Top Post Ad

यशस्वी चाद्रमोहीमेचे बिनपगारी कर्मचारी

 श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून 14 जुलै रोजी “चांद्रयान-3’चे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.  भारताच्या “चांद्रयान 3′ मोहिमेकडे अवकाश संशोधनातील मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मात्र या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणारे काही कर्मचारी वर्षभरापासून विनापगारीच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात “द वायर’ने आयएएनएसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (एसईसी) कंपनीने “चांद्रयान 3′ मोहिमेसाठी लॉंचपॅड तयार केले आहे. झारखंडच्या रांचीमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. मात्र, या कंपनीत निधीअभावी गेल्या १८ महिन्यांपासून कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारच देण्यात आलेला नाही. एसईसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. रांचीच्या ध्रुव परिसरात ही कंपनी आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांना आवश्‍यक यंत्रसामग्री किंवा सुटे भाग पुरवण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो, संरक्षण विभाग, रेल्वे विभाग, कोल इंडिया आणि देशातील स्टील उद्योगाकडून या कंपनीला जवळपास दीड हजार कोटींच्या ऑर्डर्स आल्याचेही सांगितले जाते. मात्र, तरीही कंपनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगार देण्यास असमर्थ ठरल्याचे  “द वायर’ने वृत्तात म्हटले आहे.

    चांद्रयान-३ साठी लाँचर पॅडची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. यातील काही तंत्रज्ञांवर इडली, चहा आणि तर काहींवर मेमोज विकण्याची वेळ आली आहे.  ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, रांची येथील Heavy Engineering Corporation Limited (HEC)ने मागील काही वर्षांत इस्रोसाठी अनेक महत्त्वाची कामं केली आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेलं लाँचर पॅडही याच कंपनीने निर्माण केल्याचा दावा केला जात आहे. पण या कंपनीच्या २८०० कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामुळे रांचीच्या धुर्वा येथील ‘हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ (HEC) चे कर्मचारी आंदोलन करत आहेत.

पगार न मिळाल्याने अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला आहे. एचईसीचे तंत्रज्ञ दीपक कुमार उपरारिया हे गेल्या काही दिवसांपासून इडली विकत आहेत. रांचीच्या धुर्वा भागातील जुन्या विधानभवनासमोर त्यांचं दुकान आहे. ते दररोज सकाळी इडली विकतात आणि दुपारी ऑफिसला जातात. पुन्हा संध्याकाळी ते इडली विकतात आणि मग घरी जातात.

‘बीबीसी’शी बोलताना दीपक यांनी सांगितलं, “सुरुवातीच्या काळात मी क्रेडिट कार्डचा वापर करत माझं घर सांभाळलं. पण यामुळे माझ्यावर २ लाखांचं कर्ज झालं. कर्जाची परतफेड करता न आल्याने बँकेनं मला ‘डिफॉल्टर’ (कर्ज बुडवणारा) घोषित केलं. यानंतर मी नातेवाईकांकडून पैसे घेऊन घर चालवू लागलो. आतापर्यंत मी चार लाखांचं कर्ज घेतलं आहे. मी कोणाचेच पैसे परत न केल्याने त्यांनी मला पैसे देणं बंद केलं. यानंतर मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि काही दिवस घर चालवलं.”आपली व्यथा सांगताना दीपक पुढे म्हणाले, “जेव्हा माझं कुटुंब उपाशी मरेन, असं मला वाटलं. तेव्हा मी इडलीचं दुकान सुरू केलं. माझी पत्नी चांगली इडली बनवते. मी दररोज ३०० ते ४०० रुपयांची इडली विकतो. यातून मला कधी ५० तर कधी १०० रुपयांचा नफा होतो. सध्या इडली विकूनच मी माझं घर चालवत आहे.”

एचईसीच्या कर्मचाऱ्यांनी चांद्रयान-३ च्या लाँचर पॅड निर्मितीचा दावा केला असला तरी केंद्र सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. एचईसीनने अधिकृतपणे चांद्रयान-३ साठी कोणतीही उपकरणं बनवली नाहीत, असं केंद्राने म्हटलं आहे. पण २००३ ते २०१० या कालावधीत HEC ने इस्रोला मोबाईल लॉन्चिंग पेडेस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, EOT क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोझिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझॉन्टल स्लाइडिंग दरवाजांचा पुरवठा केला होता, हे केंद्राने मान्य केलं आहे. सरकारच्या या दाव्यावर HEC मध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या पुरेंदू दत्त मिश्रा यांनी सांगितलं, “तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारचं म्हणणं योग्य असू शकतं. कारण HEC ने चांद्रयान-३ साठी वेगळे लॉन्चपॅड बनवले नाहीत. पण दुसरं सत्य हे आहे की, भारतात आमच्याशिवाय दुसरी कोणतीही कंपनी लॉन्चपॅड बनवत नाही.” HEC ने चांद्रयान-३ साठी ८१० टनांच्या लाँचपॅड व्यतिरिक्त फोल्डिंग प्लॅटफॉर्म, WBS, स्लाइडिंग दरवाजाही बनवला आहे. तसेच, HEC सध्या इस्रोसाठी आणखी एक लॉन्चपॅड तयार करत आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी एचईसीचे दोन अभियंतेही संबंधित उपकरणं बसवण्यासाठी गेले होते, असंही मिश्रा यांनी सांगितलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com