उद्धरली कोटी कुळे__भिमा तुझ्या जन्मामुळे".... असे सार्थ वर्णन कविरत्न वामनदादा कर्डक यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे केले आहे. खरे तर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि ज्ञानापासून शतकानुशतके वंचित ठेवलेल्या अस्पृश्य समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित व्यवस्थेशी प्रखर संघर्ष करून सर्वांगीण मुक्तिचा मार्ग दिला. १९१५ ते १९५६ असा सातत्याने केलेला त्यांचा संघर्ष हा भारतातील नव्हे तर जगातील मुक्तीलढ्याचा एक मानबिंदू आहे.
सामाजिक, आर्थिक, राजकिय अशा विविध पातळ्यांवर तत्कालीन अस्पृश्यांच्या उन्नयनासाठी प्रसंगी इंग्रजांशी, प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस बरोबर त्यांनी अव्याहत संघर्ष केला. हा संघर्ष करीत असताना भारतीय समाज हा जातीप्रधान आहे नव्हे तर जात जे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे, ही जाणीव त्यांच्या मुक्तिलढ्याची केंद्रबिंदू होती. जात या प्रखर वास्तवाचे भान असल्यामुळे जातीसंस्थेचे उच्चाटन हा त्यांच्या व्यासंगाचा, चिंतनाचा आणि सक्रीय कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला.
'Caste In India, Annihilation of Caste, Communal Dead lock and Way to Solve it (जातींची राजकीय समस्या आणि ती सोडविण्याचे उपाय)' इत्यादी वैचारिक साहित्यातून त्यांच्या जातवास्तव आकलनाचे दर्शन घडते. भारतीय जातीसंस्थेला मनुस्मृतीचीच भक्कम बैठक असल्यामुळे जातीसंस्थेचे बळी शूद्र - अतिशूद्र यांबरोबरच स्त्री सुध्दा झाली होती. परंपरेच्या जोखड्यात बंदिस्त झाल्यामुळे ह्या बंदिस्त समाजाचा उन्नतीचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता. अनेक सत्याग्रह, आंदोलने, परिषदे अशा सनदशीर मार्गाने ह्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. परंतु घटना परिषदेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष असताना सुध्दा दलित - वंचित घटकांसाठी मोठे मूलगामी काम ते करू शकले नाहीत, याची मोठी खंत बाबासाहेबांना होती. शिवाय हिंदू कोडबिलाच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या बड्या पुढाऱ्यांकडून सुध्दा मनासारखी साथ न मिळाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. आणि त्याची परिणिती त्यांनी १९५१ साली कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हे सर्व अनुभव घेतल्यानंतर भारतातील दलित समाजाच्या मुक्तीचा मार्ग एक पर्याय म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार हा त्यांना ऐतिहासिक आणि आवश्यक वाटू लागला. खरे तर १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला मुक्कामी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेपासून त्यांचा हा विचार अव्याहतपणें सुरूच होता. अखेर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. आणि ते आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध झाले. नागपुरात घडले हे धर्मांतर ते रूढार्थाने केवळ धर्मांतर नव्हते तर ती ऐतिहासिक धम्मक्रांती होती. शिवाय एका जीवनमूल्यांचा केलेला स्वीकार होता. परंतु धम्मक्रांती नंतर अवघ्या दिड - दोन महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले.
आज ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्त विचार करीत असताना मन उद्विग्न होते. "सारा भारत मी बौद्धमय करीन!" असं स्वप्न पाहणाऱ्या आमच्या मुक्तीदात्याच्या स्वप्नातला भारत आज विध्वंसाच्या वाटेवर उभा आहे. जातीयता, धर्मांधता, सांप्रदायिकता, विषमता अशा दुर्धर रोगांनी तो ग्रासला आहे. विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचं डॉ. आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न आज भंग पावलं आहे, असं म्हटल्यास ती अतिशोक्ती ठरू नये. धम्मक्रांतीच्या ६८ वर्षांनंतरही हे का घडते? याचा विचार तटस्थपणें आणि सद्विवेकबुद्धीने करण्याची वेळ आज आली आहे. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध आणि त्याचा धम्म कोणता? यावर पुन्हा एकदा चिंतन करून समग्र लढ्याची पुनर्व्याख्या व पुनर्मांडणी करण्याची ऐतिहासिक गरज येऊन ठेपली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्कालीन धर्मांतरावर इतर बौद्ध राष्ट्रांनी टिकेची झोड उठवली. कारण बाबासाहेबांचा बुद्ध हा डोळे मिटलेला नाही तर उघड्या डोळ्यांचा आहे. शिवाय हिनयान पंथातील थेरवादी बुद्ध हा आंबेडकरी चिंतनाच्या केंद्रस्थानी आहे. अनात्मक, निरीश्वरवाद, अनित्यवाद ही तत्वे बाबासाहेबांना अधिक जवळची वाटतात. शिवाय चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग, पंचस्कंध, द्वादशांग (बारा ऐतन) ही थेरवादी मूल्य मानवी जीवनात महत्त्वाची आहेत. शिवाय सर्वात महत्त्वाचे प्रतीत्यसमुत्पातन (कार्यकारणभाव) हे जीवनातील सत्य तत्व बाबासाहेबांना अधिक जवळचे वाटते. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी एक निश्चित कारण आहे. हा कार्यकारणभाव जाणणारी स्थिर बुद्धी ज्या व्यक्तीमध्ये कार्यरत आहे, तो बौद्ध. अशी एक सुटसुटीत व्याख्या करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विज्ञाननिष्ठ समाज यापेक्षा वेगळा काय असू शकतो? मानवी जीवनातील दुःख आणि माणसाचे होणारे शोषण यापाठीमागेही एक निश्र्चित कारण आहे. या शोषणातून मुक्तीचा मार्ग कार्यकारणभाव जाणणाऱ्या स्थिर बुद्धीच्या कार्यप्रवणतेमुळेच शक्य होईल, यात काय संशय?
आज भारतातील बौद्ध धम्म हा मोठ्या प्रमाणात कर्मकांडाच्या आणि पूजा - अर्चेच्या कचाट्यात सापडला आहे. तो हिनयानापेक्षा महायानाच्या अधिक जवळ गेला आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या मूळ उद्दीष्टांपासून आम्ही खूप लांब आहोत. बाबासाहेबांचा बौद्ध धम्म हा इतर पारंपारिक धर्मांसारखा धर्म नाही. तर तो एक जीवनमार्ग आहे. तो शांततामय सहजीवनाबरोबरच समतेचा आग्रह धरतो. म्हणूनच भारतातील संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बौद्ध धम्म त्यांना एक साधन म्हणून आवश्यक वाटतो.
आज जागतिक पातळीवर मानवी जीवन आणि शांतता धोक्यात आली आहे. आण्विक स्पर्धा जगाच्या नकाशावर जोरदारपणे चालू आहे. रशिया - युक्रेन युद्ध, इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष अशांसारख्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या पातळीवर पुरोगामी, डाव्या आणि आंबेडकरी चळवळीची झालेली दुर्दशा वेदनादायी आहे. आम्ही अपयशी तर ठरलो नाही ना ? ही अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आहे. हे आत्मभान येण्यासाठी आंबेडकरी बौद्ध धम्म एक पर्याय असू शकतो असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणूनच आंबेडकरी धर्मांतराचा अन्वयार्थ पुन्हा एकदा समजण्याची आणि उमगण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे.
यादृष्टीने आपली भूमिका काय असणार आहे?
सुरेश केदारे..... संपर्क: 8879997248.
0 टिप्पण्या