बॉम्ब, फटाक्यांच्या माळा लावल्याने मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसत होत्या. मुंबईत शिवाजी पार्क, मरिन ड्राइव्ह, कुलाबा परिसरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन झाले. फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली, तसेच मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणही वाढले.
ठाण्यातील हायफाय सोसायटीत तसेच डोंबिवलीतील सुशिक्षितांच्या सोसायट्यांमध्ये मुख्यत्वे फटाके फोडण्यात आले, हे विशेष धक्कादायक. ठाणे जिल्ह्यात शुक्रवार, शनिवारी झालेल्या पावसांच्या सरींमुळे हवेची गुणवत्ता सुधारली होती. मात्र रविवारच्या अनिर्बंध फटाके फोडण्यामुळे ती घसरली. उल्हासनगर शहरात हवेची गुणवत्ता एमएमआर क्षेत्रात सर्वात खराब ३०१ इतकी नोंदवली गेली. येथे रात्री उशिरापर्यंत अक्षरश: बॉम्बवर्षाव सुरू असल्यासारखे फटाके फोडत होते. भिवंडीतील डाइंग, सायझिंगमुळे प्रदूषणात वाढ असताना फटाक्यांनी त्यात भर घातली. अंबरनाथ, बदलापूरमध्येही फटाक्यांनी आवाज व वेळेचे बंधन पाळले नाही. पालघर जिल्ह्याच्या काही भागांत महापालिकेच्या परिसरातही रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले गेले. यामुळे हवेतील प्रदूषण, ध्वनिप्रदूषण वाढले. मीरा-भाईंदरमध्ये फटाके फोडण्याची वेळ ठरवून देऊनही त्याला काडीचे महत्त्व न देता रविवारी बहुतांश लोकांनी सायंकाळपासून मध्यरात्र उलटून गेल्यानंतरसुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले. वसईतील नऊ प्रभागांत नऊ वायुप्रदूषण नियंत्रक पथकांची नियुक्ती मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केली होती,
पण त्यांना कोणीही जुमानत नसल्याचे वसईत दिसून आले. वसईतील नालासोपारा, विरार, नायगाव शहरांसह ग्रामीण भागातही लक्ष्मीपूजनच्या दिवसा व रात्रभर मर्यादेव्यतिरिक्त फटाकेबाजी करण्यात आली. दिवाळी आणि विश्वचषक सामन्यांमुळे नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांत मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडले गेले. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मध्यरात्री अडीचपर्यंत फटाक्यांचे आवाज दणाणत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगडमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. आकाशातही फटाक्यांची रोषणाई पाहायला मिळाली. यामुळे जिल्ह्यातील हवेच्या प्रदूषणात काही प्रमाणात वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचे अधिकारी जे. एस. हजारे यांनी सांगितले.
फटाक्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत ७८४ गुन्हे नोंदवत ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगरात दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत फटाके फोडणार्या ४९ जणांवर महापालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येत कारवाई केली. महापालिका व पोलीस विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. तब्बल ४९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्यांमुळे दुचाकी जळून खाक झाली. फटाक्यांमुळे ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ व सीबीडी आगीच्या घटना घडल्या. यात गवताला आग लागण्याच्या घटना अधिक आहेत. उल्हासनगर शहरात फटाक्याने आगी लागण्याच्या ३ घटना सोमवारी रात्री उघड होऊन आगीत लाखोंचा ऐवज खाक झाला. रात्री १० नंतर फटाके वाजविण्यास बंदी असतांना मध्यरात्रीचे ३ वाजे पर्यंत पटक्याची आतिषबाजी सुरू असूनही आतापर्यंत एकही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला नाही. कॅम्प नं-१, हेमराज डेअरी जवळील राधाकृष्ण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी मध्यवर्ती आग लागून चंचलानी यांच्या घरातील लाखोंचा ऐवज आगीत खाक झाला.
मिरारोड परिसरात फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी आगी लागल्या असून त्यात ४ घरांना व एका दुचाकीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. फटाक्यां मुळे कचरा वा ज्वलनशील वस्तूं आगी लागल्या . ४ घरांना फटक्यां मुळे आगी लागल्या . सदर आगी ह्या रॉकेट फाटक्या मुळे लागल्या आहेत . त्यातील मीरारोडच्या सिल्वर सरिता भागातील पृथ्वी प्राईड ह्या २२ मजली टॉवरच्या १८ व्या मजल्यावरील सदनिका रॉकेट फटाक्याच्या आगीने मध्यरात्री जळून खाक झाली . मोठी आग लागल्याने इमारतीतील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्या मुळे दुचाकी जाळून खाक झाली .
0 टिप्पण्या