Top Post Ad

दीक्षाभूमी, चैत्यभूमीवरील प्रचंड गर्दीचा पोटशूळ


   धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर रेल्वेने येणाऱ्या अनुयायांविरोधात ॲड. अविनाश काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन, धम्मचक्र प्रवर्तन दिनी देश विदेशातील लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे येतात. दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनुयायांमुळे इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या अनुयायांवर कोणाचेही नियंत्रण नसते असे नाहक आक्षेप याचिकेव्दारे करण्यात आले आहेत. त्यामुळे, साहजिकच आंबेडकरी समाजात संतापाची भावना निर्माण झाली. मात्र, संबंधित सर्व आक्षेप चुकीचे असल्याने याचिका फेटाळून लावण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई सुसाई, अनिकेत कुत्तरमारे यांच्यासह इतर १९ आंबेडकरी अनुयायांनी केली असून, समता आरोग्य प्रतिष्ठान यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला तर, व्देषभावनेतून याचिका दाखल करण्यात आली असल्याने न्यायालयाने ती रद्द करावी अशी मागणी नागपूरमधील आंबेडकरी युवा कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयांसह पवित्र नागभूमीत 'न भूतो, न भविष्यती' अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या जीवनात परिवर्तनवादी स्थित्यंतर घडविले. त्यामुळे, धम्म दिक्षेच्या ६६ वर्षानंतर दीक्षाभूमीवर तसेच महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर महाराष्ट्रासह साऱ्या देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या थोर नेत्याचे भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्रतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने चैत्यभूमीवर येत असतात अन् येतच राहणार. प्रतिवर्षी त्यांच्यात विक्रमी वाढ होत आहे अन् होतच राहणार. धम्मचक्र परिवर्तन दिनी तसेच महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी जगाला शिस्त, संयम अन् वैचारिक प्रगल्भतेचं आदर्श दर्शन घडवून दिले आहे. दीक्षाभूमीवरील अन् चैत्यभूमीवरील प्रचंड भीमसागर हा विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्द व प्रेरणास्रोत युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्यासाठी स्वयंपुर्तीने, उत्स्फुर्तपणे लोटला जात असतो. कधी अनुचित प्रकार, चेंगराचेंगरी, चोऱ्यामाऱ्या न होता सर्व काही सुरळीत संपन्न होत असते.

सन २००८, २००९ मध्येही चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांविरोधातही असाच पोटशूळ उठला होता. त्यावेळी काही भांडवलधारी इंग्रजी वृत्तपत्रांनी पुढाकार घेऊन, चैत्यभूमीवरील आंबेडकरी अनुयायांच्या उपद्रवी गर्दीमुळे दादरकरांनी मुंबईतून काढता पाय घेतला, दादरकरांना श्वास मुठीत धरुन जगाव लागते, परिसरातील रुग्णालयांना शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागतात अशी निराधार अन् खोडसाळ वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात एका डॉक्टरांनी तर प्रतापच केला. म्हणे भीमसैनिकांची गर्दी उत्स्फुर्त नसते, त्यांना इच्छेविरुद्ध राजकीय पक्ष पिटाळत आणत असतात. आता तर, रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनुयायांमुळे इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो अशी ॲड. अविनाश काळे यांनी याचिका दाखल केली. पण, जगाच्या पाठीवर बाबासाहेब एकमेव असे अजरामर, दिग्विजयी नेते आहेत की, त्यांच्या पश्चात त्यांचे वाढते प्राबल्य काही मंडळींना सहन होत नाही. 

ठिक ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असले तरीही, धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी व महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला सारे रस्ते येऊन मिळतात. ओसंडून वाहणारी गर्दी ही कृतज्ञपुर्वक असतांना त्याबद्दल विरोधाभास, विद्वेषाची, खोडसाळपणाची भावना, गरळ का ओकली जाते ? धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कालावधी व महापरिनिर्वाण दिनाच्या कालावधीत रेल्वेचे उत्पन्नही अनेक पटीने वाढत असल्याचे रेल्वेनेही अनेकदा जाहीर केले आहे. करोडो रुपयांची पुस्तक विक्रीही होते. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवर प्रत्येक वर्षी लोटणारा महा प्रचंड भीमसागर, गर्दी हीच तुमची पोटदुखी आहे का ? संविधानाने प्रत्येक व्यक्तीला, समाजाला श्रध्देचा व उपासनेचे स्वातंत्र्य दिले असतांना दीक्षाभूमी, चैत्यभूमीवरील प्रचंड वाढणाऱ्या जनसमुदायाला तुमचा विरोध असेल तर, हाच मापदंड तुम्ही सर्वच समाजाला लावणार का ? तसे तुम्ही केले तर, देशात कोणत्याच समाजाला सण, उत्सव, कार्यक्रम साजरे करता येणार नाहीत. परस्पर विरोधी भावना प्रसिद्ध करुन, समाजामध्ये दुही निर्माण करण्यापेक्षा देशाला आज सामाजिक सलोखा, संवाद, समन्वय, सौजन्यपणा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. 

 मिलिंद कांबळे, चिंचवलकर...  ९८९२४८५३४९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com