Top Post Ad

ऐका... सत्य नारायणाची कथा.....


   सत्यनारायणाच्या पूजेत ' सत्य ' काय.?

 प्रत्येक देव-देवतांच्या भोवती गुंफलेल्या कथा कहाण्या भन्नाट कपोलकल्पित आणि कुठल्याही तर्कात न बसणाऱ्या असतात. या कथांची सत्य-असत्यता , शक्य- अशक्यता ही पडताळायची संधी नसते.याबाबत उगाच डोक्याचा वापर करायचा नसतो. डोके बाजूला ठेवून श्रद्धेने ते निमुटपणे मान्य केल्यावरच देव-देवता प्रसन्न होतात. अशीच एक भन्नाट पूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा...

आज सर्वात जास्त  चलती याच देवाची आहे. काही वर्षांपूर्वी संतोषी मातेच्या व्रताचा प्रचंड बोलबाला होता. दोन-चार वर्षांपूर्वी कुणाच्या कानावरही नसलेल्या नारायण नागबळी या पूजेचे प्रस्थ हल्ली जोर धरत आहे . आजकाल काहीही कार्य असले तरी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. वर्षभरात कुठलीही पूजा घातली गेली नसेल तर सत्यनारायणाची ही पूजा सहज म्हणून घातली जाते. ज्या घरात आजपर्यंत सत्यनारायणाची पूजा घातली गेली नाही असे हिंदूंचे घर सापडणे कठीण आहे. घराघरात, दुकानात घातली जाणारी ही पूजा आता नाक्या-नाक्यावर, चौकात, सार्वजनिकपणेही घातली जाते. एखादे सांस्कृतिक मंडळ, कामगार युनियन यांच्यामार्फत, काम करण्याच्या ठिकाणी, ऑफिस, कार्यालय, रस्त्यावर, पूजा घालायची पद्धत कधी आणि कशी शिरली ते कुणाला कळले देखील नाही.

 या सत्यनारायणाच्या पूजेची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या लक्षात येते की या पूजेचा कुठल्याही पोथी पुराणात उल्लेख नाही. कुठलाही ऐतिहासिक दस्तऐवजात त्याची नोंद सापडत नाही. अगदी अलीकडच्या शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशवाईच्या दस्तऐवजांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आढळत नाही. शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला त्या प्रित्यर्थ सत्यनारायणाची पूजा घातली किंवा नवीन किल्ला बांधला म्हणून जिजामातेने सत्यनारायणाची पूजा घालण्याची मनीषा जाहीर केल्याने, पूजा घालण्याचा संकल्प राजा शिवाजींनी केल्याची नोंद कुठे आढळत नाही. फार दूरचे जाऊ द्या साधारण १०० वर्षांपूर्वीच्या काळाततील कुठलाही पुस्तकात या सत्यनारायणाच्या पूजेची नोंद आढळत नाही. तरीही पूजा सर्वत्र घातली जाते. या पूजेतही इतर कथासारखीच एक भाकडकथा रचलेली आहे. ती कथा अशी :

एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले "मुनिश्रेष्ठ मनातली सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा" त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्रीविष्णूला विचारला होता ती हकीगत मी तुम्हाला सांगतो.  असे म्हणून श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील सत्यनारायणाच्या कथेच्या पहिल्या अध्यायात श्री भगवंत सत्यनारायणाचे महत्त्व सांगतात. मग हे व्रत पूर्वी कोणी केले होते, याबाबतच्या कथा अध्याय दुसरा तिसरा चौथा आणि पाचव्या अध्यायात सांगितले आहेत. दुसऱ्या अध्यायात एका दारिद्र्य ब्राह्मणाने पूजा घातल्याने तो दारिद्र्यातून मुक्त होऊन सुखी झाल्याची आणि त्याची पूजा पाहून एका मोळीविक्याने तीच पूजा ईस्ट बांधवांसाठी घातल्याने व्रताच्या प्रभावाने पृथ्वीवर परमसुख पाहून शेवटी मोक्षाला गेल्याचे सांगितले आहे.

 तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायातील साधुवाण्याची कथा तर फारच भन्नाट आहे .सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करतात साधू वाण्याला कन्यारत्न प्राप्त होणे, पूजा करण्यास टाळाटाळ केल्याने त्याच्यावर संकट कोसळणे, त्याच्या मुलीने प्रसाद ग्रहण न केल्याने तिच्या नवऱ्याचे जहाज पाण्यात बुडणे आणि प्रसाद ग्रहण करताच बुडालेले जहाज तिच्या नवऱ्यासह वर येणे,  याबाबतची कथा सविस्तर सांगितली आहे. पाचव्या अध्यायात अंगद्वज राजाने गवळ्यांनी दिलेल्या सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण न केल्याने व नमस्कार न केल्याने त्याचे शंभर पुत्र मृत्युमुखी पडल्याची धनसंपत्ती नष्ट झाल्याची कथा सांगितली आहे.

 कशाचा कशाशीच ताळमेळ नसलेल्या या भन्नाट कथांचे वाचन पूजेचा एक भाग म्हणून केले जाते. खरंच बुडालेले जहाज, बुडालेल्या माणसांसह एका पूजेने वर येऊ शकते?  एखाद्या राजाची मृत्युमुखी पडलेली १०० मुले त्याला परत मिळू शकतात? पूजा करण्याच्या नुसत्या निश्चयाने कुणाला मूल होऊ शकते? बहुजन समाजाला पूजापाठ कर्मकांडात बुडवून ठेवण्याच्या ब्राह्मणांच्या चतुर कुटील मानसिकतेतूनच या कथेचा जन्म झाला. थोडक्यात काय तर सर्वजण करतात म्हणून आपणही करायची. एवढ्या फेमस सत्यनारायणाची पूजा घालू नका असे सांगणे म्हणजे केवढा नास्तिकपणा..!

 जोपर्यंत या समाजाला आधुनिक संत गाडगे महाराजांसारखे सत्यनारायण सारख्या पूजेला भाकडकथा ठरवून विरोध करण्याची समज व धैर्य येत नाही, विज्ञाननिष्ठ विचारांच्या संत तुकाराम यांच्या दृष्टीने समाजातील निरर्थक चालीरीतींचे तर्कशुद्ध पद्धतीने विश्लेषण करून त्यावर कठोर प्रहार करण्याची कुवत येत नाही, तोपर्यंत किमान वर्षानुवर्ष आमच्या मेंदूवर पूजापाठ कर्मकांडाच्या  माध्यमातून वर्चस्व ठेवणाऱ्या ब्राह्मणांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.?

प्रा प्रवीण देशमुख
बी/२१ निळकंठप्लाझा  महात्मा फुले रोड, डोंबिवली (पश्चिम)

----------------------------------------

 सत्यनारायणाच्या पूजेत 'सत्य' काय.....?   १७ वर्षांपूर्वी माझा हा लेख सकाळ वृत्तपत्राच्या, शुक्रवार १७ नोव्हेंबर २००६ च्या संपादकीय पानावर महाराष्ट्रातल्या सर्वच आवृत्यांमध्ये प्रकाशित झाला होता. खरंतर हा खूप काटछाट करून प्रकाशित झालेला अतिशय मवाळ लेख आहे. संपूर्ण मोठा लेख त्यावेळी वृत्तरत्न सम्राट आणि महानायक या वृत्तपत्रांनी छापला होता. बहुजन चळवळीतील अनेक मासिकांमधून तो प्रकाशित झाला. हिंदू धर्माची चिकित्सा करित अनेक उदाहरणासहित तो प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्या पार्श्वभूमी वरती सत्यनारायणाच्या पूजेची चिकित्सा केली होती. मात्र सकाळमधील या एडिटेड लेखाने सुद्धा भरपूर गदारोळ माजवला होता. 

लेखाच्या खाली माझा संपूर्ण पत्ता आणि भ्रमणध्वनी छापलेला होता. जवळपास एक महिना दिवसभरात अनेकांचे घाणेरड्या भाषेत धमक्यांचे फोन येत होतेच, तर रोज रात्री नऊ नंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे उत्साही कार्यकर्ते नित्यनेमाने शिवीगाळ करत होते. मी कोणाविरुद्धही तक्रार केली नाही. मला जे मांडायचं होतं ते मांडून माझ्या लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. लेखा खाली माझा संपूर्ण पत्ता असूनही कुणाची माझ्या दारापर्यंत यायची हिंमत झाली नाही. कारण प्रत्येकाशी ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत संवाद साधत होतो. हे सूरु असतानाच बहुजन चळवळीतील अनेकांचे पाठिंबा देणारे फोन, पत्र प्राप्त झालेत. विशेष उल्लेख करावा लागेल तो संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा.अनेकांनी फोन द्वारे, पत्र व्यवहार करून, सर आपण योग्य भूमिका मांडली आहे,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा प्रतिसाद दिला होता.

सत्यनारायणाच्याच काय, आमचा कुणाच्याही, कुठल्याही पूजेला विरोध नाही. संविधानाने प्रत्येकाला पूजाअर्चा करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु  दरवेळी वेगवेगळ्या पूजा-पाठ तयार करून बहुजनांची लुबाडणूक करणारा ब्राह्मण यामध्ये कशाला..? हा माझा रास्त सवाल होता आणि आहे. कुठलाही देवाला, धर्माला, पूजा अर्चनेला आमचा विरोध नाही. पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला आमचा विरोध आहे आणि तो नेहमीच राहील.  साधुसंतांची, समाज सुधारकांची हीच खरी शिकवण आहे असे आम्ही मानतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com