‘मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारे मेले तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा. आमदार- खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार मालक आहे. त्यामुळे प्रश्नांची जाण असणाऱ्यांना संसदेत पाठवा. जोपर्यंत प्रश्नांची जाण असणारे संसदेत जाणार नाहीत तोपर्यंत प्रश्न तसाच राहणार आहे,’ असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आज ५ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते अमित भुईगळ, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविता मुंडे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षे मी लोकसभेत या प्रश्नाला उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्यांच्या संबंधित हा प्रश्न आहे त्यांनी सभागृहात उदासिनता दाखविली. त्यामुळे आपण कोणाला दोष देत नाही. कोणावर टीका करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांना या प्रश्नांची जाण आहे अशी माणसं सभागृहात जात नाहीत तोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागेल, असे मला वाटत नाही. शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासीन असेल तर निर्णय कोण घेणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी आरक्षण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविला गेला पाहिजे. असेही अॅड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
तुम्ही मरणाची भाषा करू नका. लढणारी माणसं निघून गेली तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा असे आपण म्हणतो. आमदार, खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार हे मालक आहेत. पाच वर्षानंतर त्यांना हकला आणि सत्तेत या. जे पाहिजे ते करून घ्या. आपण तब्येत बिघडणार नाही याची काळजी घ्या. आंदोलन सुरू ठेवा. आम्ही सोबत आहोत, ज्यांना महाराष्ट्रात आमच्यासोबत समझोता करायचा आहे. त्यांनी आम्ही सांगतोय की, इथले जे जिवंत प्रश्न आहेत ते तुम्ही हातात घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दडपशाही कालखंडाला सुरूवात झाली आहे. माझी पोलिसांना विनंती आहे. तुम्ही माणूस आहात, राज्यकर्त्यांचे गुलाम नाहीत. तुम्ही व्यक्ती आहात. राज्यकर्त्यांनी सांगितले तर कृपया पुन्हा झोडून काढू नका, अशी विनंती आहे. झालेली घटना चुकीची आहे. राज्यकर्ता आदेश लेखी देत नाही. त्यामुळे झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असून, पोलिसांनी मानवतेने वागावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
“मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा लढा एक दिवसाचा नसतो, हे आपण महात्मा गांधींपासून पाहत आलो आहे. स्वातंत्र्याचा लढाही अनेक दिवस चालला. ब्रिटनमध्ये जोपर्यंत चर्चिल सत्तेत राहतील तोपर्यंत भारताला स्वातंत्र मिळणार नाही, असं इंग्लंडमध्ये सांगितलं जात होतं. त्यानंतर चर्चिल हरले, आणि सत्तेत अॅटली आले. सत्तेत आल्यानंतर अॅटलींनी सांगितलं, आम्ही भारताला स्वातंत्र देऊ आणि भारताला स्वातंत्र मिळालं. आपल्यालाही अशीच वाटचाल करावी लागेल. येथील व्यवस्थेला आणि न्यायालयालाही तुम्ही अंगावर घ्यायला, तुम्ही शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येथील व्यवस्थेला आणि न्यायालयाला अंगावर घ्याल, त्यादिवशी तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढत आहात, तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं, राज्यघटनेमध्ये असं कुठेही नमूद केलं नाही की, अमूक समाजाला आरक्षण देता येणार नाही. कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की, एखाद्या समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही, असं म्हटलं नाही. पण आरक्षण देताना संबंधित वर्गाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? हे सरकारने सिद्ध करावं. शासनाने तसं सिद्ध केलं, तर त्यांना आरक्षण देण्यात आमचा कुठेही हस्तक्षेप नसेल”, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.
दरम्यान मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंदोलन मागे घेणार नाही, पण सरकारला चार दिवसांचा वेळ देत असल्याचे शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी आपण सरकारला चार दिवसांची मुदत देत आहोत. तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होत नाही. पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारचे हे शिष्टमंडळ उद्या पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहेत आणि या प्रश्नी चर्चा करणार आहेत. एवढे मंत्री उद्या परत येऊन बोलत असतील तर नक्की काही सकारात्मक होईल.
मराठा आरक्षणाचं घोंगडं गेले कित्येक वर्षे भिजत पडलं आहे. बीडचे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आठवडा उलटूनही सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. यावरून स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी दिल्लीत आज माध्यमांशी संवाद साधला.
संभाजीराजे भोसले म्हणाले की, “मनोज जरांगे दरवर्षी आंदोलन करतात. त्यांच्या अनेक आंदलोनांना भेट दिली आहे. मराठा समाजाची जी भूमिका असेल तीच माझीही भूमिका असेल. सरकारने समिती स्थापन केली आहे, या समितीला नेहमी सुचित करत आलो आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्याचे विविध पॅरामिटर्स आहेत. आणि ते कशा पद्धतीने सोडवता येतील यावर विचार केला पाहिजे. ते अद्यापही सुटलेले नाहीत असं माझं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिक मागास नाही असं सिद्ध केलं आहे. सामाजिक मागास असल्याशिवाय तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही. मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोणतंही आरक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला मागास सिद्ध करावं लागेल. मनोज जरांगेंची जी भूमिका आहे, मराठा समाजाची जी भूमिका आहे, त्याबाजूने मी नेहमीच राहणार आहे. परंतु, टेक्निकल गोष्टी मी समोर ठेवल्या. २००७ पासून मी बाहेर फिरतोय, मला असं वाटतंय सरकारची एक बैठक होणं गरजेचं आहे. त्यांनी समाजाच्या भावना सांगितल्या आहेत. भावना आणि टेक्निकल गोष्टी एकत्र आणण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली पहिल्यांदा बहुजनांना आरक्षण दिलं होतं. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाला हे आरक्षण होतं. परंतु, मराठा समाज या छताखालून बाहेर फेकला गेला आहे, मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केली आहे. ही परिस्थिती वाढू नये. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहनही संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.
0 टिप्पण्या