धम्मक्रांतीचा साक्षीदार असलेल्या दिक्षाभूमीवरील उर्जास्त्रोत अर्थात बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी कुणीही न बोलावता, न सांगता बौद्ध समाजाचा मेळावा नागपूरात होतो. त्यासाठी कोणत्या नेत्याची अथवा संघटनेची आवश्यकता लागत नाही. यंदाही अशोक विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दरम्यान या तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख बौद्ध समुदाय आला होता. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आणि अगदी विदेशातील पाहुण्यांनीही यावेळी प्रचंड प्रमाणात दीक्षाभूमीवर माथा टेकवला. दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा समुह आला तसाच कोणताही आरडाओरडा न करता परतही गेला. एवढ्या मोठ्या संख्येत विविध मार्गाने येऊन कोणत्याच रेल्वेगाडीत अथवा रेल्वे स्थानकावर कसला राडा झाला नाही की कुणाचे काही चोरीला गेले नाही. विशेष म्हणजे, सलग ५०-५५ तासांचा या पावणेदोन लाख बौद्ध समाजाचा बंदोबस्त रेल्वेच्या अवघ्या दीडशे पोलिस, जवानांनी सांभाळला. असे असतानाही काही नतभ्रष्ट लोकांनी त्याला गालबोट लावण्यासाठी जाणिवपूर्वक न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मात्र माननिय न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
रक्ताचा एकही थेंब न सांडवता अभूतपूर्व सामाजिक- वैचारिक क्रांती घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अशोक विजयादशमी दिनी दरवर्षी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने बौद्ध समाज येत असतो. कुणी विमानाने, कुणी खासगी वाहनाने तर कुणी चक्क दुचाकींनी येथे येतात. मात्र सर्वाधिक प्रवास रेल्वे गाड्यांनीच होतो. विजयादशमीच्या एक दिवसांपूर्वीपासून ते दीक्षाभूमीवर दाखल होतात आणि विजयादशमीचा मुख्य कार्यक्रम संपला की, परतीची वाट धरतात. त्यातच यावर्षी सम्राट अशोकाची प्रतिमा कर्नाटकहून मिरवणुकीने दिक्षाभूमीवर स्थापित करण्यात आली तसेच कर्नाटक आणि केरळ मधील हजारो लोकांचा यावेळी दिक्षासमारंभ संपन्न झाला. त्यामुळे या वर्षी तुलनेने दुप्पट गर्दी होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहमदाबाद, पुरी, हावडा, गीतांजली, ज्ञानेश्वरी, महाराष्ट्र, विदर्भ, सेवाग्राम, दुरांतो, गरीब रथ या रेल्वेगाड्यांनी सर्वाधिक बौद्धसमाज नागपुरात आला होता. विशेष म्हणजे, मुंबई ते नागपूर दोन आणि पुणे ते नागपूर एक अशा तीन स्पेशल ट्रेन भरून नागपुरात आल्या. अर्थात २३ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवसांत सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी नागपूरच्या मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकांवर उतरले. तेवढ्याच संख्येत २५ ऑक्टोबरच्या पहाटेपासून त्यांनी आपापल्या गावांचा मार्ग धरला. मात्र, एवढ्या प्रचंड संख्येत येणे-जाणे करणाऱ्या या समाजाने प्रवासादरम्यान कुठेही कसलीही अनुचित घटना घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.
उल्लेखनीय असे की, गर्दी कशाचीही असो, बंदोबस्तासाठी पोलिसांचे प्रचंड मनुष्यबळ तैनात करावे लागते. २३, २४ आणि २५ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस प्रचंड गर्दी अनुभवणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपी (लोहमार्ग)चे ४ अधिकाऱ्यांसह केवळ ८० पोलिस तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) केवळ ६५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. या तीन दिवसांत एवढ्या प्रचंड प्रमाणात नागपूर स्थानकावर गर्दी होती. मात्र, कुठेच काही गडबड, गोंधळ झाला नाही. कुणाचे काही चोरीला गेले नाही किंवा काही हरवलेही नाही. आमच्याकडे एक सिंगलही तक्रार आली नाही, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांनी दिली.
0 टिप्पण्या