डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील केवळ भारताच्या नव्हे तर विश्वाच्या ज्येष्ठ राजकीय, सामाजिक नेत्यांपैकी एक नेते होते. तसेच ते या शतकातील काही प्रमुख विचारवंतांच्यापैकी एक विचारवंतही होते. समाजसुधारणेसंबंधी त्यांचे विचार आजही प्रमुख मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांचे लेखन विविधांगी आहे. त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेले प्रयत्न, समाजसुधारकाचे स्वीकारलेले व्रत हा त्यांच्या कर्तृत्वाचा एकपैलू आहे. स्वांतत्रपूर्व भारतात स्वातंत्र्याची चळवळ कोणत्या दिशेने जावी आणि स्वातंत्र्योत्तर भारताची समाजव्यवस्था कोणत्या मूल्यांवर उभी असावी, स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी या संबंधीची दृष्टी देणारे त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेले महत्त्वाचे राजकीय स्वरुपाचे कार्य हा त्यांच्या कर्तृत्वाचा दुसरा पैलू आहे. स्वतंत्र भारतात सामान्य कामगाराचे प्रश्न कसे सुटतील, त्यासाठी राजकीय पक्ष कसा असावा, भारतासमोरील भाषिक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रश्न कसे सोडवावे या संबंधीची मते व्यक्त करणारा कामगार नेता, एक राष्ट्रभक्त म्हणून बाबासाहेबांनी केलेले कार्य हा त्यांच्या कर्तृत्वाचा तिसरा पैलू आहे.
शूद्र पूर्वी कोण होते? आणि अस्पृश्य मूळचे कोण? यावर प्रकाशझोत टाकणारे संशोधन; हा बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा चौथा पैलू तर बुध्द आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचे लेखन करणारे तत्वचिंतक, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महान पैलू आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा केवळ सामाजिक अथवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला नाही तर पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनियोग, संरक्षण व परराष्ट्र धोरण, कामगार कल्याण, बांधकाम आदींच्या संदर्भातही सखोलपणे विज्ञानवादी विचार केला होता. त्यांचे या विषयासंदर्भातील विचार लोकांसमोर आणण्याची गरज आहे. विविध संस्कृती, भाषा, जाती- धर्म, प्रांतामध्ये विभागलेल्या या देशाला एकत्रितपणे बांधुन संगठीत करण्याचे अद्वितीय कार्य बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहून केले. संसद, प्रशासन व न्यायव्यवस्था यांना संविधानाच्या कक्षेत राहून स्वतंत्र अधिकार दिलेत.
या देशाला भविष्यातील आर्थिक व सामाजिक विकासाचे नियोजन दिले. दामोदर खोरे प्रकल्प, नदी जोड प्रकल्प, पॉवरग्रीड, रिजर्व बँक, एप्लॉयमेंट एक्सचेंज विभाग इत्यादी संकल्पना मांडून अस्तित्वात आणल्या. संपूर्ण आयुष्यभर मानवी हक्कासाठी, प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळावी ह्यासाठी संघर्ष केला. जाती व्यवस्था ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे हे समजून जाती निर्मुलनासाठी लढा दिला. भारतीय संस्कृतीला अभिप्रेत समतेवर आधारित बुध्दधमाची सम्यक दृष्टी दिली. कामगारांसाठी कामाचे तास, प्रॉव्हिडंट फंड, सुट्टया इत्यादींची तरतूद केली. कष्टक्रयांची जमीन म्हणून खोती व्यवस्था नष्ट केली. महिलांना समान हक्क मिळावेत म्हणून हिंदू कोड बिलासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन, समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या तत्वावर आयुष्यभर लढणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ख्रया अर्थाने या देशाचे 'राष्ट्रनिर्माता' आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील जलस्त्राेत व्यवस्थापनाबाबत तसेच वीज निर्मिती संदर्भात केलेल्या विज्ञानवादी कार्यावर डॉ. सुखदेवराव थोरात यांनी ग्रंथ लिहून भारतीयांना परिचय करून दिला आहे. डॉ. विजय खरे यांनी आणि विजय गायकवाड यांनी अनुक्रमे त्यांच्या संरक्षण विषयक व परराष्ट्रीय धोरणांचा व्यवहारवादी दृष्टीकोन जगासमोर आणला. डॉ. आंबेडकर व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात असताना त्यांनी व्यवहारी दृष्टिकोन स्वीकारून अनेक योजना आकाराला आणल्या. त्यात दामोदर नदीच्या खोर्यात धरण उभारण्याची योजना लक्षणीय ठरते. हिमालयात उगम पावलेली दामोदर नदी, उडिशा (पूर्वीचा ओरिसा) आणि बिहारच्या भागात पावसाळ्यात अभिशाप ठरली होती. हे दोन्ही प्रदेश त्या काळात बंगाल प्रांतात मोडत असत. सर्वसाधारणपणे दर दोन वर्षांच्या अंतराने दामोदर नदीच्या पुराने उडिशा आणि बिहार मधील अनेक गावे वाहून जात असत.याबाबत डॉ. आंबेडकरांनी नोव्हेंबर 1943 मध्ये उडिशातील कटक शहरात केंद्र तसेच राज्यातील सर्व संबंधित इंजिनियर्स आणि अधिकारी वगौची बैठक बोलावून आलेल्या पुराचा सकारात्मक विनियोग अथवा उपयोग कसा करता येईल याबाबत विचार करण्याची सूचना केली.
या पुराला शाप न मानता वरदान मानायला हवे! पावसाचे पाणी साठवून त्याचा मानवी जीवनासाठी जलव्यवस्थापन करण्याची तसेच वाहतुकीसाठी जलप्रवाह वहात ठेवणे यासारखे उपक्रम राबवता येतील का हे पाहण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना केली. कटक येथील ही बैठक बोलवण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी म्हैसूर संस्थानात डॉ. विश्वेश्वरैय्या यांनी उभारलेल्या तुंगभद्रा नदीवरील धरणाचा तसेच जलसिंचन प्रकल्पासाठी त्या काळात अग्रेसर असलेल्या पंजाब प्रांतातील लहान मोठ्या धरणांच्या उभारणीसंबंधात लिहिल्या गेलेल्या आणि अमेरिकेतील टेनीसी नदीच्या खोर्यात त्या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणावरील ग्रंथाचाही सखोल अभ्यास केला होता. त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की, अमेरिकेतील टेनेसी धरण प्रकल्प, दामोदर नदी खोरे प्रकल्पाशी तंतोतंत मिळता जुळता आहे. धरण बांधकाम शास्त्रावरील तांत्रिक ग्रंथ अभ्यासल्यावर दामोदर धरण प्रकल्पाचे बांधकाम त्याच धर्तीवर व्हावे असा त्यांनी मनोमन निश्चिय केला.
व्हाईसराय वेव्हेल यांनी दामोदर व्हॅली प्रकल्पाला मान्यता देताना दामोदर नदीवरील धरणाचे बांधकाम एखाद्या ब्रिटिश इंजिनियरकडे सोपविण्याचे डॉ. आंबेडकरांना सुचविले होते. तर डॉ. आंबेडकरांना केवळ देखरेखीसाठी टेनीसी धरण प्रकल्प उभारणीशी संबंधित तज्ञ इंजिनियरची नेमणूक करून प्रत्यक्ष धरण उभारणीचे काम एखाद्या तज्ञ भारतीय इंजिनियरने करावे असे वाटत होते. त्या दृष्टीने त्यांच्या नजरेसमोर त्या काळातील पंजाब प्रांतातील चीफ इंजिनियर रायबहादूर ए. एन. खोसला यांचे नाव होते. तर रायबहादूर खोसला यांना एका अस्पृश्य मंत्रांच्या देखरेखीखाली काम करणे हे कमीपणाचे वाटत होते. डॉ. आंबेडकरांनी टेनेसी व्हॅली अँथोरिटी या संस्थेत काम केलेले धरण बांधकाम तज्ञ ड्युअर ड्युईन यांची धरणाचा आराखडा तयार करण्यासाठी नेमणूक केली.
रायबहादूर खोसला यांचे पूर्वग्रहदूषीत मत समजल्यावर डॉ. आंबेडकरांनी स्वत:च पुढाकार घेवून खोसला यांना बोलावून घेतले व मी मनात आणले तर केवळ अमेरिकनच नव्हे तर अन्य प्रगत देशातील तज्ञ इंजिनियरची नेमणूक करू शकतो. एवढेच नाही तर तुमची इच्छा नसतानाही त्याजागी तुमची नेमणूक करू शकतो. तुमच्या नेमणुकीमागील माझा एवढाच हेतू आहे की, दामोदर धरण एका तज्ञ भारतीय इंजिनिअरद्वारा उभारले जावे. तुमच्या एवढा स्थापत्य शास्त्राचा अभ्यास असलेला इंजिनिअर माझ्यासमोर दुसरा नाही म्हणून तुम्ही हे पद स्वीकारावे असे मला प्रामाणिकपणे वाटते अशा शब्दात त्यांची समजूत काढली. डॉ. आंबेडकरांचे हे स्वराष्ट्राभिमानी विचार ऐकून रायबहादूर खोसला यांनी त्यांची क्षमा मागितली आणि दामोदर व्हॅली प्रोजेक्टच्या चीफ इंजिनियरची जागा लागलीच स्वीकारली. त्यांनीही आपले सहकारी निवडताना ते केवळ भारतीयच असतील याची काळजी घेतली. पुढे हे काम स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रायबहादूर खोसला यांच्या समर्थ नेतृत्वाखाली परीपूर्ण झाले.
यावरून असे स्पष्ट होते विविधांगी विचार करत असलेले बाबासाहेब नेहमी राष्ट्राच्या प्रगतीला महत्त्व देत असत. मी प्रथमत भारतीय आहे आणि अंतिमतही भारतीयच राहिन असे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले. बाबासाहेबांचा विविधांगी अभ्यास हा जगातील विचारवंताचा नेहमीच आश्चर्यचकित करून सोडणारा आहे. आजही त्यांच्या साहित्याचे अनेक पैलूंवर अभ्यास करणे गरजेचे आहे. नव्हे ते येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण उन्नतीकरिता उपयुक्त आहे.
- सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या