‘‘ दुर्दैवाने ‘अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही. अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’
‘‘मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे, हे गांधींचे म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वतःच्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते, त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच त्याला चिकटून राहिले पाहिजे हा त्यांचा दंडक मात्र मुळीच कबूल नाही. धर्मांतर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच. थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे. हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही.’’
‘‘धर्मांतरांच्या विषयावर जसा सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्त्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे. अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची बाब झाली आहे असे अनेक दैनंदिन घटनांवरून दिसून येते. मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य आवश्यक असते. एक मनुष्यबळ, दुसरे द्रव्यबल व तिसरे मानसिक बल. सामर्थ्य असल्याशिवाय जुलमाला प्रतिकार करता येणार नाही. प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून धर्मांतर करून अन्य समाजात अंतर्भूत झाल्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही. व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्याकारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाकरिता सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकही बाब उपलब्ध नाही... ‘मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे.’’
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१३ ऑक्टोबर १९३५, मुंबई इलाखा अस्पृश्य परिषद, येवला
0 टिप्पण्या