अहमदाबाद : संपूर्ण गुजरात राज्यातील बुद्ध विहारे व डॉ. आंबेडकर राष्ट्रीय फाउंडेशन राणीज, अहमदाबाद येथे अतिशय मंगलमय व उत्साही वातावरणात ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त गुजरात बुद्धिस्ट अकॅडमी तर्फे १४वा धम्मदीक्षा सोहळा भदंत प्रज्ञांशील महाथेरो, अमरावती यांच्या हस्ते करण्यात आला. गुजरात राज्यातील मेहसाणा, गांधीनगर, अहमदाबाद, सुरेंद्रनगर व वडोदरा येथील सुमारे चारशे हिंदू कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. धम्मदीक्षा सोहळ्यापूर्वी आवश्यक शासकीय परवानगी शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते. समता, बंधुत्व प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री भावना जपणारा. बुद्ध धम्माचा स्वीकारल्यानंतर उपासकांनी यावेळी आपला आनंद व्यक्त केला.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय फाउंडेशन, राणीज, अहमदाबाद येथे भारतीय बौद्ध महासभा, गुजरात तर्फे डॉ. बोधिराज विश्वास यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी अँड. डॉ. सुनील पगारे उपस्थित होते. डॉ. पगारे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्याचे निमित्त साधून या निमित्ताने त्यांना विशेष गौरविण्यात आले. उपस्थित बौद्ध उपासकांना भन्ते पथीक श्रेष्ठी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. याशिवाय मिशन जय भीम गुजरात प्रदेश में अध्यक्ष भानु भाई चौहान, निवृत्त डी वाय एस पी. जे जे मेवाडा, डॉ. भाविन पटेल, भारतीय बौद्ध महासभा गुजरात राज्याचे प्रभारी टी आर भास्कर आदी मान्यवरांनी उपस्थित बौद्ध उपासकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपलवेन परमार यांनी तर आभार प्रदर्शन आयु. विजय सोमकुंवर यांनी केले. धम्म पालन गाथा गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0 टिप्पण्या