Top Post Ad

आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे, जे लोक धडपड करत आहेत....

 


   ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. समाजाला प्रथमच  पोरकेपणाची जाणीव झाली. १४ अॉक्टोबर अशोका विजयादशमी दिनी नागपूरच्या पवित्र भूमीवर अभूतपूर्व असा धम्मदिक्षा सोहळा पार पडला.  डॉ.बाबासाहेबांनी केलेला धर्मबदल धर्मांधतेविरोधात होता. अंधरूढी व परंपरावादाला मूठमाती देण्यासाठी होता. त्यामागे सामाजिक व राजकीय बदलाची अपरिहार्यता दडलेली आहे हे आपण समजून घ्यायला हवे. २० जुलै १९२४ च्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या विचारपीठावरून शिका, चेतवा पण संघटीत रहा या घोषणेने सुरू झालेला झंझावात ६ डिसेंबर १९५६ रोजी शांत झाला. डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरचा समाजाचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे. ' समाजाचा इथपर्यंत आणलेला गाडा, मागे नेऊ नका.' या  बाबासाहेबांच्या या आवाहनाच्या विरोधात वाटचाल करणार्‍यांनी केली, ज्याचे दुष्परिणाम आजही भोगावे लागत आहेत. 

मात्र सर्वसामान्य आंबेडकरी जनता आपल्या उपकारकर्त्याविषयी कृतज्ञ राहिली.  ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच सवतेसुभे निर्माण केले, आणि अज्ञानमुलकतेने समाज गटातटात  विभागला असे जाणिवपूर्वक चित्र रेखाटण्याचा अश्लाघ्य (निंदनीय) प्रयत्न सुरू झाले. त्यात गटाच्या प्रमुखांना बर्‍यापैकी यश मिळालेही. याचे कारण आपला माणूस ही निर्माण झालेली भावना!आमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा नेता ही ती श्रद्धायुक्त भावना होय! तथापि हे सर्व फुटलेले नेते व त्यांच्या चेलेचपाट्यांना समाजात फारसे स्थान नव्हते, काही अपवाद वगळता. त्यांचे स्थान फक्त आणि फक्त पोस्टर्सवर होते. समाजाच्या अंतःकरणात फक्त अंधाऱ्या वस्तीत दिवा लावणाऱ्या एकमेव युगप्रवर्तक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाच स्थान होते! आणि म्हणूनच तमाम बौद्धांचा वाली गेला आणि सुग्रीव शिल्लक राहिले ही भावना निर्माण झाली. 

वर्षे उलटली पण डॉ.बाबासाहेबांच्याप्रती असलेल्या निष्ठेला किंचितही तडा गेला नाही. याचे कारण सर सिडने स्मिथ यांच्या शब्दात संक्षिप्तपणे सांगायचे तर समाज नावाच्या आयताकृतीत व्यवस्थेने तयार केलेल्या लहानमोठ्या त्रिकोणात अस्पृश्य गणला गेलेला हा समाज दबलेल्या व चेपलेल्या अवस्थेत जगायचे  म्हणून जगत होता. अशा समाजाला प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनीकेले. संविधानाची निर्मिती करून कधीकाळी व्यवस्थेने नाकारलेले सामाजिक व राजकीय अधिकार दिले! युगेनयुगे धर्मव्यवस्थेच्या नियमांच्या बंधनात अडकवून दास्यत्वाच्या अर्थात पायरीने वागण्याची सक्ती केलेल्या, या षड्यंत्रालाच नेस्तनाबूत करून मुक्तस्वातंत्र्याचा अविष्कार घडवला त्या आपल्या उपकारकर्त्याबद्दल समाज कृतज्ञ राहिला नाही तर नवलच की! 

डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर समाजाचे हातपाय गळाले नाहीत, उलट तो आणखीनच सक्षम होत गेला. अर्थात त्याची प्रक्रिया धिम्यागतीने  होती. या निष्ठाच समाजाला एकत्र ठेवण्याचे काम करत होत्या. ६ डिसेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील कानाकोपरा सजग होत असे. आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले दक्षिण मुंबईतील कुलाबा, नागपाडा, वरळी, लव्हलेन-भायखळा, माझगाव, ताडदेव, कामाठीपुरा, आग्रीपाडा, परळ, व दादर माटुंगा एवढ्यापुरताच मर्यादित असला तरी कालांतराने उपनगरात तो काही प्रमाणात विस्तारला. हे बालेकिल्ले ६ डिसेंबरच्या मध्यरात्री जागे होत. याच बालेकिल्ल्यातून प्रबोधनाचे अर्थात लोकांना जागे ठेवण्याचे काम होत होते.  महानिर्वाण दिन हा दुःखाचा दिवस. ज्यांनी आमच्यासाठी डोळ्यांच्या वाती करून आम्हाला प्रकाश दिला, त्यांच्या स्मृतिदिनी तरी जागे राहा रे!ही आर्त साद घालत, बालेकिल्ल्यातले भिमसैनिक वस्त्यांमधून फिरत. सोबत मशाल असे. आताच्यासारखे रस्त्यांवर प्रखर विजेचे दिवे नव्हते. दिवसभराच्या श्रमाने थकल्या भागलेल्या वस्त्यांमध्ये नऊ वाजताच चिडीचूप होत असे! या वस्त्यांना जागे करण्यासाठी, लोक घोळक्याने येत. घोषणांबरोबरच प्रबोधनपर गाण्यांनी लोकांमध्ये उर्जा आणण्याचे फार मोठे काम १९६० ते १९७४ पर्यंत होत राहिले! एक घोळका जात नाही तोच दुसरा हजर! घोषणा आणि महानिर्वाण दिनाचे गीत गात हेजत्थे हळुवारपणे चैत्यभूमीच्या दिशेने जात असत. या प्रत्येकाचे एकच ध्येय ठरलेले जागे व्हा! जागे व्हा!! 

त्यावेळी मी कामाठीपुर्‍यालाच लागून असलेल्या अरब गल्लीतील जुन्या ढोरचाळीत विश्राम हरी जाधव शिवणकर यांच्या खोलीत राहत होतो. पाठीमागे जयराजभाई लेनला खेटून आणखीन एक चाळ होती, तीदेखील ढोरचाळ या नावाने ओळखली जायची. याच चाळीत पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ व उमाकांत रणधीर रहायचे! जयराजभाई लेनमध्ये आमचे वास्तव्य होते याचा मला आजही अभिमान वाटतो. याचे कारण डॉ.बाबासाहेब परदेशातून आल्यानंतर पहिला सत्कार व त्यांचे पहिले भाषण झाले ती ही ऐतिहासिक चाळ व परिसर!  आमच्या वस्तीत पँथर बाबू जुवाटकर यांचा प्रचंड दरारा असे. अंगापिंडाने मजबूत असलेल्या बाबू जुवाटकरांच्या आवाजात ताकद होती. याच चाळीत कृष्णा दाजी पवार म्हावळंगकर राहत. माझ्याबरोबर नवशक्ति, नवाकाळ मध्ये ते सातत्याने लिहित. तेथेच मारूती नावाचा युवक घडला. गोड गळा लाभलेला मारूती जागर यात्रेत पोटतिडकीने गाणे म्हणत असे.  पायी चालत वस्त्यांमध्ये शिरल्यावर होणारे स्वागत, चहापान समाजाने जपलेला आपलेपणा खूप काही सांगून जायचा. याच प्रभातफेरीत अनेक लोक भेटत. 

मुंबई सेंट्रल परिसरातील कलकत्तावाला इस्टेटमध्ये राहणारे जयंत जाधव व गायक यशवंत आजिवलीकर यांची भेट हमखास ठरलेली!   जयंत गायन पार्टीचाआवाज यशवंतराव होते. त्यांना कोरससाठी साथ देणार्‍यांमध्ये अनंत जाधव राजापूरकर व रामदास गोविंद पाटेकर (हे महाडच्या चांढवे बुद्रुक गावचे चर्मकार समाजाचे! पण आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले) हे दोन शिलेदार ठरलेले.  रामदास पाटेकर नंतर शाहीर विलास जैतापकरांच्या समूहात गेले. या प्रभातफेरी दरम्यान बौद्धाचार्य बी.एस.तामानेकर, दत्ता वाडेकर, भीमसेन जैतापकरांच्या या बड्या मंडळींची भेट व्हायची. बेलासिसरोड (फोरास रोड) आताचा केशवराव कदम मार्ग येथे १८ नंबरची बीआयटी चाळ ही पूर्णतः बौद्ध लोकांची वस्ती असलेली. तेथे सोनू देऊ जुमलेकर, कबड्डीपटू वसंत सकपाळ, गंगाराम कांबळे बावडेकर ही मंडळी येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी तयार असत! याच विभागात ६ नंबर चाळीत राजापूर तालुका महार ज्ञाती संघाचे व  राजापूर तालुका बौद्धजन संघाचे पहिले अध्यक्ष विश्राम बाळू वाडगावकर व  पुण्यातील वडगावचे सुपुत्र धोंडिराम कोंडिराम रोकडे हे दोन्ही मुख्याध्यापक राहत असत. वाडगावकर मास्तर १९३५ साली समाज समता संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे सरचिटणीस होते, ज्यांची नेमणूक डॉ.बाबासाहेबआंबेडकरांनी केली होती!  त्यांचा मला जवळून सहवास लाभला. त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने साहित्य व राजकारणातील बारकावे मला टिपता आले. ज्याचा फायदा वृत्तपत्रलेखनात झाला! 

 डॉ.दिपक धाकू गायकवाड आजही माझा उल्लेख करताना आंबेडकरी राजकारणातले राजकीय विश्लेषक असा करतात याचा मला अभिमान वाटतो! तेथून बाप्टीरोड म्हणजे आताच्या  परशुराम पुप्पाला मार्गावर असलेल्या सिद्धार्थ नगर या मनपा कर्मचारी वसाहतीत प्रबोधनपर गाणी ऐकवण्याचा आग्रह होत असे. तेथे एस. आर. उर्फ सोनू मानगेकर, विनायक मंदरूळकर बायजी अंबाजी तांबे, रा.वि.हरचेकर या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून चोख व्यवस्था होत असे. याच वस्तीत डी/३२ मध्ये ज.वि.पवार यांचे काही काळ वास्तव्य होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी डी/३१ मध्ये अनंत कांबळे गोवळकर ( चित्रपट दिग्दर्शक जयभिम कांबळे यांचे वडिल) यांच्या खोलीत भाडेकरू म्हणून रहायला गेलो. याच सिद्धार्थ नगरात दलित पँथरच्या स्थापनेनंतरचा ९ जुलै १९७२ रोजी पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विनायक भिकाजी मंदरूळकर यांची विशेष आठवण सांगायची तर १९५६ साली प्रबुद्ध भारत साठी ५० रूपये देणगी देणारे राजापूर तालुक्यातील पहिले देणगीदार होत!  त्यांचा उल्लेख प्रबुद्ध भारतात करण्यात आलेला आहे.

वरील सर्व वस्त्या मनपाच्या साफसफाई खात्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या होत्या.  तर कोणी गिरणी कामगार असलेले. रात्रभर जागर करीत बालेकिल्ले ढवळून काढणारे पाय सकाळी विनातक्रार आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर राहत! मात्र सूर्यपुत्र भय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांनी, ' महू ते चैत्यभूमी ' ही पदयात्रा काढल्यानंतर जागर बंद होत गेला. या ध्येयवे़ड्या माणसांनी चळवळ जिवंत ठेवली. विद्यार्थी दशेत त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. आता चळवळीत कार्यकर्ता शोधावा लागतो. आधीच्या कार्यकर्त्यांचा ड्रेसकोड ठरलेला असायचा. आता प्रमुख पाहुणा आणि आयोजक कोण हे विचारावे लागते! राहणीमानातील बदल  (standard of living) सुखावह असला तरी चळवळीत झोकून देणार्‍यांची संख्या रोडावत चालली हे शल्य टोचत राहतं. बाबासाहेब हिमालयाहून महान होते. त्यांच्या तालमीत तयार झालेले सहकारी सह्याद्रीची उंची गाठणारे होते! परंतु ती उंची त्यांना टिकवता आली नाही. परिणामतः चळवळीत मरगळ आली. वर्तमानात वरील बालेकिल्ल्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे, जे लोक धडपड करत आहेत, त्यांना मनापासून सॅल्युट!

  • गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर
  • रविवार, दिनांक १ अॉक्टोबर, २०२३
  • सकाळी ठिक ५.४५ वाजता पोस्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com