बाबुराव बागूल... दलित साहित्यामध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक, साहित्यिक म्हणून त्यांना एक नवी ओळख मिळालेली आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबर्या या गावकुसाबाहेर राहणार्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणार्या आहेत. स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. बागुलांच्या कथा वाचण्यासाठी हाती आल्यावर एकाच वेळी मनामध्ये आनंद आणि भीती या दोन्ही भावनांचा जन्म होतो. एक विलक्षण साहित्य आणि दर्जेदार निर्मिती वाचायला मिळणार या गोष्टीचा आनंद, तर प्रत्यक्ष कथेमध्ये काय वाचायला मिळणार या विचाराने मनामध्ये भीती दाटून येते. कारण बागूल यांच्या कथा या कल्पना विलासेतून आलेल्या नसतात. वास्तवाशी या कथांचा थेट संबंध वाचकाला आढळून येतो. वास्तवाला स्वीकारायची तयारी दाखवून जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला तर आजही आपल्या समाजात गावकूसाबाहेर घुमत असलेला चीत्कार आपल्या कानी येईल. आणि याच चीत्कारातून प्रसूत झालेली वेदना बाबुराव बागूल यांच्या “जेव्हा मी जात चोरली होती..” या कथा संग्रहाच्या प्रत्येक शब्दात आपल्याला दिसून येते.
बाबुराव बागूल यांना आपल्या कथेतून, लिखाणातून जे सांगावयाचे असते ते अत्यंत भीषण, तिरस्करणीय, भयावह असे असायचे. त्यातील वेदना इतकी टोकाची असायची की ती कोर्या पानावर उतरविण्यासाठी शब्दांच्या शोधात बागुलांना कमालीच्या यातना सहन कराव्या लागल्या असतील यात कुठलीही शंका नाही. 'जीवनाची सडलेली बाजू रंगविणारा लेखक हा स्वतः देखील सडकाच असतो' अशी समजूत मोठ्या प्रमाणात आपल्या समाज मनाच्या विचारांत भिनलेली आहे. आणि समजाचा हाच विचार बदनामीची भीती बनून लेखकांना छळत असतो. समाज मनातील हा विचार किती निरर्थक आहे याची प्रचिती बाबुराव बागूल यांचा “जेव्हा मी जात चोरली होती..” हा कथा संग्रह वाचल्यानंतर वाचकाला येईल. या कथा संग्रहामध्ये वाचकांच्या अभिरुचिला धक्का लागू न देता समाज जीवनाची अधोगतीत बाजू रंगवविण्यात बागूल यशस्वी झालेले आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या ( यूपीएससी ) मराठी साहित्य या वैकल्पिक विषयासाठी "जेव्हा मी जात चोरली होती.." हा कथा संग्रह अभ्यासाच्या दृष्टीने आयोगाकडून निवडण्यात आलेला आहे. यातच या कथा संग्रहाची महनता आहे.
१९६३ साली प्रकाशित झालेल्या “जेव्हा मी जात चोरली होती..” या कथा संग्रहाने २०१९ साली त्याच्या सतराव्या आवृत्तीमध्ये पदार्पण कलेले आहे. हा कथा संग्रह मनोरंजनासाठी नसून यात समाज प्रबोधनाचे आव्हान बागुलांनी पेलले आहे. या कथा संग्रहातील प्रत्येक माणूस हा जीवनाच्या एका वेगळ्या टोकावर पोहचलेला आहे. तो हिंसक आहे, त्याच्या मस्तकात सूडाची भावना तांडव घालून त्याला हत्या करण्यासाठी चिथावणी देत आहे. तो क्रूर आहे. रानटी आहे. समाजात प्रस्थापित असलेल्या समाज व्यवस्थेवर तो आसूड ओढण्यास आतुर झालेला आहे. तर तो कधी अगदी केविलवाण्या रूपात ‘या समाजामध्ये केवळ माणूस म्हणून जगण्यास मान्यता मिळावी..’ या आशेने समाजापुढे आपले हात पसरवून याचना करणारा एक दुबळा याचक आहे. या समाजात त्याची एक इज्जतदार व्यक्ति म्हणून गणना केली जात नाही. या जाणिवेने कधी तो हळहळतो, रडतो, किंचाळतो परंतु त्याचा टाहो, त्याच्या मनातील क्रंदन कधीच या समजातील तथाकथित उच्चकुलीन वर्गीयांच्या कानावर आदळत नाही. त्यांच्या हृदयाला कधीच हा चीत्कार पाझर फोडत नाही. कारण बागूल म्हणतात.,
“या लोकांची मने मनूने केव्हाच मारून टाकली आहे.”
“काळोखाचे कैदी..” ही या कथा संग्रहातील पहिली कथा.
बानु या मुरळीला रामराव देशमुख या गावच्या देशमुखाने आपल्या वाड्यावर ठेऊन घेतली. बानुला रामरावापासून दौलत नावाचा एक मुलगा देखील प्राप्त झाला. रामराव हयात असतांना बानु ही त्याच्या पत्नीसारखी त्याच्याशी अगदी एकनिष्ट होऊन राहिली. ती कधी वाड्याच्या बाहेर पडली नाही. रामरावाची दासी बनून राहिली. अत्याचार सहन करत राहिली. येथून पळून जाऊ तर हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही आणि एकाच्या तावडीतून सुटून दहा जणांच्या वासनेला बळी पडावं लागेल. वेश्याचे जीवन जगावे लागेल. या भीतीने ती रामरावापाशीच राहिली. रामरावाच्या अंतविधिंनंतर त्याच्या विधिवत पत्नीचा मुलगा देवराम याने बानुची हत्या करण्याची शपथ घेतली. तिचा खून करण्यासाठी तो हैवान बनून धावत सुटला. तिच्या झिंज्या धरून तिला गावासमोर बेअब्रू करण्याचा त्याने ध्यास घेतला. वार्यावर उडत असलेली बानुची अब्रू सबंध गाव उभा राहून पाहत होता. तिच्या उघड्या पडत असलेलया देहाकडे पाहून तरुणाई लाळ घोटत उभी होती. विरोध करण्यात बानु रक्तबंबाळ झाली होती. दौलती देखील तिच्या समोर मरून पडला होता. बानु मनाने केव्हाच मेली होती. आणि रात्र देखील मरण शोधण्यासाठी पूर्व दिशेला पळत होती.
"गुंड.." ही कथा मानवी मनाच्या भावविश्वाचे स्वरूप वाचकासमोर उघडे करते. समाजाने वारंवार हिणवलेला व्यक्ती समाजाच्या विरोधात उभा राहतो. या कथेतील गुंड हा अत्यंत कुरूप, क्रूर असा आहे. परिस्थितीने त्याला सतत ठोकरत मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये आणून ठेवले आहे. त्याच्याशी आजवर कोणतीही स्त्री कधी मायेने, प्रेमाने बोलली नाही. स्त्री स्पर्श त्याला माहीत नाही. एव्हाना त्याच्या आईच्या मायेचा देखील त्याला कधी स्पर्श झालेला नाही. त्याच्याकडे कुठलीही स्त्री कदापिही आकर्षित झाली नाही. तो वेश्यांच्या चाळीमध्ये गेला असता तिथे देखील एका वेश्या स्त्रीने त्याच्या कुरूप रुपाची थट्टा करत त्याचा अपमान करून त्याला तिथून घालवून दिले. आता हा समाज त्याचा वैरी बनला आहे. तो कोणाशीही सौख्याने बोलत नाही. वागत नाही. तो गुंड आहे. परंतु तो अजूनही प्रेमाच्या शोधात आहे.
"बोव्हाडा.." या कथेत गाव पातळीवर चालत असलेल्या जातीभेदाचे चित्रण बागूल यांनी रेखाटलेले आहे. बोव्हाडा ही गावची एक परंपरा आहे. काही प्रमाणात जत्रेसारखी. ज्यात पुराण कथेतील देवांचे, शुर योद्ध्यांचे सोंग घेऊन ते सोंग गावापुढे नाचवले जाते. गावच्या पंचायतीसमोर उभा राहून दामू महार या वर्षीचे सोंग आपल्याला पाहिजे अशी घोषणा करतो. दामूला नरसिंहाचे सोंग पाहिजे असते. दामू हा महार असल्यामुळे त्याला देवाचे सोंग घेता येणार नाही अशी एकच कलकल पंचायती मध्ये उठते. महार देखील आम्ही सोंग नाचवूच या विचारावर अडून राहतात. 'आता ह्ये ध्येड लोक देवाचे सोंग नाचवतील आणि आपली परंपरा अपवित्र करतील' या भावनेने गावातील उच्च कुलीन मंडळी दामूला विरोध करून "महाराला सोंग मिळणार नाही.." असं बजावून सांगतात. दामू मात्र "सोंग मीच नाचवणार त्यासाठी काही करायला मी तयार आहे" असं ठणकावून सांगतो.
देवाचं रूप घ्यायला देखील एका विशेष जातीमध्ये जन्माला यावं लागतं काय.? खरच दामू महाराने नरसिंहाचं सोंग घेतलं तर गावची परंपरा अपवित्र होईल काय.? मुळीच नाही.. तर असा विचार करणाऱ्यांचे मेंदू अपवित्र झालेले आहे. बोव्हाडा ही कथा वर्णव्यवस्थेवर झंझावत प्रहार करते.
"वाटेवरची.." या कथेतील गिरीजा ही एक वेश्या आहे. पुरुषांना भुलवण्यासाठी वेश्या आपल्या देहाची कामुक हालचाल करते. चेहऱ्यावर आकर्षक भाव आणते. तिच्या देहाची ही हालचाल, तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिचे मन परस्परांना विरोध करून बंड पुकारत असतात. ती मनातून कुढत असते, रडत असते, किंचाळत असते, विव्हळत असते. तिच्या स्त्री मनावर तिच्या नैतिक विचारांचे अनेक प्रहार सुरू असतात. तिचे मन जखमी होऊन मरणाची वाट पाहत असते. परंतु ती मरत नाही. चेहऱ्यावर हास्याचा नकली मुखवटा लावून हसत असते. या समाजात तिला लुटण्यासाठी, तिची अब्रू फाडून खाण्यासाठी अनेक लांडगे तिच्या सभोवताली वावरत असतात. आणि हेच लांडगे पुन्हा समाजात जाऊन उच्चभ्रू माणसांचे जीवन जगत असतात. वेश्या जगत असते तिच्या नसलेल्या अस्तित्वाला जपण्यासाठी, जगवण्यासाठी आणि मरते शेवटी अस्तित्वहीन.!
"दसऱ्याचा रेडा.." या कथेत बाबुराव बागुल प्रखरपणे दाखवून देतात की "भारतीय समाजामध्ये माणसाच्या अंगी असलेल्या गुणांना तितकेसे महत्व दिले जात नाही जितके महत्त्व त्याच्या जातीला धर्माला दिले जाते."
गावांमध्ये जोखमीचे काम नेहमीच खालच्या जातीची माणसे करतात. मेहनतीची, कष्टाची कामे त्यांच्याच पदरी पडलेली असतात. दसऱ्याचा रेडा या कथेत आपल्या जीवावर उदार होऊन देवा, शिवा आणि इतर काही महार तरुण मानाच्या रेड्याला काबूत आणतात. या प्रसंगी त्यांचा जीव टांगणीला लावतात. आणि शेवटी या जत्रेत मुख्य पूजेचा मान पाटलाचा असतो. हीच आपल्या ग्रंथाने, पुराणाने, आणि मनूने सांगितलेली परंपरा आहे.
कथा संग्रहातील या सुरवातीच्या पाच कथा. त्यानंतर वानर, पेसुक, स्पर्धा या तीन कथा. विद्रोह आणि जेव्हा मी जात चोरली होती या शेवटच्या दोन कथा. असा हा एकुन दहा कथांचा कथा संग्रह वाचकाच्या विचारात एक अमुलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद ठेवतो.
कथा संग्रहातील "जेव्हा मी जात चोरली होती.." या शेवटच्या कथेतील मास्तर मुंबईहून नोकरीसाठी गुजरात मधील उधना या ठिकाणी गेले असता त्यांना तेथील लोकांच्या विचारात रुतून बसलेल्या प्रचंड जाती भेदाची प्रचिती आली. ज्या कारखान्यात त्यांना नोकरी मिळाली होती त्याच कारखान्यातील कामगार काशिनाथ हा देखील मुंबईचा रहिवासी असून तो देखील मास्तराच्या जातीचा म्हणजेच महार जातीचा होता. काशिनाथच्या जातीमुळे तो शिकलेला असून देखील त्याला हलक्या दर्जाची, साफ सफाईची कामे दिली जात असतं. त्यामुळे तापट काशिनाथ बंड करून उठतो. तो आपल्या खिशात चाकू बाळगू लागतो. काशिनाथची ही परिस्थिती पाहून मास्तर आपल्या जातीचं सर्टिफिकेट कारखान्यात जमा करत नाही. आणि आपण देखील महार जातीचे आहोत ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवतात. या असत्यामागे केवळ घरची हलाखीची, गरिबीची स्थिती आणि नोकरीची गरज हीच कारणे असतात. मास्तर हे प्रतिभावंत कवी असल्याने त्याच कारखान्यातील ब्राह्मण जातीचा रामचरण तिवारी हा मास्तराला आपला गुरु ( उस्ताद ) मानतो. मास्तराकडून आपल्याला कवितेचं ज्ञान मिळावं ही त्याची इच्छा असते. तेथील बरेच लोक मास्तराला क्षत्रिय किंवा ब्राह्मण जातीचा समजतात. मास्तर देखील आपल्या जातीचा उल्लेख करत नाही.
एक दिवस सत्य समोर येते. मास्तराने जात चोरली असा आरोप लावून मास्तरला बेदम मारहाण केली जाते. त्यांचा शिष्य रामचरण अगदी क्रूर होऊन मास्तराच्या अंगावर वाटेल तिथे प्रहार करत आपल्या गुरूला शिव्या हासडतो. काशिनाथ तिथे येऊन सर्वांना पळवून लावतो. आणि मास्तरला विचारतो, "तुम्ही गप गुमान पडून या मूर्ख लोकांचा मार का सहन करत होता.?" मास्तर काशिनाथला म्हणतात., "त्यांचा मार मी कुठे खाल्ला.? मनूने मला मारलं.. चल काशिनाथ.."
अक्षय शिंदे. ( विजयसुत ) 9860799816
0 टिप्पण्या