Top Post Ad

किल्लारीचा भूकंप!

 


    ३० सप्टेंबर १९९३. पहाटे ३ वाजून ५५ मिनिटाने लातूर- उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ातील बावन्न गावांना भूकंपाचा जोरदार हादरा बसला. ६.४ रिश्टर इतक्या भयानक तिव्रतेचा हा भूकंप होता. या भूकंपाचा सर्वात जास्त फटका लातूर जिल्ह्य़ातील किल्लारी गावाला बसला. संपूर्ण गाव या भूकंपामुळे जमिनीखाली गडप झालं. या भूकंपात अंदाजे सात आठ हजार माणसे मरण पावली. जवळपास तीस हजार माणसे जखमी झाली. आज तीस वर्षानंतरही इतिहासातला हा किल्लारीचा भूकंप  अंगावर शहारे आणतो.

      त्यावेळी मी नुकताच शाळेत कामाला लागलो होतो. माझा प्रोबेशनरी पिरियड सुरु होता. त्यामुळे रजा मिळूच शकत नव्हती. किल्लारीला जाण्याची खुप इच्छा असूनही जाता येणे शक्य नव्हते. त्या काळात आजच्यासारखी सतराशे साठ चॅनल्स नव्हती. दूरदर्शन हे एकच चॅनेल. त्यावर संध्याकाळच्या सातच्या बातम्या ऐकायच्या आणि वर्तमानपत्र वाचायची. या दोन माध्यमातून किल्लारीविषयीची माहिती घेत होतो. भूकंपानंतर तिथे अनेक स्वयंसेवी संस्था द्वारे वैद्यकीय सुविधा, तात्पुरता निवारा आणि अन्नदान सुरु झाले. पण अन्नदान करताना तेथे एक विचित्र घटना घडली. तिथल्या सवर्णांनी, आम्ही दलितांसोबत भोजन करणार नाही असे जाहीर केले. आधी आम्हाला भोजन द्या आणि मग उरले सुरले दलितांना द्या, असे त्यांचे म्हणणे होते. ही घटना भूकंपापेक्षाही संतापजनक होती. म्हणजे निसर्गाने तिथे भूकंप घडवून, माझ्या दृष्टीने सगळीच माणसे सारखी आहेत हा संदेश दिला. पण इथली माणसं इतकी हरामखोर की, संकट टळताच यांना पुन्हा आपल्या जातीश्रेष्ठत्वाची जाणीव झाली. जोवर इथला जातीयवाद नष्ट होत नाही तोवर या देशाला काहीही भवितव्य नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांना ॲनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहावा लागला होता.

       यानंतर उरल्या सुरल्यांना घरे बांधून देणार म्हणून शरद पवारांनी जाहीर केले. त्यानंतरही बरीच वर्ष हा प्रश्न भिजत घोंगड्यांसारखा भिजत पडला होता. मला माहित नाही की, आजही या माणसांना हक्काची घरे मिळालीत की नाही. जर मिळाली नसतील तर ते अत्यंत वाईट आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित की या प्रश्नावर प्रत्येकांनी फक्त त्यावेळेस राजकारणच केलं.

        किल्लारीवर जेंव्हा मी कविता लिहली त्यावेळेस ती फक्त वहीत होती. पण या कवितेने मी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो ते केवळ दया हिवराळेमुळे. दयाने त्यावेळेस आम्हा काही नवकविंना घेऊन दूरदर्शनवर कविसंमेलन केले. आम्ही फक्त चारच कवी होतो. त्यातला फक्त मला आता सतिश धिवरच आठवतोय. त्या काळात भरमसाठ चॅनेल नव्हते. फेसबुक, व्हाट्स ॲप आणि ट्विटरसारखी माध्यमे नव्हती. होतं ते फक्त ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन आणि लोकांना ते बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. किल्लारीची ही कविता मी दूरदर्शनवर म्हटली आणि आम्ही एक रात्रीत फेमस झालो. संपूर्ण महाराष्ट्रातून मला या कवितेबद्दल प्रशंसापूर्ण फोन आले आणि विवेक मोरे संपूर्ण महाराष्ट्राला कवी म्हणून परिचित झाला. तर मित्रांनो आज तीच कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे....... 


असच काहीतरी घडलं असेल!....              - विवेक मोरे

एक पाखरु उडता, उडता जमिनीवरती पडलं असेल,
पुन्हा उंच उडण्यासाठी प्राणपणाने लढलं असेल,
पण निसर्गाने पाखराला भूगर्भात गाडलं असेल, 
त्या किल्लारीमध्ये मित्रा, असंच काहीतरी घडलं असेल.....!
एक राघू मैनेसवे फांदीवरती बसला असेल, 
आयुष्याची दुःखे गिळून मैनेसवे हसला असेल,
आग्र्यामधला ताजमहल हृदयामध्ये वसला असेल,
मैनेलाही राघूमध्ये शहाजहान दिसला असेल,
भूकंप होताक्षणी दोघांचं काळीज रे तडफडलं असेल. 
त्या किल्लारीमध्ये मित्रा असच काहीतरी घडलं असेल...........!
एक पक्षीण थकून भागून घरट्यामध्ये आली असेल,
पिल्लांसवे चारा खावून पाणी पिऊन निजली असेल,
अंग टाकताच झोपी गेली दिवसभर दमली असेल,
पिल्लासवे स्वप्नामध्ये घटकाभर रमली असेल, 
त्याचवेळी पक्षीणीवर आभाळ एकदम पडलं असेल, 
त्या किल्लारीमध्ये मित्रा असच काहीतरी घडलं असेल............!
प्रत्येकाच्या रक्ताचा संबंधी तेथे मेला असेल,
तरीसुध्दा उरलेल्यांनी जातीभेद केला असेल,
निसर्गाला वाटले असेल माणूस एक झाला असेल,
पण वेळ टळताच माणूस पुन्हा जातीवरती गेला असेल,
दलितांना सवर्णांनी वेशीबाहेर काढले असेल,
त्या किल्लारीमध्ये मित्रा, असच काहीतरी घडलं असेल..........!
काल जिथे गाव होता काय त्याचे झाले असेल?,
उत्तर रात्री मरणाने त्यांना झडप घालून नेले असेल,
किल्लारीचा वारा म्हणतो, अश्रू आमचे कोण पुसेल?,
जगल्या वाचल्या दुःखितांचे नगर पुन्हा कधी वसेल?,
बुध्द कबीर येशूचं तेंव्हा मन भाबडं रडलं असेल,
त्या किल्लारीमध्ये मित्रा असच काहीतरी घडलं असेल...........!
आता नेते पुढारी बडी मंडळी मदतफेरी काढत असतील,
झेंडे बावटे घेऊन पदरी पुण्य व्यथेचे जोडत असतील,
प्रेतावरही राजकारणी गणित व्यथांचे मांडत असतील, 
मदतीचेही आकडे सांगून श्रेयाकरीता भांडत असतील. 
या शोभेच्या गर्दीमध्ये मांस मढ्याचे सडले असेल. 
त्या किल्लारीमध्ये मित्रा असच काहीतरी घडलं असेल!

                 .- विवेक मोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com