Top Post Ad

व्यक्तीच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिकाराची जपणूक व्हावी !

आंबेडकरोत्तर चळवळीतील वृत्तपत्रांनीच सामाजिक भान आणि अन्वय जिवंत ठेवला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. याचे कारण आंबेडकरपूर्व चळवळीच्या पूर्वार्धात वृत्तपत्रांनी केलेली कामगिरी, उदा. ' दीनबंधू', ' विटाळ विध्वंसन '(१८८९) व ' सोमवंशी मित्र ' (१९०८) या पत्रांनी त्यांच्या काळात सामाजिक समतासंघर्षावर मोठ्या प्रमाणात प्रहार केले. तथापि ती अल्पायुषी ठरली. १९२० च्या दरम्यान वयाच्या २९ व्या वर्षी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'मूकनायक ' सुरू करतात. १९२३ दरम्यान डझनभर अंकापर्यंत मजल मारली खरी, परंतु तत्कालीन सामाजिक विषमता व धर्मांधतावादी मानसिकतेविरोधात दंड थोपटून आव्हान देण्याचे फार मोठे काम त्या काळात झाले हेही तितकेच खरे आहे. सदर पत्रांचा दर्जा, वैचारिक सामर्थ्य व भाषासमृद्धीचा विचार करता तत्कालीन पांढरपेशीयांच्या अर्थात पुढारलेल्या वर्गाकरवी चालविण्यात येणार्या पत्रकांपेक्षा कांकणभर श्रेष्ठच होती! परंतु सामाजिक प्रवाहाच्या देशांमध्ये धार्मिकतेचे अडसर उभे करून, बहुजनांच्या उत्थानाचे कार्य करणारी वृत्तपत्रे फारकाळ तग धरणार नाहीत यासाठी नाकेबंदी करण्याचे हलकट प्रयत्नही झाले.

सामाजिक बदलासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे शस्त्र नाही, याची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव होती. अधर्मीय प्रवृत्तींनी लादलेल्या सामाजिक व मानसिक गुलामगिरीतून तत्कालीन अस्पृश्य समाजाला मुक्त करणे हा हेतू डोळ्यांपुढे ठेवून प्रबोधनाचे काम झाले पाहिजे असे डॉ.बाबासाहेबांचे मत होते. २० जुलै १९२४ रोजी मुंबईतील ऐतिहासिक दामोदर हॉलच्या सभागृहात आयोजित केलेल्या ' बहिष्कृत हितकारिणी सभे ' ला उपस्थित असलेल्या अनुयायांना संबोधित करताना,' शिका, चेतवा आणि संघटीत रहा ' हा संदेश दिला. अर्थात हे आवाहन मागासवर्गीय घटकातील सर्वच जातीसमुहांना होते. मात्र हे समूह एकत्र येणे अशक्य असल्याने त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव देण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे शस्त्र व साधन नाही, याबाबत वारंवार प्रतिपादन केले. ' हिंदूधर्मशास्त्र ' या बहिष्कृत भारतातील अग्रलेखात अत्यंत कठोर शब्दात हल्लाबोल करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, " आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग हिंदू धर्माने मोकळा ठेवला आहे, पण बाहेरच्याला आत येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या वाढीमुळे पाणी आत येण्याची तोटी बंद, पण पाणी रोखण्याची तोटी खुली असलेला हौद जसा शुष्क होऊन त्यात पाण्याचा एक टाकही उरत नाही तशी स्थिती हिंदू समाजाची न व्हावी व हा सारा अनर्थ टाळावा असे जर वाटत असेल तर, जातिभेदाचे उच्चाटन करणे आवश्यक आहे." हिंदू धर्मात सुधारणा व्हावी हा प्रधान हेतू समोर ठेवून केलेले हे आव्हान होते. विविध परिषदा, मेळावे यांच्या इतिवृत्तांचे संकलन करण्यापासून प्रासंगिकतेला प्राधान्य देत तर्कशुद्ध मांडणी करण्यावर दिलेला भर हे ' बहिष्कृत भारत ' चे वैशिष्ट्य होते.
वृत्तपत्रांचा नैत्तिक पाया मजबूत असेल तरच ती पाय रोवून उभी राहू शकतात यावर डॉ.बाबासाहेब ठाम होते. ' नैत्तिकता हा वृतपत्राचा पाया होय ' असे मत मांडताना, पत्रकारिता भ्रष्ट होणार नाही यासाठी दिलेला हा इशाराच पहा. पुण्यातील महादेव गोविंद रानडे व्याख्यानमालेत श्रोत्यांपुढे बोलताना, " Journalism in India was once a profession. It has now become a trade. It has no more moral function than the manufacture of soap." हेच सूत्र पुढे
' जनता', 'समता ',ते 'प्रबुद्ध भारत ' या पत्रकातून कायम ठेवल्याचे दिसते. जातिव्यवस्थेमुळे आपण जगलो, पण त्यात स्वाभिमान नसल्याचे कटू शब्दात सत्य मांडताना, राष्ट्र म्हणून हे सर्व प्रवाह कधीच एकत्र येणार नाहीत याबाबत वारंवार इशारे देण्याचा प्रयत्न केला. अर्थात या वैचारिक बैठकीचा पाया राष्ट्रपिता जोतीबा फुले यांच्या सामाजिक क्रांती व विचारांनी पक्का केला याची स्वतः बाबासाहेबांनीच कबुली दिलेली आहे. प्रश्न आहे अस्पृश्य घटकातील महार जातीतील डॉ.भिमराव रामजी आंबेडकर नावाचा तरूण जोतिबा फुल्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्राधान्य देऊन तमाम मागासवर्गीयांच्या मुक्त स्वातंत्र्याचा लढा उभारतो,.तशा जाणीवा तत्कालीन मागास घटकातील युवकांमध्ये का निर्माण झाल्या नाहीत? याचे कारण सामाजिक सुधारणापर्वाचा तो कालखंड होता, ज्या कालखंडात स्वराज्याची चळवळ जोर धरत होती. इथेही डॉ.बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले. व्यवस्थेच्या ठेकेदारांनाच प्रश्न विचारला, स्वराज्यात समाजव्यवस्था अनुकूल हवी. ती नसेल तर ते स्वराज्य कसे मानायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर तयार केलेल्या संविधानाच्या आराखड्यात सापडतात.
लोकशाहीत विचारमूल्यांना प्राधान्य देण्याचा हक्क अबाधित ठेवण्यात आला असून, त्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला रोखण्याचे काम निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सार्वभौमत्व म्हणतात ते हेच! इंग्रजीत supreme, sovereign व paramount हे पर्यायी शब्द आले आहेत. व्यक्तीसापेक्षतावाद हा सार्वभौमत्वाशी संबंधित म्हणता येईल. सर्वसामान्य माणसाच्या मताला प्राधान्य देणाऱ्या सापेक्षतेला लोकशाहीच्या दालनात मुभा नसेल तर एककेंद्री विचारप्रणालीकडून जोर धरण्याचा प्रयत्न होण्यास फारसा वेळ लागणार नाही. सत्ता आणि सुबत्ता आपल्याच हाती कशी राहील यासाठी राजकीय पक्षांमध्ये चालणारे स्पर्धात्मक राजकारण काय सांगते? यासाठीच लोकशाहीचा ४ था स्तंभ म्हणून संविधानाने वृत्तपत्रांना प्राधान्य दिले आहे. पण राजकीयप्रणालीवर प्रसारमाध्यमे अंकुश ठेवण्यात यशस्वी होतात का? प्रसारमाध्यमे ही जनतेच्या मार्गदर्शनाचे विचारपीठ असून, वृत्तपत्रं पाठ्यपुस्तक म्हणता येईल. माध्यमच मुक्त नसेल किंवा ती कुणाच्या तरी इशार्यानुरूप चालत असतील तर लोकशाहीमूल्यांची बूज (प्रतिष्ठा-आदर) कशी राहील? हा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत असतो, पण लोक व्यक्त होत नाहीत. जे व्यक्त होऊ पाहतात त्यांची नेहमीच मुस्कटदाबी करण्यात येते हे वास्तव आपण वर्तमानात अनुभवत असतो. राष्ट्रकवी संत तुकाराम महाराजांनी अत्यंत मर्मभेदी सवालच विचारला आहे.
कैंचा मज धीर । कोठे बुद्धि माझी स्थीर ।
जो या मनासी आवरूं । आंत पोटी वाव धरून ।।
कोंडी शुद्ध मती । भांडवल ऐसे हाती ।
तुका ह्मणे अंगा । कोण दशा आली सांगा।।
१९३३ व्या गाथेतील हा आशय वर्तमानातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीच्या नावाखाली देखावे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर तुकोबांनी मारलेला हा जोरदार तडाखा म्हटले तरी वावगे होणार नाही.
सर्वसामान्य मनुष्याची आजची स्थिती कशी आहे? तो प्रवाहात आहे का? संविधानाने केंद्रबिंदू मानलेला, सार्वभौमत्वाचा पाया असलेल्या सर्वसामान्य माणसाला लोकशाहीच्या पवित्र मंदिरच्या पायरीवर उभे राहण्याचा अधिकार नाही, बोलण्याचा, आंदोलन करण्याचा, मत मांडण्याचा अधिकार नाही. राजकीय मनमानी करणार्या प्रवृत्तींवर बोलण्याचा अधिकार नाही! जे व्यक्त होतात, त्यांना पोलीस प्रशासनाकरवी जेली हवा खाण्यास पाठवले जाते. लोकशाहीची गळचेपी होत असताना प्रसारमाध्यमांचे धोरण बोटचेपे राहिल्याने राष्ट्र ही संकल्पना बोथट होत गेली की,आणि तिची जागा धर्मांधता घेते. जातीयवाद, भाषावाद, व प्रांतवाद एकत्र आले की अस्मितेचा जन्म होतो असे आमचे ठाम मत आहे. हा दांभिकपणाच धर्मप्रमाण्याचा अतिरेक वाढविण्याचे काम करतो. धार्मिक राष्ट्रवादाची मागणीचे पेव फुटण्याची ही अशी मानसिकताच कारण ठरते! म्हणूनच प्रत्येक व्यक्ती म्हणजे राष्ट्र असते. राष्ट्रात जिवंतपणा असतो. एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मियता, करूणा, मैत्री सर्वकाही राष्ट्रात असते. पण तो वृद्धिंगत होऊ नये यासाठी आपपरभावाची पेरणी करून, सामाजिक व राष्ट्रीय ऐकण्यास खीळ घालण्याचे काम होत गेल्याने, सामाजिक प्रवाहांना मर्यादा पडल्या. अनेकदा हे प्रवाह, धर्म व त्यांच्या प्रार्थनास्थळातच अडकले. म्हणूनच सर्व समुहाचे प्रबोधन करून त्यांच्यात विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वृत्तपत्र चळवळ फार आवश्यक आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेने अवघे जग कवेत घेतले. याचे कारण येथील मातीत जरी मानवतावादाची पाळेमुळे रुजलेली असली तरी अंकुर अन्य देशांमध्ये फुटत आहेत. व्यक्तीचे सार्वभौमत्व म्हणजेच त्याचे सामाजिक, भौत्तिक, नैसर्गिक व सांस्कृतिक अधिकाराची जपणूक करताना त्याच्यातील निष्ठांना तडा जाणार नाही याची काळजी घेणे होय!
गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
गुरूवार, दिनांक १२/१०/२०२३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com