"संसद ही कोमेजू शकली नाही", "तुझ्यातील रान फुलांना" .... असे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना उद्देशून महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ हे आपल्या "स्मरण दादासाहेब गायकवाडांचे" या कवितेत म्हणतात.
दलितांचे मुक्तीदाते, दिग्विजयी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. 1926 साली डॉ. बाबासाहेबांच्या झालेल्या प्रथम भेटीनंतर 1956 साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण होई पर्यंत त्यांचा हा स्नेह संबंध आणि जिव्हाळा कायम राहिला. ज्येष्ठ विचारवंत शंकरराव खरात आणि वामन निंबाळकर यांनी प्रकाशित केलेली डॉ. आंबेडकरांची भाऊरावांना लिहिलेली पत्रे याची साक्ष देतात. शिवाय भावना भार्गवे, हरिभाऊ पगारे, डॉ. रावसाहेब कसबे, रंगनाथ डोळस, रमेश शिंदे, अर्जुन डांगळे आदि लेखकांनी दादासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत.
महाड मुक्ती संग्राम, काळाराम मंदिर सत्याग्रह, मुखेडचा सत्याग्रह, त्यानंतर 1935 ची येवला मुक्कामी झालेली धर्मांतराची भीमगर्जना आदि सर्व पातळ्यांवर दादासाहेब गायकवाड यांची सक्रीय भूमिका आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात अधोरेखित झाली आहे. खरेतर दादासाहेबांच्या जयंती निमित्ताने विचार करीत असताना ऑक्टोबर महिन्याचं ऐतिहासिक महत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही. कारण 3 ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिन, 13 ऑक्टोबर हा येवला मुक्कामी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा दिन, ऑक्टोबर (विजयादशमी) हा नागपूर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा धम्मक्रांती दिन आणि 15 ऑक्टोबर हा कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जयंती दिन. हे सर्व ऐतिहासिक दिन ठिकठिकाणी साजरे झाले. परंतु उत्सवा बरोबरच ह्या दिनांचे गांभीर्य लक्षात घेऊन आपणाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी विरोधी पक्षाची आवश्यकता म्हणून ज्या संकल्पित रिपब्लिकन पक्षाचा विचार तत्कालीन परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. परंतु त्यांच्या आकस्मित महापरिनिर्वाणामुळे त्यांचें स्वप्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाही. नंतर 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूर मुक्कामी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. त्या संपूर्ण प्रक्रियेतील पुढाऱ्यांपैकी दादासाहेब गायकवाड एक प्रमुख धुरीण होत.
धर्मांतराच्या घोषणेनंतर स्वीकारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म कोणता ? तो महायानी की हिनयानी ? किंवा यापेक्षा वेगळा नवयान त्यांना अभिप्रेत होता का ? आंबेडकरांचे बुद्ध दर्शन माणसाच्या ऐहिक मुक्तीचे भाष्य करते नव्हे तर ते भौतिकवादी आहे. प्रतित्यसमुत्पाद अर्थात कार्यकारणभाव हा मानवी शोषणाच्या आणि दुःखांच्या कारणांचा शोध घेतो. बौद्धदर्शन हा एक जीवनमार्ग आहे कर्मकांड नव्हें.
ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या या सर्व ऐतिहासिक घटना भविष्यकाळातील मुक्ती लढ्याची नांदी ठरण्यासाठी त्याचा नीट अन्वयार्थ लावण्याची गरज निर्माण झाली आहे. आज दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी करीत असताना सद्याच्या पिढीने हे भान जपणे आवश्यक आहे. आंबेडकरोत्तर कालखंडातील संयुक्त महाराष्ट्र समितीशी सहकार्य करून 'शेड्युल कास्ट फेडरेशन'च्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुका मैलाचा दगड ठरल्या. या प्रक्रियेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे सर्वांत महत्त्वाचे नेते होते. 1958 ते 1971 ह्या काळातील दादासाहेबांचा राजकीय प्रवास लक्षात घेऊन आजच्या पिढीने शिकण्यासारखे आहे. भारतीय दलितांचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न आहे, हे दादासाहेबांनी सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला, अशी नोंद एके ठिकाणी डॉ. रावसाहेब कसबे यांनी नोंदवली आहे.
3 लाख 40 हजार सत्याग्रहींचा 'जेल भरो' करणारा 1964 सालचा देशव्यापी सत्याग्रह भारतीय आंदोलन इतिहासातील सुवर्ण पान आहे. 1967 साली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेली काँग्रेस रिपब्लिकन युती आजही राजकीय अभ्यासकांना बुचकळ्यात टाकते. परंतु सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून त्या युतीचे महत्व लक्षणीय होते. जमीन सुधारणेचे कायदे करून शेतजमिनीचे फेरवाटप करणे व भूमिहीनांना जमिनीचे पट्टे मिळवून देणे, हा कर्मवीरांच्या लढ्याचा महत्त्वाचा भाग होता. आजच्या घडीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम पुरोगामी, डावे, आंबेडकरवादी आणि संविधानवादी शक्तींच्या पोलादी एकजुटीची गरज आहे. यासाठीच हे ऑक्टोबर चिंतन दादासाहेबांच्या जयंती निमित्त महत्त्वाचे आहे.
"कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना विनम्र अभिवादन"_
सुरेश केदारे... संपर्क: 8879997248
0 टिप्पण्या