Top Post Ad

भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन.... अर्थात विजयादशमी


  विजयादशमी दिवस हा दोन महान व्यक्तींच्या जीवनाशी संबंधीत असलेल्या घटनेचे स्मरण करून देतो ज्यामुळे आपले मन आनंदाने फुलून जाते. मैत्रीच्या धाग्यांनी सर्व प्राण्यांशी आपण बांधल्या गेलो आहोत याचे वास्तव माहिती होते. शांती, करुणा, मातृत्व व सत्व-सेवा भावाचा शुभसंदेश घेऊन आलेला, अशोक विजयादशमीचा दिवस. दुःख मुक्तीचा मार्ग शोधत असलेल्या,  विषमता व चातुर्वण्याच्या चौकटीत बंदीस्त केलेल्या मानवास  समतेच्या व बुद्धी विकासाला मोकळीक देणारा मंगल दिन! मंगलमय भारतीय संस्कृतीचे  पुनरुज्जीवन झाले तो हा उत्सवदिन दोन महान व्यक्तींनी केलेली धम्मक्रांतीचे स्मरण करून देतो.  त्यापैकी एक म्हणजे सम्राट अशोक आणि दुसरे अर्थातच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

विश्वाच्या पाठीवर अनेक सम्राट होऊन गेलेत परंतु त्या सर्वात सम्राट अशोकाचे स्थान अद्वितीय आहे. अनेक सम्राट जीवनाच्या अन्तापर्यंत साम्राज्य स्थापन करण्यासाठी लढत राहिले. एक राज्य हस्तगत केल्यानंतर दुसऱ्या राज्यावर त्यांची दृष्टी जाई, परंतु सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये तशा प्रकारचे घडले नाही. त्यांनी जेव्हा कलिंगावर विजय मिळविला व त्या युद्धामधील हत्यांचा भयानक देखावा पाहिला. तेव्हा त्याचं मन दुःखाने भरुन आले. कलिंग देशावर विजय मिळविल्यानंतर युद्धामध्ये झालेली हिंसा, रक्तपात, सैनिकांच्या नातलगांचा होत असलेला आक्रोश, ज्यांच्या शरीराचे काही भाग शस्राच्या सहाय्याने लयास गेले तसेच शरीरावर झालेल्या शस्त्राच्या आघातामुळे त्यांना होत असलेल्या असह्य वेदना व्यक्त करणाऱ्या दुःखमय किंकाळ्या ऐकून कलिंग विजयी सम्राट अशोकाचे हृदय कंपायमान झाले.  वास्तविक पहाता कलिंग विजयाने त्याला समाधान प्राप्त व्हावयास पाहिजे होते. शत्रुला पराजित करुन विजयश्रीने माळ घातल्याचे सूत्र लाभावयास हवे होते. मात्र तसे न घडता वेगळेच घडले.  

कलिंग विजयी होण्याकरिता केल्या गेलेले राक्षसी कृत्याबद्दल सम्राट पश्चाताप करु लागला. अशाच वातावरणात त्यांच्या कानावर  भिक्खूसंघाच्या मुखातून तथागतांचा शांतीसंदेश पडला. तथागतांद्वारा दिलेला चित्त शांतीचा गंभीर स्वर ऐकला. त्याने त्याच्या मनाला सांत्वन मिळाले. ह्या हिंसात्मक विजयाच्या गंभीर विचार करतानाच ‘हा माझा खरा विजय नाही. आतापावेतो मी शस्त्राच्या सहाय्याने हिंसात्मक कृत्य करुन विजय मिळविला. पण खरे मानसिक सुख मिळवू शकलो नाही. पण या शांतीसदेंशात मनशांतीचे सुख काही औरच दिसते, आजपासून मी या विश्वशांती देणाऱ्या मार्गाने अहिंसात्मक विजय मिळवीन.’ अशी घोषणा केली. तोच हाच विजयादशमीचा दिवस ज्या दिवसापासून सम्राट अशोक भदन्त मोग्गलीपूत्त द्वारा बौद्धधम्माचा उपासक झाला. 

आजपासून मी शस्त्राद्वारा हिंसात्मक विजय प्राप्त न करता, तथागतांच्या धम्ममार्गाद्वारा अहिसात्मक विजय प्राप्त करीन.आणि माझे संपूर्ण आयुष्य  पृथ्वीवर धम्मराज्य स्थापन करण्याकरिता घालवेन. ही त्याने केलेली अद्वितीय घोषणा होय. अशा प्रकारची घोषणा कोणत्याही सम्राटाने केलेली इतिहासामध्ये लिखीत नाही. जोपर्यंत या संसारात मानवप्राणी नव्हे तर पशू-पक्षी वास करतील. त्या प्राण्यांमध्ये नैतिकतेची चेतना राहिल. तोपर्यंत सम्राट अशोकांनी केलेली घोषणा व त्यांचे नैतिक साम्राज्य मानवाच्या मनरुपी पटलावर कायमची अंकित राहील. ज्या दिवसाने सम्राट अशोकांच्या मनात हा शुभ-संकल्प निर्माण केला आणि मानवहिताची शुभ-घोषणा करावयास लावली तो विजयादशमीचा दिवस अशाच प्रकारे भूतलावर तथागतांचा करुणा, मैत्री आणि विश्व-शांतीचा शुभसंदेश देत राहिल. 

सम्राट अशोकाच्या मनामध्ये जे परिवर्तन झाले होते ते केवळ मानव प्राण्यांच्याच हिताकरिता झाले नसुन सर्व पशु-पक्षी यांच्या कल्याणार्थ झाले होते. कारण त्यांनी तथागतांच्या मैत्रीच्या भावनेने ओतप्रोत असलेला मार्ग स्विकारला. त्या मार्गाचा प्रचार करुन सर्व मानव प्राण्याला हिंसेपासून अलिप्त राहण्याचे शील शिकविले. धर्माच्या नावावर कोणत्याही प्रकारे प्राण्यांचा बळी देऊ नये असा उपदेश दिला. ह्या सर्व उपदेशांनी पशुंना देखील जीवनदान मिळाले आणि ते आनंदाने बागडू लागले. 

तथागतांच्या ज्या शांतीसंदेशाने सम्राट अशोकाच्या मनाला शांती मिळाली, तोच सम्यक सम्बुद्धाचा संदेश प्रत्येक मानवापर्यंत पोहोचविण्याकरिता त्यांनी प्रयत्न केला. भारतातच नव्हे तर अन्य बाह्य देशात देखील त्यांनी बौद्धधम्माच्या प्रचारार्थ धम्मदूत भिक्खू पाठवून धम्माचा प्रकाश त्यांना दिला. ज्यांनी धम्म प्रचारार्थ आपल्या जीवनास वाहून घेतले, त्या भिक्खूसंघाला सम्राट अशोकाने सर्वोतोपरी संरक्षण दिले. त्यांना धम्म प्रचारार्थ येणाऱ्या सर्व अडचणी मोठ्या आतुरतेने सोडविल्या. भिक्खूसंघाला राहण्याकरिता व धम्म अध्ययनास्तव ठिक-ठिकाणी विहारे, संघाराम बांधून त्यांना  भिक्खूसंघास दान केले. सुमारे 84 हजार विहारे त्यांनी त्यावेळेस त्यांनी बांधली. एवढे करुनही त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्याने मोग्ललपुत्त महास्थविर यांस विचारले, ‘भन्ते! मी धम्म दायाद होऊ शकेन का?’ तेव्हा भन्तेनी उत्तर दिले, ‘राजन, तू जर आपले संतान बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खू शासनामध्ये संलग्न करशील, तर तू धम्म दायाद होशील. स्थविरांची ही वाणी ऐकून अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्र ह्यांना संघात दीक्षीत करुन धम्मप्रचारार्थ सिरीलंकेमध्ये पाठविले. 

सम्राट  अशोकाने आपल्या काळात जी घोषणा केली होती. अगदी तीच घोषणा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या भारतभूमीवर पुन्हा एकदा धम्मराज्य स्थापण्याची सुरुवात करतांना केली. मी सारा भारत बौद्धमय करीन. त्या घोषणेची आजच्या ह्या विज्ञान युगाला अत्यंत गरज आहे. आज मानव भौतिक विज्ञानामध्ये प्रगतिशील बनून धम्माला पारखा होत आहे. चंगळवादाने विक्राळ स्वरुप धारण केले आहे. विज्ञानाचा वापरही चंगळवादासाठी होत आहे. म्हणूनच अशोक विजयादशमीच्या मंगलदिनी आपण संकल्प करु या तथागतांच्या धम्माद्वारे मार्गक्रमण करण्याचा. तरच या भारतभूमीवर पुन्हा एकदा धम्मराज्य स्थापन होईल. 

बौद्धधम्म मुख्यत आणि मुलत सामाजिक आहे. समाजाच्या धारणेनुसार आणि धारणेच्या अनुषंगाने व्यक्तीची धारणा होते. हा बौद्धधम्माचा सिद्धांत बाबासाहेबांनी प्रतिपादला आहे. या समतेचा आधार परमेश्वर नाही, त्याची लेकरे नाही किंवा त्याची कृपा नाही तर समाज आहे. समाजाची धारणा आहे. आणि त्यातून प्रकट होणारी मानवता करुणा आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली आहे. बुद्धाचा धम्म केवळ व्यक्तीसाठी तिच्या मोक्ष प्राप्ती साठीही नव्हता, तर तो तितकाच समाजासाठी, समाजधारणेसाठी होता. थोडक्यात म्हणजे बुद्धांचा धम्म हा जसा वैयक्तिक आहे तसाच सामाजिक आहे. किंबहूना सामाजिकता, सामाजिक नितीमत्ता, समाजधारणा हे बौद्धधम्माचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणून सांगण्यासारखे आहे. एकूण समाजाचा विचार केला आणि त्याची धारणा हे उद्दीष्ट मान्य केले म्हणजे मग वर्ण, जन्मजात, देश, भाषा, स्त्री-पुरुष भेद वा कोणत्याही इतर तत्वानुसार माणसांमाणसांत फरक किंवा श्रेष्ट कनिष्ट भाव निर्माण होऊ शकत नाही. प्रत्यक्ष इश्वरसुद्धा कोणाला किंवा कोणावर विशेष कृपा करु शकत नाहीत 

यहूदी धर्माच्या दृष्टीने ज्यू हे देवाचे लाडके. ख्रिस्ती धर्माच्या दृष्टीने ख्रिस्तांला शरण गेले तर ते तरले ही भावना किंवा इस्लामी धर्माप्रमाणे इस्लाम हाच खरा धर्म अशाप्रकारे वर्ण, वंश, धर्म, जात, जन्माच्या आधारावर आपोआपर प्राप्त होणारी कोणतीही श्रेष्ठता हा प्रकार बौद्धधम्माला मान्य नाही. म्हणून समता, खरीखुरी सामाजिक समता सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा ही कोणत्या धर्मामध्ये संभवत असेल तर ती केवळ बौद्धधम्मातच संभवते. 

बुद्धाच्या धर्म मीमांसेचा प्रारंभ दुःख मीमांसेपासून होतो. आणि दुःख निवारण, व्यक्तीचे समाजाचे दुःखनिवारण हा बुद्धाचा धम्मचक्र प्रवर्तनाचा एक हेतू उघडच होता. गौतम बुद्धांनी मानवी मीमांसा केली. विविध प्रकारचे मानवी दुःख बघून तथागत अस्वस्थ झाले. सर्व  संपत्ती सुखसाधने त्यांच्याजवळ असतांनाही त्यांनी त्यांच्या परिवाराबाहेरील अफाट जनतेचे दुःख पाहिले. समरसून अनुभविले. त्यामुळे त्यांच्या मनात जशी करुणा उत्पन्न झाली. तशीच या दुःखाचे मूळ कारण शोधण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. आणि यातूनच पुढे सिद्धार्थची वाटचाल सुरु झाली. ती सम्यक सम्बुद्ध होऊन वृद्धाअवस्थेपर्यंत. विशेषत सुखसाधनांची उपलब्धता ही संपत्तीवर आधारलेली असल्dयास आणि ती संपत्ती जर खाजगी मालकीची असेल तर संपत्तीपासून वंचित तो सुखसाधनापासून वंचितच. तो सुखापासून वंचित आणि दुःखाचा धनी अशी साखळी जूळत जाते. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुखदुःख असतातच. पण जर सुख आले तर सुखाचा आनंद घ्यावा व दुःख आले तर रडत न बसता ते दुःख निवारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःख लोटल्यानंतर सुखाचा काही अनुभव मिळाला तर त्यामध्ये दुःख आणून सुखाच्या काळात शोक करत बसलो तर सतत आपल्या वाट्याला दुःखच राहिल. त्यासाठी सुखाच्या आनंदाच्या काळामधील मागील दिवसात झालेल्या दुःखाचा शोक न करता आलेल्या सुखाचा आनंद उपभोगून इतरांनाही त्यामध्ये सामाविष्ट केले पाहिजे. कारण दुसऱ्याना सुख देण्यामध्ये जेवढा आनंद मिळतो तो आनंद इतर आनंदापेक्षाही शतगुणित असतो. विश्वास वाटत नसेल तर स्वत कृती करुन अनुभवलात तर नक्कीच कळेल हा व्यक्तीधर्मच आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com