Top Post Ad

ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार

 


ठाण्यातील पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदीर समोर असलेल्या बाजारपेठेतील कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराचा जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच माती परीक्षण (Soil testing) यांच्या माध्यमातून केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल, असे या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

 महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे व १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आणि कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले असल्याचे सांगण्यात येते.  १८७९ मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला.  मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून याबाबतची पाहणी  मंदिराच्या विश्वस्तांसोबत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिराच्या विश्वस्तासमवेत बैठक पार पडली.

यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. तसेच मुख्य मंदिराचे डिझाईन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व व मंदिराच्या नवीन गाभा-याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती,  वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

श्रीकौपीनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसर, मंदिराची  इमारत, दशक्रिया विधी परिसर याबाबत नियोजन करताना मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी  नमूद केले.

तर भाजी मंडई व त्या परिसरात असणारे मंदिराचे प्रवेशद्वार परिसर सुशोभित करण्यासाठीही योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. सुशोभिकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरूण कलमदानी यांनी मंदिर तसेच या परिसरात होणारे उपक्रम, येणारे भक्त आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन एक आराखडा तयार केला आहे. तो आराखडा पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पहावा अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. ती विनंती मान्य करुन हा आराखडा पाहून व सदर वास्तुरचनाकारांशी चर्चा करू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

            मंदिराचे स्ट्रक्चर आँडिट झाल्यानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करावा हे स्पष्ट होईल. तसेच माती परिक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलीवर आहे हे कळेल, त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील. तसेच जर मंदिराचा पूर्ण  जिर्णोद्धार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू व त्याकाळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करुनच बांधकाम करावे लागेल, त्यामुळे याबाबत मा. मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती दर्शक माहिती देऊ. त्या पुढील निर्णय त्यांच्या निर्देशाप्रमाणे घेऊन कार्यवाही करु, असे बांगर यांनी सांगितले. त्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली. बैठकीस, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी तसेच, विश्वस्त मंडळाकडून विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे आदी  उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com