मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यात उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत, आज ते उस्मानाबादमधील कळंब येथे गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच आंदोलन मागे घ्यावं यासाठी नेत्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला का? किंवा कोणी ५ – ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती का? या प्रश्नावर जरांगे-पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मला पैशांचं कोणी बोलूच शकत नाही. खरं सांगतोय मी… मला तसं काही बोलले असते, तर मी थेट बोललो असतो… मी काही पोटात ठेवलं नसतं…आणि सर्व समाजाला सांगितलं असतं की हे लोक मला असं बोलतायत…कारण मला भिडभाड नाही..आपलं जे असतं ते दणकून असतं…त्यामुळे ते असं म्हणूच शकत नाहीत…कारण मला ते अनेक वर्षांपासून बघतायत…त्यांनी माझी आंदोलनं हातळली आहेत, आज आहेत त्यांनीपण आणि अगोदरच्यांनी पण माझी आंदोलनं बघितली आहेत…त्यांना सगळं माहिती आहे. मी यांच्या (नेत्यांच्या) गाडीतसुद्धा बसत नाही. कधी मुंबईला वगैरे एखाद्या बैठकीला जायचं असेल तर आम्ही आमची वर्गणी काढतो, गाडी ठरवतो आणि आमची सगळी माणसं जातो. त्यांच्याबरोबर जेवतसुद्धा नाही. वेळ पडल्यास आम्ही भजी खाऊ. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि आजवर माझं असंच काम राहिलं आहे.
दरम्यान मंगळवेढ्यातही यल्गार सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सगळेच राजकीय पक्ष मोठे करण्यासाठी आपल्या समाजातील बापजाद्यांनी वेळ दिला. सहा महिन्यात सगळे पक्ष सत्तेत येवू गेले. पण आपल्यावर वेळ आल्यावर एकही राजकीय पक्ष आरक्षणावर बोलायला तयार नाही. आंतरवाली येथे मराठा आंदोलनात माता माऊली चार चार महिन्याची लेकरे घेवून बसलो असताना अचानक हल्ला करून माता माऊलीचे डोके फोडून चेहरा दिसत नव्हता इतका विद्रुप केला. त्यात 75 वर्षाच्या वयोवृद्धाला सोडले नाही. लोकशाही पध्दतीने आमचे आंदोलन सुरू असताना हल्ला करण्याचे कारण काय याचे उत्तर सरकारने अद्याप दिले नाही. आमचे आंदोलन मोडण्यासाठी हल्ला घडवून आणला. तो हल्ला महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजावर हल्ला होता.
पाच हजार कागदाचा पुरावा सापडल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सकसकट प्रमाणपत्र द्यावे लागेल. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही. मराठा आणि कुणबी एकच असलेले अनेक पुरावे होते. चर्चेसाठी अनेक मातब्बर नेते पाठविले. त्यांना मराठ्याची पोटजात का होवू शकत नाही, असा प्रश्न विचारताच त्याची बोलती बंद झाली. सगळे निकष मराठा समाजाचे पार केले. गायकवाड कमीशनने मराठा 12 टक्के मागास असल्याचे सिध्द केले. वंशावळी असलेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा शासन निर्णय घेवून आले. पण वाचल्यावर पण त्यात खुट्टी मारली होती. आपल्याशी आतापर्यंत खूप खेळ खेळलाय. आता तरी भानावर येवू, असे आवाहन करत शेवटचा लढा द्यायचा. आता माघार घ्यायची नाही. आरक्षणासाठी 40 वर्षे गेली. आता 40 दिवसाचा वेळ देवू, जी समाजाची वेदना ती मांडतोय. हे आंदोलन सामान्य मराठ्यानी हातात घेतले असून, त्यात दोन गट पाडू शकत नाही. आंतरवालीतील विराट रूप बघून शासनाला निर्णय घ्यावा लागेल.
0 टिप्पण्या