"देशी-विदेशी भांडवलदारांच्या नव्हे; तर, केवळ आणि केवळ कामगार-कर्मचारीवर्ग, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, शेतकरी-शेतमजूर यांच्या अल्पस्वल्प निधीवरच चालणाऱ्या शंभर टक्के प्रामाणिक, पारदर्शक व कमालीची जाज्वल्य... अशा 'धर्मराज्य पक्ष'प्रणित, 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चा", वॉलमेट (नेलेस) या बहुराष्ट्रीय कंपनीत ऐतिहासिक करार व कंपनीतील सर्व कंत्राटी-कामगारांना करार-कालावधित कराराअंतर्गत भरघोस पगारवाढीसह नोकरीत 'कायम' होण्याची देवदुर्लभ संधि लाभली आहे. डोंबिवली-अंबरनाथस्थित वॉलमेट (पूर्वीची नेलेस) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामगारांना त्रैवार्षिक करारानव्ये १५ हजार रुपयांची थेट पगारवाढही मिळाली आहे. (C.T.C. या फसव्या संकल्पनाधारित बनावट पगारवाढ नव्हे)
भारतीय उद्योगक्षेत्रात निर्माण झालेले असुरक्षिततेचे वातावरण, विषवल्लीप्रमाणे फोफावलेली कंत्राटीपद्धतीतील 'गुलामगिरी व नव-अस्पृश्यता'आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपाई केंद्र सरकारने लादलेली ४ काळ्या कामगार-कायद्यांची 'काळी कामगार-संहिता' (Black Labour-Code), अशा पराकोटीच्या दडपशाहीच्या रेट्यात, देशातील कामगार-चळवळ जवळपास 'मृतप्राय' झालेली असतानाच, 'धर्मराज्य पक्ष'प्रणित, 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगारनेते, राजन राजे यांनी मात्र, आपली चार दशकांच्या दैदिप्यमान पगारवाढीच्या करारांची आपली 'धर्मराज्य-परंपरा' कायम ठेवली असून, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसी व अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेल्या, 'नेलेस-वालमेट इंडिया प्रा. लि.' या आस्थापनेतील कामगारांसाठी १५ हजार रुपयांची थेट पगारवाढ त्रैवार्षिक-करारान्वये करण्यात आलेली आहे.
शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२३ रोजी, अंबरनाथ एमआयडीसीमधील आस्थापनेत हा ऐतिहासिक त्रैवार्षिक-करारवाढीचा करार मोठ्या जल्लोषात आणि हर्षोल्हासाच्या वातावरणात संपन्न झाला. या त्रैवार्षिक करारामुळे, प्रामुख्याने भूमिपुत्र असलेल्या कामगारांच्या आयुष्यात धर्मराज्य-संघटनेचा कोंबडा खणखणीत स्वरात आरवल्यामुळे, आर्थिक समृद्धीची पहाट झालेली आहे. त्यामुळेच, "केवळ एका पिढीचंच नव्हे; तर, कामगारांच्या तमाम पुढील पिढ्यापिढ्यांचंही कल्याण साधणारा नेता", या राजन राजे यांच्या क्रांतिकारी लौकिकावर पुरश्च नव्याने शिक्कामोर्तब झालेलं आहे!
'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'चे सभासद झाल्यानंतरचा, वाॅलमेट (नेलेस) कंपनी-कामगारांचा हा पहिलावहिला करार आहे. या ऐतिहासिक करारामुळे, आजवर वेतनमान-बोनस (पूर्वीचे कमीतकमी वेतन रु.१८ हजार, जास्तीतजास्त रु.४४ हजार व सरासरी रु.२२ हजार) व विविध सेवाशर्तींबाबत पिछाडीवर पडलेल्या वाॅलमेट (नेलेस) कामगारांचे या करारामुळे वेतनमान कमीतकमी रु.३३ हजार ते जास्तीतजास्त रु.६० हजार इतके झाले असून, सरासरी वेतनमान ३७ हजार इतके झाले आहे. पगारवाढीतील ६०% रक्कम PF-Bsae मध्ये (मूळ पगार + महागाई भत्त्यात) तर, ४०% रक्कम इतर भत्त्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. कराराच्या पहिल्या वर्षीच एकूण रु.१५ हजारांपैकी ४०% रक्कम व उर्वरित दोन वर्षांमध्ये प्रत्येकी ३०% रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर, दिवाळी बोनस म्हणून ३२ हजार रुपयांची रक्कम कामगारांना मिळणार आहे. यामुळे दिवाळीच्या एक महिना आधीच, कामगारांचा दिवाळीसण साजरा झाला आहे.
करारान्वये दिवाळी भेटवस्तू रकमेत; मरणोत्तर नुकसानभरपाई तसेच विम्याच्या रकमेसारख्या सेवासुविधांमध्ये घसघशीत वाढ मिळाली आहे. तसेच एकूण वार्षिक रजांमध्ये तब्बल ९ दिवसांची वाढ आणि सर्वात, महत्त्वाची बाब म्हणजे, संपूर्ण देशभरातील कामगारांना देशोधडीला लावणारे कंत्राटी-कामगार पद्धतीचं विषारी-विखारी पिल्लावळ देशभर पसरलेली असतानाच, नेलेस-वालमेट कंपनीतील, *एकूण २५ कंत्राटी कामगारांना, कराराच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कायम केले जाणार असून, या कंत्राटी कामगारांनादेखील करारांतर्गत तब्बल ८ हजार रुपयांची भरघोस पगारवाढ देण्यात आलेली आहे.
"एका कायम कामगाराच्या जागी, तीन कंत्राटी-कामगार नेमण्याचे" कामगारघातकी 'ट्रिपल-इंजिन' सरकारचे धोरण असताना व संपूर्ण भारतात कामगारविरोधी धोरणांचे चक्रीवादळ गरगरत असतानाच, प्रवाहाच्या विरोधात पोहून जाण्याची किमया... पोलादी कामगार-एकजुटीच्या बळावर, राजन राजे आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील 'धर्मराज्य पक्ष' व त्याअंतर्गत असलेल्या 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'ने नावाच्या कामगार संघटनेने, करुन दाखवलेली आहे. काळी कामगार संहिता लादून, कायम-कुशल कामगारांना अक्षरशः 'गुलाम' बनविण्याचे विश्वासघातकी-घृणास्पद उद्योग सुरु असताना, राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न झालेला हा ऐतिहासिक करार म्हणजे, सध्याच्या घडीला औद्योगिकविश्वातील एक चमत्कारच गणला जाईल! डोंबिवली-एमआयडीसी येथील कंपनीत, व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, राजन राजे यांनी संपूर्ण कंपनीची पाहणी करुन, कामाचे स्वरुप जाणून घेतले. त्यानंतर, अंबरनाथ एमआयडीसी येथील कंपनीत जाऊन, त्या कंपनीचीही पाहणी केली. यावेळी दोन्ही आस्थापनांतील व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अंबरनाथ येथे कामगारांच्या ऐतिहासिक पगारवाढीचा करार संपन्न झाल्यानंतर, राजन राजे यांनी, दोन्ही कंपन्यांतील कामगार-सदस्यांना संबोधित केले.
"आजच्या मंगलप्रसंगी सर्वप्रथम, आपल्या वाॅलमेट कंपनीच्या युनियन-कमिटीचं हार्दिक अभिनंदन व मनःपूत कौतुक... ते यासाठी, कारण त्यांनी धर्मराज्य-संघटनेची निवड करुन तुमच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा केला. महाराष्ट्रातील पुणे, चिंचवड, नाशिक, नागपूर पासून ते इथल्या नवी मुंबई, रायगडमधील असंख्य कंपन्यांमधील कामगारांना 'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा'ची युनियन आणण्याची मनोमन तीव्र इच्छा आहे... पण, या कंपन्यांमधील 'युनियन-कमिटी' नावाचे आधुनिक 'शुक्राचार्य' आपल्या निहीत स्वार्थासाठी 'धर्मराज्य'ची युनियन कंपनीत येऊ देण्याच्या मार्गात खोडा घालतात व कंपनीची समृद्धी वरुन खाली झिरपत कामगार-कर्मचारीवर्गापर्यंत पोहोचूच देत नाहीत. परिणामी, आजच्या घटकेला महाराष्ट्रभरातील लाखो कामगार चांगलचुंगलं वेतनमान-बोनस व सेवासुविधा-सुरक्षितता यापासून वंचित आहेत; तसेच, या आधुनिक-शुक्राचार्यांमुळेच कंपन्या-कंपन्यांमधून कंत्राटी-कामगार पद्धतीची 'गुलामगिरी व नव-अस्पृश्यता' भयंकर फोफावलेली आहे. पण, वाॅलमेटच्या जाणकार युनियन-कमिटीने उपजत शहाणपणाच्या बळावर योग्य निर्णय घेतला व तिथेच, तुमचं व कंपनीचं उज्ज्वल भविष्य सुनिश्चित झालं! गेल्या दिडेक वर्षांच्या, स्थानिक युनियन-कमिटीसह धर्मराज्य-संघटनेच्या महेशसिंग ठाकूर (महासचिव) आणि रमाकांत नेवरेकर (उपाध्यक्ष) यांच्या अथक मेहनतीलाही दाद द्यायलाच हवी. मात्र, अशा मंगलमय प्रसंगी आजुबाजुच्या बदलत्या परिस्थितीचं, आपण व्यवस्थित भान बाळगणं अत्यावश्यक आहे...मित्रहो, तुमच्यासारख्या तरुण कामगारांनी, फाजील उत्सवप्रियता सोडून दिल्याशिवाय आणि बहुजनहिताची 'कामगारहितदक्ष डावी (साम्यवादी किंवा कम्युनिस्ट) राजकीय-जागृती तुम्ही तुमच्यात निर्माण केल्याशिवाय, तुमची आर्थिक प्रगती व नोकरीत सुरक्षितता निर्माण होऊ शकणार नाही व एकदा निर्माण झालेली टिकू शकणार नाही. आज महाराष्ट्रात कंत्राटी-कामगार पद्धतीच्या अवदसेनं धुमाकूळ घालून अवघं कामगारविश्व उध्वस्त केलेलं असताना... बेरोजगारी, अर्धरोजगारीचं थैमान सुरु असताना व 'कंपनी-दहशतवादा'मुळे (Corporate-Terrorism) कामगारांचं जगणं टोकाचं 'असुरक्षित' झालेलं असताना, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, सत्यनारायणाच्या महापूजा, दहीहंड्या यांचा नुसता महापूर आलाय आणि त्यातच अवघी मराठी तरुणाई अडकून पडल्याचं अत्यंत दुर्दैवी चित्र आहे.
जगभरातील बहुसंख्यांक कामगार, रक्तपिपासू-निर्मम-शोषक (Vampire-State System) भांडवलशाहीला विरोधी करणाऱ्या साम्यवादी-समाजवादी डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्ष व नेत्यांकडे, त्यांच्या त्यांच्या देशातल्या राजकारणाची सूत्रे सोपवत असताना, आम्ही असे उदासीन का? जगभरात कामगार-चळवळ त्या त्या देशांमधील राजकारणाची दिशा ठरवत असताना... आपल्याकडील बहुसंख्यांक असलेल्या कामगार-कर्मचारीवर्गाला गल्लीतलं काळं कुत्र देखील का विचारीत नाही, याचा गांभीर्याने विचार आत्ताच करायला हवा, नंतर ती वेळ आपल्या हातात शिल्लक रहाणार नाही. आजच्या घडीला देशातील कामगार-शेतकरीवर्ग, हाच प्रामुख्याने देशातील संपत्तीचा 'निर्माता' असतानादेखील...त्याला, देशातील साधनसंपत्ती व समृद्धीचा रास्त वाटा मिळू नये व त्याचीच भीषण परवड केली जावी, ही फारच अस्वस्थ करुन सोडणारी बाब आहे", असं प्रतिपादन करुन राजन राजे पुढे म्हणाले की, "ठाणे-रायगड-नवी मुंबई पुरतं बोलायचं झालं तर, या भागातल्या भूमिपूत्र आगरी-कोळी-कराडी; तसेच, मराठा-दलित-मुस्लिम समाजातील कामगार-कर्मचारीवर्गाला न्याय देणारं व सुखासमाधान व सुरक्षितता निर्माण करणारं, एकमात्र संघटन, हे 'धर्मराज्य पक्ष'प्रणित 'धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ' तर, कामगारविश्वात एकमात्र क्रांतिकारक नेता 'राजन राजे' आहे!"
जेव्हा, बाहेरच्या औद्योगिक जगतात "१२ तासाच्या कामाला १२ हजार पगार", असं टोकाचं शोषण होत असताना... या 'धर्मराज्य-करारा'मुळे, आता तुमचा पगार ५० ते ६० हजारांच्या घरात जाईल व पुढे तुम्ही सारेच, नजिकच्या भविष्यात 'धर्मराज्य'च्या झेंड्याखाली वेतनमान व बोनसच्या संदर्भात 'सहा आकड्या'त खेळाल... पण, त्यामुळे अजिबात ऊतूमातू जाऊ नका. पुढचा काळ श्रमिकवर्गासाठी, तळागाळातल्या दीनदुबळ्यांसाठी अतिशय भीषण असणार आहे. तेव्हा, पैशांची बचत करुन, शेतजमीन खरेदीसारखी भविष्यवेधी योग्य गुंतवणूक करा, काटकसरीचं आर्थिक धोरण अवलंबवा. तसेच, सुदैवाने सध्याचं आपलं व्यवस्थापन अतिशय सकारात्मक व कामगारहितदक्ष असल्याने, त्यांना मनापासून सर्वच बाबतीत संपूर्ण सहकार्य करा व कंपनीच्या म्हणजेच, पर्यायाने तुमच्या भरभराटीला हातभार लावा.
कामगार म्हणून आता तुमचीही जबाबदारी वाढलीय. कामाच्या बाबतीत व शिस्तीच्या बाबतीत, धर्मराज्य संघटना व व्यक्तिशः नेता म्हणून मी... कोणतीही हयगय कुठल्याही स्थितीत कधिच सहन करत नाही... कोणतीही रास्त अडचण आली व ती कमिटी वा अन्य संघटना-नेत्यांकडून दूर होत नसेल...तर, अगदीच तशी गरज भासल्यास वेळप्रसंग पाहून थेट माझ्याशी संपर्क साधा. 'आळशी-उद्धट कामगार राष्ट्राला भार... मेहनती-नीतिमान कामगार राष्ट्राला आधार', हे आपले ब्रीदवाक्य कायमचं हृदयात कोरुन ठेवा. आज देशभरात कामगारविरोधी धोरण राबविले जातंय, चार काळ्या कामगार-कायद्यांची संहिता (Black Labour-Code) आपल्या भरल्या संसारावर वरवंटा फिरवण्यास सज्ज झालीय... तेव्हा, सतत सावधचित्त राहून अशीच पोलादी एकजूट टिकवून ठेवा! महागाईसोबतच, जातीय आणि धार्मिक विद्वेषाचं वारे, आगामी निवडणुकांच्या निमित्ताने वाहण्यास सुरुवात झालीय, त्यात वाहवत जाऊ नका; कारण, यात सर्वप्रथम शेतकरी-कामगारवर्गच भरडला जातो. 'समाजाकडून एकवेळ शेतकऱ्याला सहानुभूती मिळेल; मात्र, कामगाराला ती देखील मिळत नाही', हे लक्षात ठेवा!" अशा निर्णायक व निर्धारी शब्दांत राजन राजे यांनी, उपस्थित कामगारांमध्ये वैचारिक स्फुल्लिंग चेतवले व कामगार-चेतना जागृत केली.
0 टिप्पण्या