ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या नवीनच तयार झालेल्या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्यांला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सात कामगारांना अपघात ग्रस्त लिफ्ट मधून बाहेर काढण्यात आले. त्यात एक कामगार सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे ) जखमी अवस्थेत होता. त्याला उपचाराकारिता निपुण रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे तो अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले. १) महेंद्र चौपाल (पु / वय ३२ वर्षे /कामगार) २) रुपेश कुमार दास (पु / वय २१ वर्षे / कामगार) ३ हारून शेख (पु / ६७ वर्षे / राहणार :- कुर्ला, मुंबई / लिफ्ट ऑपरेटर) ४ मिथलेश विश्वकर्मा (पु / ३० वर्षे / राहणार - दिघा, नवी मुंबई) ५) कारी दास (पु / ३५ वर्षे / राहणार :- बिहार /कामगार) ६) नविन विश्र्वकर्मा (पु / वय २२ वर्षे/ राहणार - दिघा, नवी मुंबई / कामगार) अशी मृत व्यक्तींची नावे असल्याची माहिती पोलीस अधिकारी व इमारत विकासकाकडून मिळाली आहे.
सुरक्षेतेची कोणतीही खबरदारी नसल्यामुळे ही घटना घडली आहे. व नाहक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्यामुळे या प्रकारात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक यांनी केली आहे. तसेच सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
0 टिप्पण्या