विधानसभा निवडणुक निकाल येत असताना राष्ट्रवादी नेत्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला याची कारणे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावित - आनंद परांजपे
२०१४ चे विधानसभेचे निकाल येत असताना सिल्व्हर ओकच्या बाहेर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा का केली होती, यामागची कारणे डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला सांगावे, असे उघड आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.
माननीय डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा स्थायीभाव आहे की अर्धसत्य काहीतरी सांगायचे आणि अर्धसत्य सांगत असतानाच कायमच महाराष्ट्राची दिशाभूल करायची, हाही त्यांचा स्थायीभाव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूका झाल्यानंतर आणि २०१४ च्या विधानसभा निवडणूका होण्याच्यामध्ये अलिबागला हाॅटेल रविकिरण येथे २०१४ मध्ये लोकसभेचे विजयी झालेले उमेदवार आणि जे लोकसभेला उभे होते पण पराभूत झाले असे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार व प्रमुख पदाधिकारी यांची दोन दिवसीय आढावा बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी मी सोशल मिडियाचा इनचार्ज असल्यामुळे सोशल मिडीयाचे प्रेझेंटेशन दिले होते. कुठेही त्यावेळचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी आमदारांची गुप्त बैठक घेतली नव्बती, की या बैठकीत भाजपबरोबर जाण्याबाबत विषयही झाला नाही अथधा चर्चाही झाली नाही. किंबहुना २०१४ च्या विधानसभेचे निवडणूक निकाल येत असताना, सिल्व्हर ओकच्या बाहेर पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड काउंटिगमध्ये होते. त्यांचाही रिझल्ट आला नव्हता. भाजप १२२ पर्यत पोहोचला देखील नव्हता, राष्ट्रवादीचे किती निवडून आले ही संख्या माहित नव्हती, शिवसेनेचे किती निवडून आले हे माहित नव्हते काॅग्रेस किती आले, अपक्ष किती आले ही संख्या देखील माहित नव्हते. अशावेळी विधानसभा निवडणुकीचा निकालाचा निर्णय येण्याअगोदर सिल्व्हर ओकला राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल व तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यानी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा दिल्यामागची कारणे जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला जरुर सांगावीत असे आपले त्यांना उघड आव्हान आहे.
पण ही गोष्ट स्पष्ट आहे की, जितेंद्र आव्हाड म्हणतात तसे, विधानसभा २०१४ च्या निवडणूका होण्याआधी कोणतीही गुप्त बैठक झाली नव्हती. खोट बोल पण रेटून बोल आणि माझ्याभोवती राजकारण फिरले पाहिजे, पक्षापेक्षा मी मोठा हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायीभाव आहे. त्यांनी खरेतर आत्मचिंतन करण्याची गरज आहे की गेल्या अनेक वर्षांत त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून का गेले ? पण हा ही इशारा आम्ही जितेंद्र आव्हाड यांना देत आहोत की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे आमचे प्रांताध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्याबद्दल कोणतेही खोटे आरोप करु नका, त्याचे जशास तसे उत्तर आम्हाला देखील देता येते. इतिहासाची मोडतोड करुन वास्तव बदलून आपण काहीही साध्य करणार नाही, असे आनंद परांजपे म्हणाले.
0 टिप्पण्या