Top Post Ad

ती लढेल. प्राणपणाने लढेल. धर्मांध नि सत्तांध शक्तींना पुरून उरेल

 

तीस्ता......

न्यूजक्लिक संकेतस्थळाशी संबंधित अनेकांवर छापेमारी होत असताना, एका व्हीडिओत मला निरंत बंगल्याचे व्हिजुअल्स दिसले. मी थबकलो. म्हटलं, अरे हा तर तीस्ता सेटलवाड यांचा बंगला. मग लक्षात आलं, या सगळ्यातून पुन्हा एकदा तीस्ता सेटलवाड यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आधी वाचलेलं, मात्र काही नोंदी नीटशा आठवत नव्हत्या, म्हणून पुन्हा वाचलं - संविधानाचा जागल्या. तीस्ता सेटलवाड यांचं आत्मचरित्र. किंवा संघर्षपट म्हणूया. हे जास्त योग्य राहील.

मला आजवर तीस्तासारख्या माणसांचं कमालीचं कुतुहल वाटत आलंय. म्हणजे, ज्यांचं शब्दश: तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्म झालेला असतो, मात्र पुढील आयुष्यात सर्व सुखासीन आयुष्य झुगारून शोषित-वंचितांच्या न्याय्यहक्कांसाठी आयुष्य पणाला लावणं. आपलं सुखवस्तू आयुष्य झुगारून संघर्ष-संकटांना स्वत:हून स्वीकारणं, हे सहजशक्य नाही. तीस्तानं ही सहजशक्य नसलेली गोष्ट प्रत्यक्ष करून दाखवली, दाखवतेय. हे जीवावर बेतणारं धाडस तिच्या अंगात कुठून आलं असेल, याचं उत्तर या पुस्तकात सापडतं. 

सर चीमणलाल सेटलवाड.- १९२३-२४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. या सभेच्या स्थापनेत सर चीमणलाल सेटलवाड यांनी मोलाचा वाटा उचलला. अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील सर चीमणलाल सेटलवाड यांना शोषित-वंचितांच्या प्रश्नांची जाण होती आणि त्यातूनच ते आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. बहिष्कृत हितकारणी सभेचे सर चीमणलाल सेटलवाड पहिले अध्यक्ष झाले.
जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांनी घडवल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आला. हंटर कमिशन त्याचं नाव. या कमिशनमध्ये दोन भारतीय होते. त्यातील एक सर चीमणलाल. इतर सदस्यांनी जनरल डायरला निर्दोष सोडलं खरं, पण सर चीमणलाल सेटलवाड यांनी डायरची उलट तपासणी करून आपलं स्पष्ट मत नोंदवत डायरला दोषी ठरवलं. पण ते अल्पमतात होते. पण जालियनवाला घटना ब्रिटिशांचं दुष्कृत्य असल्याची नोंद त्यांनी लिहून ठेवली.

एम. सी. सेटलवाड. - स्वतंत्र भारताचे पहिले महाधिवक्ता. सुमारे १३ ते १४ वर्षे ते भारताच्या विधी क्षेत्रातील सर्वोच्च पदावर ते राहिले. तिथून बाजूला झाल्यानंतर त्यांनी भारतीय संसदेचे सदस्य म्हणून काम केलं.

अतुल सेटलवाड. - भारतातील निष्णात आणि अत्यंत प्रामाणिक विधिज्ञ. नैतिकता हा अवगुण झाला नव्हता, त्या काळाचे प्रतिनिधी. एक उदाहरण सांगायचं, तर सॅम भरूचा हे अतुल सेटलवाड यांचे जिवलग मित्र. हे भरूचा पुढे मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश आणि त्याहीपुढे ते भारताचे सरन्यायाधीश झाले. भरूचा यांना न्यायाधीश म्हणून बढती मिळाली, तेव्हा अतुल सेटलवाड यांनी त्यांच्या पीठासमोर वकील म्हणून उभं राहणं बंद केलं. नैतिक मूल्य इतक्या कसोशीने पाळणारे अतुल सेटलवाड होते.

तीस्ताबद्दल लिहित असताना, मधेच या तिघांबद्दल का सांगत बसलोय? तर या तिघांचाही तिच्याशी संबंध आहे आणि तो इथे अधोरेखित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. याचं कारण आज उठल्या-सुटल्या तीस्ता सेटलवाड यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होत असताना, तिच्या वैयक्तिक इतिहासात डोकावून, तिची आणि तिच्या कुटुंबाची देशाप्रति, नैतिक नि मानवी मूल्यांप्रति असलेली कमिटमेंट सुद्धा विषद केली पाहिजे.

तर सर चीमणलाल सेटलवाड हे तीस्ताचे पणजोबा.

एम. सी. सेटलवाड हे तीस्ताचे आजोबा.   

आणि अतुल सेटलवाड हे तीस्ताचे वडील.

अशा मानवी मूल्यांना सर्वोच्च मानणाऱ्या घरात तीस्ता जन्मलीय, वाढलीय आणि वारसा घेऊन जगतेय. तिच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित करताना, तिचा हा वारसा सुद्धा एकदा नजरेखालून घातला पाहिजे. बाकी तीस्ताचं स्वत:चं काम सुद्धा या तिच्या तीन कुटुंबपुरुषांइतकंच किंबहुना, कणभर अधिकच मोठं आहे. धर्मांध सत्ताशक्तींशी तीस्ता प्राण पणाला लावून लढलीय. अजूनही लढतेय. अगदी कालपरवापर्यंत. आजही. आणि उद्याही लढेल, याची खात्री आहे. तिच्या रक्तातच ते लढणं आहे, हे कुठल्याही शंकेविना इथे नमूद करावं वाटतं. तीन-एक पिढ्यांचा वकिलीचा वारसा. मात्र, हा वारसाहक्कानं येणारा व्यवसाय बाजूला सारून, तीस्तानं पत्रकारिता करण्याचं ठरवलं. रुसी करंजियांचं डेली, इंडियन एक्स्प्रेस, बिझनेस इंडिया करत त्यांनी पुढे सबरंग कम्युनिकेशनची सुरुवात केली. त्याअंतर्गत 'कम्युनॅलिझम कॉम्बॅट' नावाचं मासिक सुरू केलं.  "कुठलीही दंगल २४ तासांहून अधिक सुरू राहिली, तर ती सरकार पुरस्कृत असते," हे हल्ली बऱ्याच ठिकाणी वाचनात येणारे विधान ज्येष्ठ पोलीस अधिकारी विभूतीनारायण राय यांचं आहे. हे विधान ज्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, ती मुलाखत तीस्ताच्या 'कम्युनॅलिझम कॉम्बॅट'नेच घेतली होती. मग पुढे इतर माध्यमांनी या मुलाखतीच्या आधारे बातम्या केल्या. 

पुढे 'सिटिझन फॉर जस्टिस अँड पिस'ची स्थापनाही तीस्ता सेटलवाड यांनी केली. ज्येष्ठ नाटककार, लेखक विजय तेंडुलकर हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. तेंडुलकर किंवा तत्सम व्यक्तींचा उल्लेख या आत्मचरित्रात वारंवार येतो. तीस्ता सेटलवाड यांना त्रास देणाऱ्यांची संख्या जशी मोठी होती आणि आहे, तशी त्यांना साथ देणाऱ्यांचीही आहे, हेही त्या आवर्जून उल्लेख करतात. त्यात कुठेही हातचं राखून त्या लिहित नाहीत. मात्र, प्रशासनातील मदत करणाऱ्यांची नावं त्यांना अडचणीची ठरतील म्हणून त्या टाळतात. या सगळ्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले ते जावेद आनंद. तीस्ता यांचे पती. त्याहीआधी सहकारी. भिवंडी दंगल या दोघांनी एकत्रित कव्हर केली. नंतर मुंबईतले स्फोट, दंगली कित्येकवेळा दोघे सोबत राहिले. सबरंग, कम्युनॅलिझम कॉम्बॅट किंवा सीजेपी या सगळ्यात जावेद हे तीस्ताच्या सोबत राहिले.  

मला आठवतंय, या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन दादरला (मुंबई) भूपेश गुप्ता भवनात होतं. मी तिथं उपस्थित होतो. जावेद तिसऱ्या रांगेत बसले होते. तीस्ता मनोगत व्यक्त करताना रडली होती. उपस्थित सगळे अक्षरश: भावूक झाले होते. तिने सर्वासत्तांधीश नेत्यांशी लढाई सुरू केली होती, जी आजही तशीच सुरू आहे.

गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर पुनर्वसन, मदत इत्यादी कामं, शिवाय झाकिया जाफरींसह असंख्य हतबल, असाहय्य पीडितांसाठी न्यायालयीन लढाई तीस्तानं छेडली होती. यात आपला जीव जाऊ शकतो, याची खात्री तिला पहिल्या दिवसापासून होती आणि आजही आहे. आजही तिच्या मागे सत्तांध शक्ती हात धुवून मागे लागल्याचे पावलोपावली दिसून येतंच की. अगदी परवा न्यूजक्लिकशी संबंधित लोकांवर दिल्ली पोलिसांनी धाडी टाकल्या, त्याच दिवशी एक पथक मुंबईतल्या समुद्रिकनारी वसलेल्या निरंत बंगल्यावरही - तीस्ताच्या घरी - पोहोचलं होतं. तिने यापूर्वी शारीरीक हल्लेही पचवलेत.

तीस्ता डगमणारी नाही, हे तिच्या आत्मचरित्रातून अस्खलितपणे दिसतं. तिचा वारसा आणि तिची कमिटमेंट या गोष्टी तिच्या धाडसाला दुजोरा देणाऱ्या आहेतच. मात्र, एक प्रश्न वारंवार मनात येत राहतो, हे सर्व तिला सोसावं, भोगावं लागतंय, ते नेमकं कशासाठी? हतबल, असाहय्य लोकांना मदत केल्यानं? मानवी मूल्य सर्वोच्च मानून केलेल्या गोष्टींना गुन्हा ठरवून, त्या व्यक्तीच्या पाठीमागे धावणारी ही यंत्रणा पाषाणहृदयी आहे, हे म्हटल्यावाचून राहावत नाही. तीस्ताची कमिटमेंट या पुस्तकात तिने नोंदवलीय. तिच्याच शब्दात ते इथं सांगणं जास्त यथोचित ठरेल. शिवाय, तिचा मार्ग किती विधायक आहे, हे सांगण्यासाठी हे विधान पुरेसं आहे. 

तीस्ता म्हणते - "कायदा, कुटुंब व सार्वजनिक नीतीशास्त्र या तिन्हींचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव आहे. बांधिलकी व समर्पणाची कितीतरी उदाहरणे मी माझ्या भल्यामोठ्या कुटुंबात पाहिली. त्यांनीच मला माझ्यासमोर ठाकलेल्या आव्हानांशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे सामर्थ्य दिले. आव्हानांचा कडवेपणा जसजसा वाढत गेला, तसतशी तत्त्वांवरील निष्ठा अधिकाधिक बळकट होत गेली."

  तीस्ताचं पुढे काय होईल, मला माहित नाही. कल्पना नाही. पण ही बाई वाघीण आहे, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. ती लढेल. प्राणपणाने लढेल. धर्मांध नि सत्तांध शक्तींना तीस्ता पुरून उरेल, एवढं नक्की.

       — नामदेव काटकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com